शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

वंदे मातरम् 🇮🇳

©सौ.श्वेता अनुप साठ्ये
३०/०१/२०२०
     
" वंदे मातरम् "

     प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमच्या सोसायटीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात बऱ्याच वर्षांनी "वंदे मातरम्" म्हणण्याचा योग आला. योग आला म्हणजे मीच तो आणवला 😀.  आधी मैत्रिणींना विचारले की सगळ्याजणी मिळून देशभक्तीचं  एखादं गाणं म्हणू. पण नेमका कुणालाच ह्यावेळेस सरावाला वेळ नव्हता. मग मी ठरवलं निदान ' वंदे मातरम् ' म्हणून तरी आपला झेंडा रोवू. तसा माझा आणि गायनाचा दूर दूर पर्यंत सुद्धा काहीही संबंध नाही हां. पण हौस दांडगी की काहीतरी म्हणायचेच , आवाज कसा का असेना 😀. 
     २६ जानेवारीला सकाळी लवकर नेहमीच्या वेळेआधीच अर्धा तास आमच्या सोसायटीचा  सेक्युरिटी स्टाफ आणि हाऊसकीपिंग च्या मदतनीस बायका आल्या. त्यांनी अगदी उत्साहाने सोसायटीची साफसफाई केली आणि मस्त मोठी रांगोळी काढली. त्यांचा सुट्टीचा दिवस असूनही त्यांनी हजेरी लावली म्हणून त्यांचं विशेष कौतुक वाटले. माझ्याही घरातल्या मदतनीस आम्माने आदल्यादिवशीच मला सांगितले होते, 'आम्मा, नाळे रजे बेकु'. तिला तिच्या मुलांच्या शाळेत झेंडावंदन आणि मुलांच्या वक्तृत्वाच्या स्पर्धा पहायला जायचे होते म्हणाली. तिचा उत्साह बघुन मला खूप कुतूहल वाटले आणि आनंदही झाला. बिनधास्त घे म्हणाले मी सुट्टी. प्रत्येकाने हा दिवस आपापल्या परीने साजरा करायलाच हवा, नाही का ? 
     प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. भाषणं झाली. लहान मुलांची गाणी , नाच असं सगळं सादरीकरण पार पडलं. मग काय मीही घेतला माईक हातात. मनातल्या मनात म्हंटले, "Howz the Josh?"...."High Sir "... मग केली सुरवात  ' वंदे मातरम्' म्हणायला. तेंव्हा मला माझ्या शालेय जीवनातल्या प्रजासत्ताक दिनाची आठवण झाली.
     आम्ही शाळेत असताना आमचा गणतंत्र दिवस अगदी थाटात साजरा व्हायचा. सोनेरी दिवसांमधले ते सोनेरी क्षण. नवचैतन्य घेऊन येणारी ती प्रसन्न सकाळ. आम्ही भावंडं पहाटे लवकर उठून लगबगीने आवरायला लागायचो. आई माझ्या केसांना भरपूर तेल लावून घट्ट दोन वेण्या घालून देऊन त्या काळ्या रिबिनीने गच्च बांधायची. काय बिशाद त्या दोन वेण्यांची की दिवसभरात विस्कटतील. 😀... स्वच्छ धुवून इस्त्री केलेला गणवेश घालून वर्गाचे किंवा शाळेचे सेक्रेटरी पद मिळाले असेल तर तसा मानाचा पिवळा/केशरी बिल्ला सेफ्टी पिन ने गणवेशावर लावून दिवसभर रुबाबात मिरवायचो. सगळं आवरून सव्वा सहा साडे सहाच्या दरम्यान घरातून निघून, जाता जाता वाटेत मैत्रिणींना हाका मारत एकत्र मिळून शाळेत पोहचायचो. कुठल्याही परिस्थितीत पावणे सात पर्यंत शाळा गाठायचो. वेळेच्या बाबतीत आमची आई आणि शाळा दोघीही एकदम कडक शिस्तीच्या बरका. कुठल्याही परिस्थितीत वेळ ही पाळलीच पाहिजे असा दंडक होता. आमची अगदी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था असायची.😀
     शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना कसा  महादरवाजा आणि त्यात एकच माणूस वाकून जाऊ शकेल असा एक छोटा दरवाजा असायचा अगदी तसंच पण दोन लोखंडी दरवाजे आणि त्यातच असलेला एक छोटा दरवाजा आमच्या शाळेलाही होता. वेळ म्हणजे वेळ . उशीर झाल्यामुळे रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणीला कडा उतरून घरी तिच्या बाळा जवळ पोहचावे लागले होते. तसंच आम्हाला शाळेला जायला पाच मिनिट जरी उशीर झाला तरी छोट्या दरवाजातून आत प्रवेश तर मिळायचा पण मैदानाला चांगल्या पाच फेऱ्या पळत मारल्यावरच आपापल्या वर्गात जायची परवानगी मिळायची. त्यामुळे शक्यतो वेळेआधीच पंधरा मिनिटं शाळेत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असायचा. त्यावेळी जाचक वाटणारे हे शिस्तीचे नियम आता मात्र पदोपदी ते उपयोगी पडतात. वेळेचं महत्त्व जाणवून देतात.
     शाळेत पोहचल्यावर वर्गात जाऊन आपापल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसायचो. वर्गशिक्षिका बाईंनी हजेरी घेऊन झाली की उंचीप्रमाणे रांगा करून शाळेच्या मैदानावर ओळीत जाऊन ध्वजारोहणाच्या स्तंभाच्या दिशेने तोंड करून उभे राहायचो. पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व वर्ग आणि प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षिका एकदम शिस्तीत तिथे उभे ठाकायचे. ध्वजारोहणाची जागा सडा रांगोळी ने सुुुशोभित केलेेली असायची.
     ठरलेल्या वेळेत मुख्याध्यापक आणि आमंत्रित प्रमुख पाहुणे ध्वजारोहणासाठी उपस्थित व्हायचे. सर्वांना 'सावधान' अशी आज्ञा दिली जायची. एकदम शांततेत आणि सावधान स्थितीत आम्ही पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणारा ध्वजारोहणाचा सोहळा डोळे भरून पाहायचो. ढोल ताशांच्या गजरात ध्वजारोहण व्हायचे. आम्ही  सारेजण एकसूरात मोठ्या आवाजात राष्ट्रगीत आणि त्या पाठोपाठ प्रतिज्ञा ही म्हणायचो. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ......". प्रार्थना म्हणत असताना देशप्रेमाने ऊर अगदी भरून यायचा. उपस्थित सर्व जण फक्त आणि फक्त भारतीयच असायचे. गरीब श्रीमंत, जात पात, कुठलेही भेदभाव मनालाही शिवायचे नाहीत. राष्ट्रधर्म हाच श्रेष्ठ धर्म ही जाणीव व्हायची. स्फूर्तिदायक असं ते वातावरण असे. आमच्या इतिहासाच्या शहाणे बाईंनी अगदी रंगवून सांगितलेल्या क्रांतिकारकांच्या, शहीदांच्या शौर्य कथा आठवायच्या. आपसूकच सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावायच्या. झेंडावंदनाने त्या दिवसाची सुरुवात अशी एकदम प्रेरणादाई होई.
      आलेल्या पाहुण्यांचे आणि मुख्याध्यापकांचे भाषण असायचे. त्या पाठोपाठ आमच्या निरनिराळ्या स्पर्धा असायच्या. वक्तृत्व, खो-खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक , थाळी फेक , स्काऊट / गाईड मध्ये असू तर खरी कमाईचा सुधा दिवस असे. सगळं पार पडलं की परत आम्ही आपापल्या वर्गात जमत असू. शाळेचे शिपाई काका मोठा बॉक्स घेऊन येत असत. त्यात तळलेल्या पोह्यांचा खमंग, झणझणीत चिवडा आणि दोन बुंदीचे लाडू अशी भरलेली पाकीटं असत. प्रत्येकीला एक एक पाकीट बाई देत असत. सोहळ्याची सांगता ' वंदे मातरम् ' गीतानेच होत असे. 
