गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

तीळाच्या वड्या

©सौ. श्वेता मोघे साठये
१५/०१/२०१९

"तीळाच्या वड्या"

      तीळाच्या वड्यांसारखाच गोड माझा हा आठवणीचा ठेवा.

     आपल्याला चांगले गुरू लाभणे म्हणजे भाग्याचेच लक्षण. त्याबाबतीत मी फार नशीबवान आहे.

     इयत्ता आठवीचा पहिला दिवस. वर्ग भरला. राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणून झाले. वर्गशिक्षिका बाईंनी हजेरी घेतली. प्रत्येकीने स्वतःची ओळख सांगून झाली. मग बाईंनी सूचना दिली," मुलींनो , तुम्हाला ह्या वर्षी खालील तीन पैकी एका विषयाची निवड करायची आहे. चित्रकला, गायन आणि होम सायन्स." कोण कोण कुठला विषय घेणार  यावरून वर्गात कुजबुज सुरू झाली. थोड्याच वेळात तिन्ही विषयांच्या तीन ही बाई वर्गात आल्या. "ज्यांना जो विषय घ्यायचा आहे त्यांनी त्या त्या संबंधित रांगेत जाऊन उभे राहावे. पुढे तोच विषय इतर शैक्षणिक विषयांसोबत तुम्हाला दहावी पर्यंत शिकायचा आहे. " अशी सूचना बाईंनी आम्हाला दिली. आणि गम्मत अशी झाली की काही अपवाद वगळता बहुतेक सर्व जणी आम्ही होम सायन्स च्या रांगेत जाऊन उभ्या राहिलो.
    त्याचं काय झालं ,आमच्या वर्गाच्याच वरच्या मजल्यावर जवळपास अमच्या वर्गावरच होम सायन्स चा वर्ग होता. आणि बाईंनी विद्यार्थिनींना शिकवण्या साठी केलेल्या निरनिराळ्या पदार्थांचे दरवळ अगदी आमच्या वर्गापर्यंत यायचे. तर उद्देश्य हा होता मनात की काय फक्त पदार्थ तर बनवायचेत(नंतर कळले खण्याइतकं सोप्पं काम नाही ते) आणि शिवाय बाईंनी बनवलेले छान पदार्थ ही खायला मिळतील हा एक आनंद आणि दुसरं म्हणजे दहावीला जरा जास्त मार्क्स मिळवायला हक्काचा स्कोअरिंग चा विषय. बरं पडेल जरा. तिन्ही बाई एकमेकींकडे बघून हसू लागल्या. त्यांना बहुतेक दरवर्षीचाच असा अनुभव असणार.
     मग आमच्या चित्रकलेच्या बाईंनी मलाही होम सायन्स च्या रांगेत बघून हसून हाक मारली, "मोघेss, तू तिकडे काय करतेस? चल बरं चित्रकलेच्या रांगेत. एवढी छान चित्रं काढतेस. "
मी :(मनातल्या मनात) "पण बाई, मला खायलाही खूप आवडतं आणि बाईंनी केलेल्या पदार्थांचे किती छान छान वासही येत असतात वर्गात. "
त्यावेळेस बाईंना 'का?' म्हणून विचारायची आमची प्राज्ञा नव्हती. मी निमूटपणे चित्रकलेच्या रांगेत जाऊन उभी राहिले. बाई पाचवीपासून माझी चित्रकला पाहत आल्या होत्या. आम्ही खरच इतके भाग्यवान की आम्हाला असे गुरुजन लाभले. आमच्याही पेक्षा त्यांना आमची शैक्षणिक गती कशात जास्त आहे हे न सांगताच समजायचं आणि त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. माझ्यासारख्याच मग बाकी काही विद्यार्थिनींचीही  विभागणी गायन आणि चित्रकलेत झाली आणि होम सायन्सच्या वर्गाचा भार थोडा हलका झाला.
     पहिल्यापासून मला चित्रकला तर आवडत होतीच त्यामुळे चित्रकलेच्या वर्गात मन रमून गेले. शाळेत सर्वात मोठा असलेला ऐसपैस वर्ग. बाईंनी भिंतीवर चिकटवलेली निरनिराळी रंगीबेरंगी चित्रं. प्रत्येकीला वेगवेगळा डेस्क. बाईंचं अप्रतिम शिकवणं.  चित्रकलेचे तास मजेत चालू झाले.
     सहा एक महिने लोटले असतील शाळा चालू होऊन, एक दिवस होम सायन्सच्या बाई वर्गात आल्या आणि  मला हाक मारली,
बाई:  "मोघेss"
मी : (उठून उभी राहत) काय बाई?
बाई: तुला पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तुझी निवड मी केली आहे. तीळाच्या वड्या बनवायच्या आहेत स्पर्धेत. चल लाग तयारीला आजपासून.
मी: पण बाई...
बाई: आता पण बीण काही नाही , छान तयारी कर आणि बनवून दाखव वडी स्पर्धेच्या दिवशी. आवडतं ना तुला होम सायन्स?
मी : बरं बाई. घेईन मी भाग ...(मनातल्या मनात) बाई, अहो पण तुमच्या हातचं मला खायला आवडतं. हे सगळं बनवायचं म्हणजे जरा..... आई गं... देवाss !

     पडत्या फळाची आज्ञा मानून मी आव्हान स्वीकारलं खरं पण चवीने आणि मजेने खायला येणारी वडी बनवायची कशी हा यक्षप्रश्न माझ्या मनात घर करून बसला. मनातल्या मनात थोडी भीतीही वाटायला लागली. शाळा सुटल्यावर त्याच विचारात भित्र्या सशासारखा चेहरा घेऊन मी घरी गेले. आईने मला बघता क्षणीच विचारले...
आई : का गं, काय झालं? काही झाले का आज शाळेत? कशाची भीती?
मी : आई, पाककलेच्या स्पर्धेत नाव दिलंय बाईंनी माझं. तिथे जाऊन तीळाची वडी बनवून दाखवाचीय.
आई : एवढंच ना! मी उद्याच तुला छान वडी शिकवते  बनवायला. एकदम सोप्या पद्धतीने.
मी : आई , पण जमेल का गं मला? येईल का नंबर माझा? मिळेल का गं बक्षिस?
आई : जमेल गं राणी, सगळं जमेल. कुठलीही गोष्ट आधी करून पहावी. आधीच जमेल की नाही असं म्हणून घाबरून जाऊ नये. प्रयत्नाने जमतेच. फक्त चिकाटी हवी. चित्रं कशी जसं हवं तसं येईपर्यंत परत परत काढतेस अगदी तसंच. कुठलाही पदार्थ करताना उगाच करायचाय म्हणून तो कसातरी करून उरकू नये तर अगदी मन लावून , एकाग्रतेने आणि प्रेमाने तो करावा. करणाऱ्याच्या भावना आणि हाताची चव त्या पदार्थांमध्ये उतरत असते. आपण बनवलेले पदार्थ खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तृप्तीची ढेकर हेच तर खरं बक्षिस. बाकी बक्षिसं मिळोत न मिळोत. स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना खायला करून घालण्यासारखं सुख , समाधान दुसऱ्या कशात नाही बघ. बरं , अजून कोणी कोणी भाग घेतला आहे स्पर्धेत?
मी : हं... आहेत अजून बऱ्याच जणी. त्यात नववी दहावीच्या होम सायन्सच्या मुली पण आहेत आणि काही आठवीच्या पण आहेत. त्यांना बाईंनी त्यांच्या होम सायन्सच्या तासाला आधीच वड्या करायला शिकवल्या आहेत.
आई : (मंद स्मित करत) बरं. वेडाबाई  प्रत्येकालाच सगळे विषय एकाचवेळी घ्यायला कसे जमणार? हो की नाई. पण खरंच शिकायची अगदी मनापासून इच्छा असेल तर ते ज्ञान आपण कधीही आणि कसंही मिळवू शकतो. त्यासाठी डिग्रीच असायला हवी असं काही नाही.  ती असेल तर उत्तमच. पण नसेल तरी जसं जमेल तसं आपलं ज्ञानार्जन चालूच ठेवावं. ज्ञान असणं महत्वाचं नुसती डिग्री असणं नाही.
बरं, आता दमून आली आहेस आता लवकर जेवून झोपून टाक आणि पहाटे लवकर उठून आवरून तयारीत रहा. सकाळी रामप्रहरीच तुला वड्या बनवायला शिकवते. म्हणजे नवीन दिवसाचा नवीन उत्साहही असतो आणि शांतताही. मग छान एकाग्र चित्ताने शिकता येते.
मी : हं . बरं ठीक आहे.

     खरंतर माझी आई पूर्वीची फक्त मॅट्रिक पास. फारशी शिक्षणाची संधीही न मिळालेली. लहान वयातच लग्न होऊन संसाराला लागलेली. पण सतत काहीतरी नवनवीन गोष्टी शिकत राहणारी. अजूनही ह्या वयात ती सत्तरी ओलांडली तरी उत्साहाने सगळ्यांना आवडीचे पदार्थ करून खायला घालण्यात मग्न असते. तीने सांगितलेला हा उपदेश मला माझ्यासाठी "आईने सांगितलेली गीता " च वाटली. सहजतेने तिनं मला सुखी संसाराची सूत्रच सांगितली.
     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून आम्ही तयारीला लागलो. एकीकडे रेडिओ वर तिने बारीक आवाजात अभंग लावले होते. उगवणाऱ्या सूर्याची सोनेरी कोवळी किरणं स्वयंपाकघराच्या खिडकीतून समोरून येऊन कट्ट्यावर पडत होती. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या जाईच्या शुभ्र पांढऱ्या फुलांनी बहरलेल्या वेलीवर चिवचिवणाऱ्या चिमण्या दिसत होत्या. त्या चिमण्यांसाठी मूठभर तांदूळ खिडकीतुन बाहेरच्या वाटीत आईने ठेवले आणि अशा प्रसन्न वातावरणात मला सांगायला सुरुवात केली....