     एरवीही त्यावेळी आमच्या शाळांचा रोजचा दिनक्रम राष्ट्रगीत , प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने सुरू होत असे आणि ' वंदे मातरम् ' गीत म्हणूनच संपत असे. प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थिनींना आळीपाळीने राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हणण्याची संधी दिली जाई. त्यासाठी गायन विषय घेतला असावा अशी काही अट नव्हती. मुख्याध्यापकांच्या  ऑफिस  मध्ये जाऊन माईक समोर ग्रुपने उभे राहून आम्ही ते म्हणत असू. ती संधी मिळाली की वर्गापुढे आमची कॉलर एकदम ताठ होत असे. राष्ट्रगीत म्हणतानाचा आपला आवाज आपली आख्खी शाळा ऐकणार ह्यात एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असे. आता असं वाटतं  ते दिवस परत एकदा अनुभवायला मिळावेत.
     हल्ली मात्र शाळांमध्ये राष्ट्रगीत कधीतरीच किंवा विशेष प्रसंगीच म्हटले जाते. तो पूर्वीसारखाच शालेय दिनक्रमाचाच एक भाग व्हावा. सिनेमा थिएटर मध्ये मात्र आता सिनेमाच्या आधी सुरवातीला राष्ट्रगीत लावतात हा सकारात्मक बदल मला फार आवडला.  
   आता आपण मोठेपणी आपल्या दैनंदिन जीवनात जरी  रोज  'जन गण मन' , 'वंदे मातरम्' ,  म्हणत नसलो तरी  आपणच आपल्या आचरणातून देशाचा सन्मान करून देशप्रेम जोपासायला  हवे.  आपण ही जबाबदारीने  आपला देश स्वच्छ सुंदर बनवायला हातभार लावायला हवा. पर्यावरणाचा आदर राखायला हवा. विहिरी, नद्या, ओढे, समुद्रा मध्ये निर्माल्य विसर्जित करणं, कचरा टाकणं, दूषित पाणी सोडणं, रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा फेकणं थांबवले पाहिजे. निदान आपल्या आजूबाजूचा परिसर श्रमदान करून स्वछ ठेवणं,  वाहतुकीचे सर्व नियम पाळणं, कुठलेही सरकारी काम लाच न देता किंवा घेता केले पाहिजे. अशा देशहिताच्या कामांची  सुरुवात एक जबाबदार नागरिक म्हणून आपण  स्वतःपासूनच करूयात. हेच खरं भारतमातेला वंदन असेल आणि हाच आपल्या भारतवर्षाच्या ध्वजाचा खरा  सन्मान असेल. 
     आपल्या भारतमातेला आणि ज्यांच्यामुळे आपण आपले स्वातंत्र्यदिन , गणतंत्र दिन आनंदाने साजरे करू शकतो त्या सैनिक बांधवांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏 

वंदे मातरम् । वंदे मातरम् ।
सुजलाम् सुफलाम् मलयज  शीतलाम् 
सस्य  श्यामलाम् मातरम्।
वंदे मातरम्। वंदे मातरम्।
शुभ्र ज्योत्स्नाम् पुलकित यामिनीम्
फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम् 
सुखदाम् वरदाम् मातरम् ।
वंदे मातरम्। वंदे मातरम्। वंदे मातरम्।

भारत माता की जय!🇮🇳🙏

©सौ.श्वेता अनुप साठये
३०/०१/२०२०

This blog is republished on bhavmarathi site...
https://bhavmarathi.com/vande-mataram/










शनिवार, ४ जानेवारी, २०२०

रेणुकेची यात्रा

"रेणुकेची यात्रा "

     दिवाळीची मजा संपून आमची शाळेची चाचणी परीक्षा पार पडलेली असायची आणि मग आम्हाला वेध लागायचे ते एक दिवस रेणुकेला जायचे.
     पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत कऱ्हाडला रेणुकेचा उत्सव असतो. कऱ्हाडमधून आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातूनही लोक देवीच्या दर्शनाला हमखास जातात. माझ्या बालपणी तर रेणुकेला जायचं म्हणजे एक सोहळाच असे. देवीचं दर्शन आणि त्यासोबत होणारी एक दिवसाची सहल.
     आई आणि आमच्या कॉलनीतल्या तिच्या मैत्रिणी आम्हा सगळ्या मुलांना सोबत घेऊन रेणुकेच्या दर्शनाला जायचा एक दिवस पक्का करत असत. मग दोनतीन दिवस आधीपासूनच सर्वजणी तयारीला लागत. तेव्हा काही बाहेर खाण्याचं एवढं फॅड नव्हतं आणि उपलब्धताही नव्हती. सर्वजणी ठरवून लवकर उठून डबे बनवून घ्यायच्या आणि मग आम्ही सगळे रेणुकेला जायला निघायचो.
     घरापासून देऊळ साधारण सात आठ किमी अंतरावर असेल. त्यामुळे घरापासून निघताना रिक्षा करून जायचो. कृष्णापूल ओलांडून विद्यानागरच्या रस्त्यावर एक चौक लागतो. तिथून डावीकडे जाणारा एक फाटा आहे. त्या चौकातच फाट्याजवळ रिक्षा सोडून देऊन आम्ही सर्वजण चालायला सुरुवात करायचो. त्या वाटेला सोबत घेऊन वाहणारा एक कालवा आहे. कृष्णेवर खोडशीला बांधलेल्या धरणाचा तो कालवा एकीकडे वाहतो तर दुसरीकडे शेती, आमराई, फळबागा आणि मधोमध हा अगदी कच्चा रस्ता. तो थेट खोडशी धरणापर्यंत जातो. साधारण तीनेक किमी. चा तो पायी प्रवास. रिक्षातून उतरून आम्ही  सगळी चिल्लर गँग आयांबरोबर यात्रेला सुरवात करायचो. होय यात्राच ती आमची ! छोटीशी ! पण अगदी कैलासाच्या यात्रेचा आनंद देणारी.
     थंडीच्या गार वाऱ्यात उगवतीच्या सूर्याची सोनेरी किरणं त्या कालव्यामधल्या पाण्यावर पडून हिऱ्यासारखी चमकत असायची. मधूनच कापसासारखं धुकं पाण्यावर अलगद तरंगताना दिसायचं. कालव्याच्या बाजूने असलेली गर्द हिरवी घनदाट झाडं त्यांवर पडलेल्या धुक्याने आणि दवाने भिजलेली दिसायची. त्यांवर टांगलेले सुगरणींचे असंख्य खोपे. त्यांवर भिरभिरणाऱ्या सुगरणी. पिल्लांची राखण करणाऱ्या, त्यांना खोप्यात जाऊन भरवणाऱ्या. बगळे, खंड्या, साळुंख्या, भारद्वाज, कोकिळा, पोपट, कबुतरं, बुलबुल, चिमण्या असे अनेक पक्षी अगदी मुक्त विहार करत त्यांचा  किलबिलाट चालू असायचा. चालत चालत ती घरटी बघणं, पिल्लं दिसतायत का ते शोधणं, दिसली तर हळूच घोळका करून बाजूला थांबून त्यांचा चिवचिवाट ऐकणं, पक्षी त्यांना कसे चोचीने भरवतात हे बघणं हा आमचा आवडीचा छंद. तेव्हा हेच बिल्डर्स आणि त्यांनी बांधलेली घरटी ह्याच बिल्डिंग्ज आम्हाला तिथे दिसायच्या. स्वर्गाहून सुंदर सृष्टी होती ती .
     वाटेत आजूबाजूच्या खेड्यांमधून येऊन बायका रस्त्याकडेला वेताच्या बुट्ट्यांमधे पेरू, बोरं, आवळे, चिंचा, चणे, शेंगदाणे, फुटाणे असं काय काय रीघ करून विकायला बसायच्या. कागदी कोनाकार पुडे तयार करून त्यात मापं भरून घालून त्या द्यायच्या. ते पुडे हातात घेऊन आवडीचा खाऊ खात खात पुढची वाटचाल आम्ही चालू ठेवायचो. थोडी उन्हं वर आली की शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आणलेल्या म्हशी कालव्यात डुंबताना दिसायच्या. त्यांच्या पाठीवर शुभ्र पांढरे  बगळे स्तब्ध उभे असायचे. त्या शेतकऱ्यांची मुलं मधेच म्हशींच्या पाठींवर उभं राहून पाण्यात मनसोक्त उड्या ठोकायची. ते बघून आम्हाला जाम अप्रूप वाटायचे. त्यांच्यातला एखादा मुलगा पोहत पलीकडे जाऊन पलीकडच्या झाडांवरून रिकामा झालेला खोपा आणून आम्हाला भेट द्यायचा. "कोन ऱ्हात न्हाय आता त्यात. उडाया शिकल्याती पिल्लं. गेली उडून समदी. घ्या तुम्हांस्नी. " असं म्हणून प्रेमानं आम्हाला द्यायची. मग आम्हीही घेतलेले पेरू, बोरं त्यांना द्यायचो. त्या सुंदरशा खोप्याचं घोळका करून निरीक्षण व्हायचं. अगदी  मजबूत बांधणी असलेलं, आत कप्पे असलेलं. त्या कप्प्यांमध्ये पिल्लांसाठी ठेवलेला मऊ कापूस पण असे. किमया निसर्गाची! बघून आम्ही खरच खूप भारावून जायचो. एवढीशी ती सुगरण पण केवढा मोठा तिचा खोपा.
     नुकतीच बाईंनी शाळेत शिकवलेली बहिणाबाईंची कविता ,
             अरे खोप्या मधी खोपा
              सुगरणीचा चांगला
              देखा पिल्लासाठी तिनं
              झोका झाडाले टांगला.....आठवत , म्हणत आमची स्वारी पुढं चालायची.
     मघाशी घेतलेल्या खाऊच्या पुड्यांच्या कागदांचा चेंडू आता बनलेला असायचा. तो उडवत, खेळत खेळत जाताना आम्हाला मधेच दिसायचं ते डाव्या बाजूने ऊसांच्या शेतात वाहत जाणारं पाटाचं पाणी . नदीवर मोटारी लावून पाणी ओढलेलं असायचं. त्या नळ्यामधून जोरात कारंज्यांसारखं वाहणारं थंडगार पाणी तोंडावर उडवून पोटभर पिऊन झालं की शेतात काम करणाऱ्या माणसांकडून दोन तीन ऊस तोडून मिळायचे. ते पायाने परत एकसारखे तोडून एकेक कांडकं आई आम्हाला द्यायची. तो खात , चघळत चघळत , दंगा मस्ती करत चालत असताना शेवटी धरणाची भींत दिसू लागे. चालायचा उत्साह अजूनच वाढे. 'त्या धरणाच्या भिंतीजवळच जायचंय' , असं कुणाचं तरी वाक्य ऐकलं की आमचा चालण्याचा वेग अजूनच दुप्पट होई. धावत धावत जाऊन तिथल्या झाडापर्यंत पहिलं पोहचण्याची मग स्पर्धा लागे. मागून आयांच्या हाका येत, " सांभाळा रे पोरांनो , पाणी खोल आहे बरंच." त्यांचाही मग चालण्याचा वेग आपसूकच वाढे. धरणातल्या पाण्यात कधी एकदाचे पाय बुडवतो असे अगदी झालेलं असायचं आम्हाला. सगळेजण मग त्या धरणाच्या भिंतीवर हळूहळू जाऊन उभे राहत असू. धरण भरून त्या भिंतीवरून पाणी खाली कोसळत असे. त्या पाण्यात पाय बुडवायला त्या भिंतीवरून चालायला कोण आनंद होई आम्हाला.