*सर्वात आधी एक वाटी असोले तीळ चाळून, पाखडून , निवडून घ्यावेत. तीळ असोले असतील तर वडी खमंग होते. फार पॉलिश असलेले तीळ शक्यतो नसावेत. तीळात काहीवेळेस बारीक खर असते ते नीट निवडले नाही गेले तर वडी खाताना कचकच लागते.
*ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी छान पिवळा धमक बारीक चिरलेला गूळ घ्यावा. गुळातही एकदा नजर फिरवून बारीक खडे नाहीत ना ते तपासून पहावे.
हे झाले साहित्य.
* आता पोळपाट आणि लाटणे स्वच्छ पुसून एकदम कोरडे करून घ्यावे. दोन्हीला तुपाचा हात लावून घ्यावा.
*एका वाटीत थोडे पाणी घेऊन ती जवळ ठेवून द्यावी. पाकाची परीक्षा घेण्यासाठी.
*एक जाड बुडाची कढई आणि उलथने पुसून कोरडे करून घ्यावे.
*कढई गॅस वर ठेवून त्यात तीळ घालून मंद गॅस लावून तीळ भाजून घ्यावेत. तीळाचा चटचट असा आवाज यायला लागला की ते भाजले गेलेत असे समजावे. ते तीळ दुसऱ्या एका ताटात काढून ठेवावेत.
*आता त्याच गरम कढईत मोजून घेतलेला अर्धी वाटी गूळ घालून गॅस मंदच ठेवून सतत उलथन्याने हलवत राहावे. गुळाला बुडबुडे यायला लागले की जवळ ठेवलेल्या वाटीतल्या पाण्यात उलथन्यानेच गुळाचा एक थेंब टाकून पहावा. लगेचच गुळाची गोळी बनली तर पाक झाला आहे असे समजून भाजलेले तीळ त्यात घालून पटपट मिश्रण एकजीव करून घ्यावे. ही क्रिया एकदम भरभर जमली पाहिजे. तो नीट एकजीव झालेला गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर ओतून लाटण्याने अगदी भरभर पातळ लाटून घ्यावा. लगेचच सुरीने रेषा पाडून वड्या आखून घ्याव्यात.
*पूर्ण गार झाल्या की वड्या पाडून कोरड्या डब्यात भरून ठेवाव्यात.
* तयार तीळगुळाची  झटपट वडी/ चिक्की.
प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा आणि आधी दुसऱ्यांना चव घ्यायला द्यावी.
पदार्थ बनवणाऱ्यानीच उगाच चव घेत, चाखत स्वयंपाक करू नये. त्या पदार्थाची चव उतरते. नुसत्या वासावरूनच पदार्थातले जिन्नस ओळखता यायला हवेत. "
     नंतर आईने माझ्याकडून दोन तीनदा वड्या बनवण्याचा सराव करून घेतला. स्पर्धेच्या दिवशी शाळेत जाताना परत थोड्या टिप्स दिल्या....
*बाकीच्या मुली वेगवेगळ्या पद्धतीने वड्या बनवतील. घटक पदार्थही वेगवेगळे असतील. मन विचलित होऊ देऊ नकोस.
* ह्या वड्या जशा शिकवल्या आहेत अगदी तशाच मन लावून  बनवण्याचा प्रयत्न कर.
*दिलेल्या वेळेचं भान ठेवून कृती कर.
*स्वच्छता फार महत्वाची. वड्या करण्याआधी आणि नंतरही कट्टा आणि भांडी स्वच्छ करून ठेव.
*संपूर्ण आकारात कापल्या गेलेल्याच वड्या ताटलीमधे नीटनेटक्या मांडून ठेव. बाकी उरलेल्या तुटलेल्या दुसऱ्या डब्यात ठेव.