     तिथूनच धरणाच्या अगदी समोरच झाडीत असलेल्या रेणुकेच्या मंदिराचा कळस दिसे. मग आमची धाव आता देवळाकडे असे. देऊळ तसं अगदी साधं, कौलारू होतं. पण निसर्गाच्या हिरवाईने आणि वैभवाने नटलेलं. मंदिरात प्रवेश केला की काळ्या दगडामधे कोरलेली रेणुकेची शांत मूर्ती दिसे. भाळी मळवट भरलेली, हिरवी साडी ल्यालेली, हातभर हिरव्या बांगड्या घातलेली. मंद समयांच्या ज्योतीमध्ये त्या तेजस्वी मूर्तीचे दर्शन होई. एकदम शांत , प्रसन्न वाटे. देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालताना तिथून धरणाच्या भिंतीवरून खडकांवरून खळखळत जाणारं पांढरं शुभ्र फेसाळतं पाणी दिसे.
     थोडावेळ देवळात शांत बसून मग आमची गँग जवळच असलेल्या आमराईत आमची सर्वांची अंगत पंगत मावेल असं मोठं डेरेदार झाड पाहून बस्तान बसवत असू. मघाशी बनवलेला चेंडू परत कोणाच्यातरी खिशातून बाहेर निघत असे. कोणीतरी बाजूच्या झाडांच्या चिंचा पाडण्यात मग्न होई. कोणीकोणी आंब्याच्या झाडांवर चढून बसे. धरणाचं पाणी वरून कसं दिसतं ते बघण्याचे खटाटोप चालत. अशातच मग सगळ्यांच्या आयांच्या हाका येत, " पोरांनो, येताय ना रे जेवायला? " मग झाडांवरून खाली उड्या मारून आम्ही सर्वजण गोल करून  बसून उदरभरणाला सज्ज होत असू.
     सगळ्यांच्या घरचे वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेले डबे पिशव्यांमधून बाहेर निघायचे. एकदोघीजणी घागर घेऊन कृष्णेचं धरणातलं पाणी आणायला जायच्या, कोणी हाताने कांदे फोडण्यात दंग होई, तर कोणीतरी सगळ्यांना ताटं द्यायला सुरुवात करी. अशी सगळी पूर्व तयारी झाली की मग मधे मांडून ठेवलेले सगळ्यांचे डबे एक एक करून उघडले जात. मस्त थाटमाट असे त्या डब्यांचा. झुणका, भाकरी, ठेचा, मसालेभात, दहीभात, मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, दशम्या , पोळ्या आणि  मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या. वा! वा ! मस्तच!! तोंडाला अगदी पाणी सुटायचं. एवढी चाल करून आल्यामुळे जाम भूक लागलेली असायची. सगळेजण मग आम्ही त्या चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारायचो.
     त्यात मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या मला फार आवडायच्या. सोबत नेहमी भुईमुगाच्या शेंगा आणायच्या त्या. ताजी  आलेली लाल गाजरं, मुळे, ओले हरभरे, डिंगऱ्या ही असायचे. असं सर्व पदार्थांनी भरलेलं ताट आणि सोबत शेंगा ,दही. मजा यायची खायला अगदी.