     अखेर स्पर्धा पार पडली. माझ्या ह्या प्रथमगुरुने शिकवलेल्या वड्यांचा स्पर्धेत दुसरा नंबर आला. बाईंना वड्या खूप आवडल्या. पाककलेच्या परीक्षेची पहिली पायरी मी सर केली. पाठीवर बाईंची कौतुकाने शाबासकीची थाप पडली.   मला आनंदीआनंद झाला. माझ्या प्रथमगुरु , आईला आणि बाकी सर्व गुरूंना मी मनोमन साष्टांग नमन केले. 🙏

तीळगुळ घ्या गोड बोला !!😊

©सौ. श्वेता अनुप साठये


सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बुंदीचे लाडू

     
बुंदीचे लाडू

     केली सुरवात आज फराळ बनवायला , बुंदीच्या लाडवाने...
मुलाची आवडीची फर्माईश

तर मंडळी , त्याचं असं झालं....
नेहमी मी माझ्या मुलाला आणि भाच्याला ते शाळेत असताना विचारायचे , " काय करू बाळांनो आज सुटीचं जेवायला?" मग ते एक एक फर्माईशी द्यायचे, पावभाजी, मिसळ, वडापाव, whitesause pasta, असं बरंच काही . मी बरं म्हणायचे . तेही दोघे मग काहीतरी आज मस्त special खायला मिळणार म्हणून खुश असायचे.....
पण नेमकी त्याच दिवशी कामवाल्या बाईने सुट्टी ठोकलेली असायची. मग मी बापडी लागायचे आधी घरकामाला, स्वच्छतेला. सगळी कामं उरकून , घर आवरून जायचे मग दमून. मग नाईलाजाने माझं वाक्य यायचं बाहेर..."हुश्श्य! आता मी फारच दमले. आता मात्र मुगाची खिचडीच करते आणि कढी." दोघेही चेहरे पाडून पण परत हसत हसत माझी चेष्टा करायचे की ,"काय गं आई/ आत्या, एवढ्या सगळ्या मस्त मस्त पदार्थांची लिस्ट अगदी सकाळी विचारून घेतेस आणि शेवटी काय तर खिचडीच करतेस. "
     पण मुलंही फार समजूतदार. मी , "हो ना , पुन्हा कधीतरी देईन हां करून" म्हंटलं की म्हणायचे , "असू देत गं, आम्ही गम्मत करत असतो गं तुझी", म्हणून मला मदतीला यायचे. एकजण पापड तळायला घ्यायचा दुसरा सलाड कट करायचा . माझी खिचडी , कढी होईपर्यंत मुलं ताटं ,वाट्या , पाणी घ्यायला सुरुवात करायचे.

     आज दिवाळीच्या फराळाची सुरवात करावी असं ठरवलं होतं. सकाळीच उठून विचारलं मग मुलाला, "काय, काय करू सांग आवडीचं? तेच आधी करते. "
मग काय म्हणाला, "आई, बुंदीचे लाडू करशील?" (जरा साशंक वाटलाच😂)
त्याला फार आवडतात. इकडे बंगलोरला काही आपल्याइकडे लग्नकार्यात असतात तसे बुंदीचे लाडू मिळत नाहीत. त्याला तसेच फार आवडतात. काही वर्षांपूर्वी usa ला असताना केले होते मी एकदा दिवाळीत घरी बुंदीचे लाडू.  त्यामुळे होतीच साधारण कल्पना पाककृतीची. पण आज मनातून अगदी ठरवलेच की काहीही झालं तरी करायचेच बुंदीचे लाडू. ( मनात म्हंटलं पाखरू उडून जाईल आता.. मोठं झालंय.. शिक्षणासाठी जावं लागेल कदाचित घर सोडून दूर... भाचा तर गेला लांब शिक्षणाला... आलं थोडं गहीवरून. ...)
उठलेच शंभरच्या स्पीड ने लगेच आणि केलीच सुरवात झटपट.😊
     पातेल्यात दोन वाट्या बेसन घेतले छान चाळून. किंचितच मीठ घातले. तेल चांगलं कडकडीत तापवून मोहन घातले. गार पाणी घालून भज्यांच्या पिठासारखं पीठ भिजवून झाऱ्याने( आपला तळणीचा हो ) घेतली बुंदी पाडायला....पण बराच वेळ लागायला लागला. बराच वेळ  बुंदी पाडूनही quantity काही पुरेशी वाटेना. पुन्हा म्हंटलं दमून बेत कॅन्सल व्हायच्या आत धावा करू आंबेला कॉल करू मातेला. (म्हणजे माझी आई हो). सर्व समस्यांवर एकच उपाय , "आई." लावला लगेच कॉल . दिली तिने टिप...म्हणाली, " पिठात अजून पीठ घालून चकली पेक्षा थोडं पीठ सैल मळून बारीक शेव करून घे. नंतर ती चुरून लाडू कर." एकदम भारीच की ओ आयडिया. मी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून तिने सांगितल्याप्रमाणे शेव तयार करून घेतली. झालीही पटकन. गार करून हाताने अगदी बारीक होईपर्यंत चुरून घेतली.

आता पाक....
     जेवढं बेसन त्याच्या निम्याहून थोडी जास्त साखर घेऊन आईने सांगितले एकतारीच्या किंचित पुढचा पाक करून , त्यात वेलदोडा पूड, केशर, लवंग भाजून केलेली पावडर( 1/2 चमचा) आणि बारीक केलेली शेव , टरबूजबी , असं सर्व साहित्य घालून लाडू वळायचे.
पण झालं काय मी केले तसेच तर लगेचच साहित्य अळून येऊन नुसतीच बुंदी सुट्टी सुट्टी राहायला लागली. म्हंटलं आता काय करावं?
परत केला धावा आमच्या लाडक्या मातेचा. ....लावला फोन परत....दिली तिने एक युक्ती...म्हंटली," पाक गेला तुझा फार पुढं... आता वाटी दीड वाटी घे पाणी, त्यात घाल 2/3 चमचे साखर, ...पांढरी उकळी आली रे आली की लगेचच गॅस बंद करून थोडं तूप आणि हे पाणी दोन्ही त्या बुंदीवर ओत. "
एकदम काटेकोर युक्ती आणली मी आमलात आणि पटापट लाडू बांधून केले तयार.
अशाप्रकारे बुंदीच्या लाडवांची लाडक्या पिल्लाची फर्माईश सुफळ संपूर्ण झाली .
आणि मला पावती आणि बक्षिस मिळाले. त्याच्या चेेहऱ्यावरचा 'आनंद'आणि त्याने मारलेली 'गोड मीठी".😊
©सौ. श्वेता अनुप साठये
2/11/2018


रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी - मसाला दूध

कोजागिरी


     शरदपौर्णिमेची रात्र ...घराच्या गच्चीवरून समोरच दिसणारी संथ वाहणारी कोयनामाई... तीरावर असलेली वनराई... कडुनिंब ,आंबा, नारळी, जांभूळ, बकुळ, गुलमोहोर, अशोक, रातराणी आणि सोनचाफ्याची हिरवाई... नदीकडून येणारा अल्हाद वारा... त्यावर स्वार होऊन येणारे निशीगंध, रातराणी अन चाफ्याचे मंद धुंद सुगंध... धरेने नेसलेला निरभ्र आकाशाचा भरजरी शालू... त्या काळ्याभोर रेशमी शालूवर चंदेरी चांदण्यांच्या विणलेल्या सुरेख बुट्ट्यांची नक्षी...गच्चीवर पसरलेले जाई, जुई, मोगऱ्याचे बहरलेले वेल... तिथेच निरभ्र आकाशाखाली पूर्णचंद्र ,चांदण्यांच्या शीतल छायेत सर्वांचं भरलेलं स्नेहसंमेलन... सान थोरांनी घातलेली शुभ्र नवीन वसनं...सवाष्णींनी ल्यालेल्या भरजरी रेशमी साड्या आणि वेणीवर माळलेले सुवासिक , शुभ्र पांढरे गजरे... रिंगण करून खाली बसलेली सर्व मंडळी... अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात रंगलेल्या  गप्पांच्या मैफिली आणि गोड  गळ्यांतून गायल्या  जाणाऱ्या गाण्यांचे मधुर सूर... मध्यभागी स्थापन केलेली महालक्ष्मीची ती प्रसन्न मूर्ती ... मध्यरात्री तिची मनोभावे केली जाणारी पूजा आणि भक्तिभावाने सर्वांनी मिळून केली जाणारी आरती...धूप दीपाचा हवेत दरवळणारा तो पवित्र  गंध... महालक्ष्मीच्या नैवेद्याला ठेवलेलं मोठ्या पातेल्यातलं सुका मेवा, केशराचा साज असलेलं मसाल्याचं दूध... त्यावर पडलेले पूर्णचंद्राचे शीतल कवडसे... अहाहा!! अमृताहून ही गोड असलेल्या प्रसादाच्या दुधाची ती गोडी...श्री महालक्ष्मीचा सर्वांना मिळालेला असा हा समृद्धी आणि आरोग्याचा भरभरून आशीर्वाद...

 ||को जागर्ति || को जागर्ति||

||नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते | शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ||🙏🌺

©सौ.श्वेता अनुप साठये
१३/१०/२०१९

मसाला दूध

साहित्य :-
दूध एक लिटर
बदाम ५/७ (कोमट पाण्यात भिजवून वरील साल काढून टाकावे)
काजू  १०
पिस्ते  ५
चारोळे २/३ चमचे (अर्धातास आधी पाण्यात भिजवून ठेवावी)
खजूर ५ ( बी काढून  कोमट दुधात तासभर भिजवून मिक्सरवर वाटून पेस्ट करून घेणे)
साखर आवडीनुसार (ऐच्छिक)
वेलदोड्याची पूड १ १/२ चमचा
जायफळ पूड १ चमचा
केशर काड्या १ चमचा (कोमट दुधात भिजवून ठेवणे म्हणजे छान रंग उतरतो)