     पोटभर जेवून तिथेच आंब्याच्या झाडाखाली थंड वाऱ्यात छोटीशी डुलकी पण होत असे सर्वांची. गप्पा रंगत असत. आईला सगळ्या जणी गाणी म्हणायचा आग्रह करत. सुंदर आवाज तिचा. मग भेंड्याही रंगत.  परत एकदा धरणात भिंतीवरून वाहणाऱ्या पाण्यात पाय बुडवायची इच्छा पूर्ण होई. तिथेच बाजूला ताटं ही धुतली जात. झाडाखाली बसून जेवलेला परिसर सगळे मिळून स्वच्छ करत. 'प्लास्टिक' नामक राक्षसाचा थोडासाही शिरकाव तेव्हा तिथे नव्हता त्यामुळे सगळं कसं स्वच्छ होई किंवा खत होई. पर्यावरणाचा ही आदर राही.
     आमची स्वारी मग परतीच्या प्रवासाला सज्ज होत असे.
     त्यादिवासात कृष्णेच्या पाण्याची पातळी खालावलेली असे. त्यामुळे बऱ्याचदा मग सर्वानुमते जाताना कृष्णनदीचं पात्र ओलांडून घरी परतण्याचा ठराव पास होई. आणि मग आमचा रोमांचकारी परतीचा प्रवास सूरु होई. त्याच रस्त्यावरून परतताना मधेच लागणाऱ्या एका ओढ्याजवळची पायवाट थेट नदीपात्राकडे नेते. त्यावरून उतरण असल्यामुळे एकमेकांना आधार देत , धडपडत, हळूहळू चालत नदीपात्रा पर्यंत पोहचत असू. तिथून उजवीकडे नजर वळवली की  कृष्णाकोयनेचा प्रीतिसंगम दिसायचा. तर थेट पलीकडच्या तीरावर असलेलं कृष्णाबाईचं मंदीर, घाट आणि इतर देवळं दिसायची. नदीचं पाणी एकदम स्वच्छ असायचं. आकाशाचं प्रतिबिंब त्यात पडलेलं दिसायचं. पात्रातल्या पाण्याचा अंदाज घेऊन तिला नमन करून एकमेकांना हातांनी धरून साखळ्या करून आम्ही नदीच्या पात्रात प्रवेशकरते व्हायचो. हळूहळू अंदाज घेत चालायला सुरुवात करायचो. साधारण मध्यापर्यंत गेलो की पाण्याची पातळी मध्यभागी जास्त वाटायची. पाण्याला धारही असायची. अगदीच पाणी आमच्या गळ्यापर्यंत यायला लागलं असेल तर मोठी भावंडं पाठकुळी घ्यायची किंवा आया खांद्यांवर बसवायच्या. एकमेकांच्या आधाराने नदी पार करत राहायचो. पाण्याची पातळी कमी असेल तिथे परत खाली उतरून पाण्यातल्या गोल गोट्यांवरून चालत नदी अखेर पार व्हायची.  ज्यांना चांगलं पोहायला यायचं ते पोहत पलीकडचा तीर गाठायचे. पलीकडच्या तीरावर सुखरूप पोहचल्यावर सगळेजण तिथून परत एकदा रेणुकेला आणि कृष्णेलाही नमस्कार करुन कृतज्ञता व्यक्त करायचे. कृष्णेचं तीर्थ आई आमच्या डोळ्यांना लावायची. तिथून घाटावरच्या कृष्णाबाईच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शन घेऊन सरतेशेवटी रमतगमत आमची ही स्वारी घरात येऊन सुखरूप दाखल होई आणि रेणुकायात्रेची सांगता होई.
     घरी परतून मस्त गरम गरम खिचडी खात खात बाबांना आणि आजी आजोबांना सगळा सविस्तर वृत्तांत आम्ही सांगायचो. दिवसभराच्या पायपीटीनं दमल्यामुळं अंथरुणावर पडल्या पडल्या रेणुकायात्रेच्या सुखद स्वप्नात मग्न होऊन निद्राधीन होऊन जायचो.