कृती:-
* एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला चमचाभर पाणी घालून दूध घालून बारीक गॅस करून उकळत ठेवावे.
*दूध पळीने सतत हलवत रहावे. दूध लागू नये यासाठी छोटी बशी पातेल्यात तळाशी घालून ठेवावी.
* काजू ,पिस्ते, वेलदोड्याची पूड,जायफळ पूड, चिमूटभर केशर काड्या, दोन चमचे साखर हे साहित्य    मिक्सर वर अर्धबोबडे असे बारीक करून घ्यावे.
*साल काढलेल्या बदामाचे बारीक काप करून घ्यावेत.
*दूध थोडे अाटले की गॅस बंद करून त्यात खजुराची पेस्ट घालून दूध एकसारखे हलवून घावे.
* शेवटी दुधात सुक्या मेव्याची  पूड घालून त्यात दुधात आधी भिजत घातलेले केशर आणि चारोळ्या घालून ढवळून दुधाला परत एक उकळी आणून गॅस बंद करावा.
*जास्त गोड हवे असल्यास आवडीनुसार थोडी साखर घालून ढवळावे.

गरमगरम मसाला दुधाचा  सर्वांसमवेत आस्वाद घ्यावा.

©सौ.श्वेता अनुप साठये
१३/१०/२०१९









शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

हेमदुग्धकदलिका शिकरण

©सौ. श्वेता अनुप साठये
१९/४/२०१९

"हेमदुग्धकदलिका शिकरण"

म्हणजे?
     अहो, हेमदुग्ध म्हणजे उंबर आणि कदलिका म्हणजे केळं. उंबर आणि केळ्यांचं शिकरण. संस्कृत नावं आहेत. संस्कृत नाव दिलं म्हणजे कसं रेसिपीचं वजन वाढतं ना म्हणून. भारदस्त वाटते रेसिपी मग. बाकी काही नाही. 😀
     आपण वड आणि औदुंबरादी अध्यात्मिक वृक्षांची अगदी मनोभावे पूजा करतो.दत्ताला गेलो की औदुंबराची पण पूजा करून न चुकता प्रदक्षिणा घालतोच. वटपौर्णिमा ही अगदी हौसेने साजरी करतो.वड, औदुंबराच्या औषधी गुणधर्मांचीही भरपूर चर्चा करतो. वैद्य लोक औषधांसाठी ह्या फळांचा  वापर करतात. पण आपल्या नेहमीच्या आहारात ही फळं आलेली मी कधीच पाहिली नाहीत. त्याच जातीची अंजीरं गोड लागतात म्हणून नेहमीच्या आपल्या आहारात त्यांचा समावेश असतो. पण दत्ताच्या देवळात औदुंबराच्या झाडाची उंबरं मात्र बिचारी बेचव, तुरट म्हणून पायदळी येऊन धारातीर्थी पडतात. त्यांच्याकडे पाहून त्यांनाही आपल्या रोजच्या अहरातल्या पदार्थांमध्ये मानाचं स्थान देऊन योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा आणि त्यासाठी हा माझा खटाटोप.
     आमच्या सोसायटी मध्ये औदुंबराचे/ उंबराचे एक झाड आहे. ह्या झाडाला साधारण मार्च एप्रिल दरम्यान उंबरं लागतात. ह्यावेळेस झाडाला लगडलेली ती उंबरं बघून नुकतीच पिकलेली वाडगाभर चांगली उंबरं बघून मी घेऊन आले. पातेलंभर पाण्यात थोडं मीठ टाकून त्यात काहीवेळ ती मी बुडवून ठेवली. बऱ्याचदा त्यावर मुंग्या असतात आणि आतही कीड असू शकते. त्यामुळे ती नीट पाहून स्वच्छ करून घेतली. देठ काढून टाकून चिरून एका पातेल्यात उंबरं आणि उंबरांच्या दुप्पट साखर घालून ते मिश्रण एकतारी पाक होई पर्यंत मंद गॅस करून ढवळत राहिले. अशा पद्धतीने मुरंबा करून थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवला.