     खरं तर तेंव्हा आमच्याकडे कॅमेरे नव्हते पण मनावर कायमचेच कोरले गेलेले हे क्षण फोटोंपेक्षाही सुस्पष्ट आमच्या स्मृतींमध्ये आहेत. तेव्हाच तो परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करायला हवा होता असं वाटतं. पाच सहा वर्षांपूर्वी  भरतपूरचं पक्षी अभयारण्य पाहण्याचा आम्हाला योग आला आणि ते पाहताना मला प्रकर्षानं रेणुकेची आठवण आली. तेवढीच  किंबहुना त्याहूनही सुंदर असलेली ही रेणुकेची यात्रा होती.
     बऱ्याच वर्षांनी  दोन वर्षांपूर्वी मला रेणुकेला जायचा योग आला. मन फार खिन्न झालं. सगळंच हरवून गेल्यासारखं वाटलं. ती झाडं, सुगरणींचे ते खोपे ते पक्षी काहीच कशाचाच मागमूस लागला नाही. खोप्यांची जागा तर आता पूर्ण काँक्रिटच्या जंगलाने घेतलीय. त्या रस्त्यावरच्या झाडांची संख्या फारच घटलीय. अगदी मोजकेच हातांच्या बोटांवर मोजता येण्याएवढेच खोपे दिसले. रुक्ष वाटलं सगळं. कालव्यातही दूषित पाण्याने शिरकाव केलाय. "प्लास्टिक"आणि "मनुष्याची हाव" ह्या दोन राक्षसांनी त्या वाटेवर आपलं बस्तान बसवलंय. चित्र बदलायला हवंय. काहीतरी करायला हवंय. आपणच आपली जंगलं गिळंकृत करत  चाललोय. रेणुकेचं दर्शन घेऊन एकच मनाशी खूणगाठ बांधून आलीय , जिथे जमतील जशी जमतील तशी झाडं लावत रहायचं. तेवढाच काँक्रिटच्या जंगलात खारोटीच्या प्रयत्नांचा छोटासा वाटा. जागोजागी घटत चाललेल्या जंगलांची आणि नैसर्गिक संपत्तीची पुन्हा वाढ होवो हीच रेणुकेचरणी प्रार्थना.
।।श्री रेणुकामाता की जय।।
पाहुयात मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या....
साहित्य:-
बाजरीचे पीठ - ३ वाट्या
गहू, तांदूळ, हरभरा पीठ (सर्व मिळून) - १ १/२ वाटी
तीळ - ४ ते ५ चमचे
ओवा- १ चमचा
आलं लसूण मिरचीचा ठेचा - २ते३ चमचे
मीठ- चवीनुसार
हळद - १ चमचा
हिंग - ३/४ चमचा
तेलाचे मोहन - २ चमचे
तेल ( तळण्यासाठी) - ४ ते ५ वाट्या
पाणी - पीठ मळण्यासाठी
कृती:-
*वरील सर्व( बाजरी, गहू, तांदूळ, बेसन )पीठे एकत्र करून त्यात हिंग, हळद ,मीठ, ठेचा, ओवा असं सर्व एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे दोन चमचे मोहन घालावे.
*त्या पीठात पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
*अर्धातास हे पीठ झाकून छान मुरू द्यावे.
* त्या पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर थोडे तीळ पसरून त्यावर हे एकसारखे थापावेत.
* कढईत तेल चांगलं तापलं की एक एक पुरी थापून तळून काढाव्यात.
*तयार बाजरीच्या खमंग पुऱ्या
*दाण्याची/ जवसाची/ काराळ्याची चटणी , दही ओल्या शेंगां सोबत सर्व्ह कराव्यात.
© सौ. श्वेता अनुप साठये
०१/०१/२०१९