    असा मुरंबा पोळीसोबत  नुसताही  छान लागला. केळांचे काप करून त्यावर मुरंबा आणि तूप  घालून खायलाही आवडले.
     आता हे मला माझ्या मुलाला आणि आहों ना खायला घालायचे होते. 😀 ते दोघेही आधीच मी उंबरं गोळा करून आणताना भीतीपूर्ण साशंकतेने माझ्याकडे पाहत होते. आपला आता गिनीपिग होणार म्हणून न न्ना चा पाढा आणि अनेक प्रश्न चालूच होते. पण मी जेवताना वरील मुरंबा खाऊनही व्यवस्थित आहे हे पाहून मुलगा थोडासा तयार झाला. मग माझाही हुरूप अजून वाढला. त्याला milkshakes आवडतात म्हणून clusterfig banana milkshake म्हणजेच " हेमदुग्धकदलिका शिकरण" चा जन्म झाला.😀 आधी त्याने घाबरत चमचाभर च चव घेतली. पण नंतर त्याला इतके आवडले की त्याने अजून  दोन फुल ग्लास clusterfig banana milkshake with उंबर मुरंबा topping ची इन्स्टंट ऑर्डर दिली. 😇 आई पास झाली.😀
     पिकलेली केळी, उंबर मुरंबा,थंड दूध ब्लेंडेर ने मिक्स करून घेतले. सर्व्ह करताना त्यात थोडा मुरंबा आणि केळा चे काप घातले. तयार यम्मी "हेमदुग्ध कदलिका शिकरण" (clusterfig banana milkshake)
     आयुर्वेदानुसार दूध आणि फळं विरुद्ध अन्न खरं तर पण आपण बाकीचेही milkshakes आवडीने पितो . त्यातून माझ्या मुलाला दही ताक अजिबातच आवडत नाही त्यामुळे milkshake / शिकरण बनवले. Dr. मैत्रिणीच्या सल्ल्याने "चालेल कधीतरी "असा शिक्काही मिळाला.
     पण मंडळी तुम्ही आवडत असेल तर  clustfig banana लस्सी ही बनवून पहा. वरील कृतीप्रमाणेच दुधा ऐवजी दही मलाई चा वापर करुन.
     माझ्या Dr. मैत्रीणने उंबराचे गुणधर्म ही मला सांगितले तेही खाली देते...
"उंबर"
 कषाय रसात्मक (तुरट) पचना ला जड़ गुरुगुणात्मक, after digestion ultimately convert into कटु vipak, शरीरातील वात वाढवणार आणि पित्त आणि कफ कमी करणार, व्रण रोपक wound healing property भग्न संधनक (heals fractured bones) दाह शामक (आग जळजळ कमी करणारे) रक्त स्त्राव कमी करणारे म्हणुन घोलणा फुटणे, मासिक पाळीत अति रक्तस्त्राव यात उपयुक्त, अति मूत्रस्त्राव लघवी ला होणारी जळजळ वरंवार होणारे मूत्रशयाचे इन्फेक्शन यात उपयुक्त, diabetes साठी फायदेशीर.
     वरील माहिती लक्षात घेऊन गरज वाटल्यास आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने स्वतःची प्रकृति (वात/पित्त/कफ) पाहून ही "हेमदुग्धकदलिका शिकरण" नक्की बनवून खाऊन पहा आणि अशा औषधी बहुगुणी फळाचा लाभ घ्या. 😊

©सौ.श्वेता अनुप साठये
१९/०४/२०१९






गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

चुरम्याचे लाडू

 चुरम्याचे लाडू

   कोयनेकाठी वसलेली आमची  कॉलनी. कॉलनी कसली? ते तर आमचं एक मोठं कुटुंबच होतं. निरनिराळ्या जातीधर्मांची कुटुंबं असलेलं एकत्र कुटुंब. एकमेकांच्या सुखदुःखात सदैव आपलेपणाने साथ करणारी जीवलग माणसं. सणवार असोत, लग्नंकार्यं असोत , अथवा एखादी दुःखद घटना असो कायम हे जीवलग एकमेकांसाठी हक्काने पाठीशी उभे.
     पहाटे सडासन्मार्जनासाठी घरांची दारं उघडली जायची आणि देवपूजेच्या फुलांच्या देवाण घेवाणीने दिवसाची सुरुवात व्हायची . पहाटे सताड उघडलेली दारं अगदी रात्रीच्या जेवणांची आवरा आवर करून, थोडावेळ एकत्र कट्ट्यावर बसून, एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारूनच बंद होत असत. त्यामुळेच मला वाटतं कंटाळा, डिप्रेशन असे शब्दही कुणाला माहीत नव्हते. मनमोकळं, मनमिळावू, सहज असं जगणं होतं सगळ्यांचं. आणि तोच सगळ्या व्याधींवरचा रामबाण उपायही होता .😊
     कुठलेही सणवार एकत्र येऊन साजरे केल्याशिवाय ते काही आम्हाला साजरे केल्यासारखेच वाटायचे नाहीत.ती मजा काही औरच होती.
     प्रत्येकाच्या घरचे गणपती आणताना आम्ही सगळी मुलं मिळून अगदी जयघोषात वाजतगाजत घेऊन यायचो तर आम्ही सगळ्या मुली अगदी नटून थटून एकत्र मिळून कोयनेवर जाऊन गौरीची गाणी म्हणत गौर घेऊन यायचो.
     नवरात्रात तर नऊ दिवस सगळ्या घरांमधल्या माय लेकी,  सूना भल्यापहाटे उठून आवरून अगदी चार वाजता सगळ्याजणी मिळून कोयनेकाठी जुन्यापुलाजवळ असलेल्या दैत्यनिवराणीच्या दर्शनाला जात असू. एवढ्या पहाटेपण तिथे भली मोठी दर्शनासाठी रांग असायची. लता आशा च्या आवाजातली देवाची भजनं, गाणी लावलेली असायची. मोठा मंडप , देवळाला लायटिंग असं सगळं पवित्र वातावरण असायचं. फुलांच्या हारांसोबतच देवीला कडकण्यांचेही हार वाहिले जायचे. दिवे लावले जायचे. कोयनेची पूजा करून कोयनेतही दिवे सोडले जायचे अशा सुंदर वातावरणात देवीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जाई.
     दिवाळी जवळ आली की घरांची रंगरंगोटी, साफसफाई करून सगळ्यांच्या घरी फराळाचे पदार्थ बनवण्याची धावपळ सुरू व्हायची. सगळ्यांचीच त्यावेळी एकत्र कुटुंबं होती . त्यामुळे राबताही तसाच मोठा असायचा . प्रत्येकाचं किमान दहाबारा लोकांचं कुटुंब. त्यामुळे फराळाचंही भरपूर करायला लागायचं. शिवाय पोस्टमन , कामगारवर्ग, कामाला येणार्या बायका, शेजारी सगळ्यांकडे फराळाची ताटं/ डबे दिले जायचे. मग चकली , करंजी, चिरोटयांसारखे किचकट आणि वेळखाऊ पदार्थ करायला, ठरवून सगळ्याजणी मायलेकी आपापली पोळपाट लाटणी घेऊन एकमेकांकडे मदतीला जायचो. गप्पागोष्टीत, दंगमस्तीत, गाण्याच्या भेंड्यात फराळाचे पदार्थ अगदी चुटकीसरशी करून पार पडायचे.
     ठोंबरेंच्यातल्या करंज्या, छायाच्याईंच्यातला लसूण घालून केलेला चिवडा, सुकरेंच्यातले शंकरपाळे, तर आईच्या हातचे अनारसे आणि भाभींच्या हातचे चुरम्याचे लाडू अशी प्रत्येकाची एकेक खासियत. आठवूनही माझ्या तोंडाला पाणी सुटले आत्ता.
     "चुरम्याचे लाडू !"😊 'चुरम्याचे लाडू' म्हटलं की सर्वात आधी माझ्यासमोर दिसतात त्या भाभी. भाभी... जणु माझी आईच. माझा जन्म झाला आणि माझ्या आईचे आणि भाभींचे मैत्रीचे धागे अगदी घट्ट झाले.
     भाभींचं ही कुटुंब तसं मोठंच. एकत्र जैन कुटुंब. स्वतःची सहा अपत्यं(चार मुली आणि दोन मुले) असून विधुर भावाच्या आईविना असलेल्या दोन छोट्या मुलींनाही आपलंसं करून अगदी ममतेनं वाढवणारी ती माय माऊली. सगळेजण त्यांना भाभीच म्हणत असत.
     काय ऋणानुबंध असतात मागच्या जन्मीचे ते देवच जाणे. मी अगदी तान्ही असल्यापासून मला भाभी आणि त्यांच्या मुली, म्हणजे माझ्या सगळ्या ताया त्यांच्या घरी घेऊन जायच्या. तिथेच भरवायच्या,खेळवायच्या,अगदी अंगाई गाऊन झोपवायच्याही. आईलाही तिच्या रामरगाड्यातून थोडा आधार वाटत असे. खूप लाड व्हायचे माझे. हा त्यांचा दिनक्रमच झाला होता. त्यामुळे मला त्यांचा आणि त्यांना माझा इतका लळा लागला की मी त्यांचीच एक होऊन गेले. मला रोज सकाळी तर भाभींच्याच मांडीत बसून दहीचटणी खाकरा असा आवडीचा खाऊ खायचा असे. मला घेऊन खेळण्यावरून तर ह्या सगळ्या तायांची भांडणही होत असत. 😂अगदी मधेच मला आईची आठवण आली की मगच माझी रवानगी आईकडे होत असे.
     पुढे मामांनी म्हणजे भाभींच्या यजमानांनी दुसऱ्या सोसायटीत घर बांधलं आणि सर्वजण तिकडेच राहायला गेले. तरी माझं येणं जाणं सतत चालूच राहिलं. बऱ्याचदा तिथेच अभ्यास करणं , मधेच स्वयंपाकघरात सगळ्यांमध्ये लुडबुड करत दशम्या , खाकरे असं काय काय करायला शिकणं , भाभींसोबत देवळात जाणं, महावीर स्वामींची पूजा करणं चालूच असे.  असं करता करता माझ्यावर शिस्तीचे ,स्वच्छतेचे आणि देवधर्माचेही संस्कार त्या करत होत्या. इकडे आईकडून आणि तिकडे भाभींकडून असे दुहेरी संस्कार माझ्यावर होत राहिले.
     दोन्ही घरांमध्ये शेंडेफळ असल्यामुळे माझे लाड, कोडकौतुकही भरपूर झाले. कुठल्याही सणावारांना पहिली खरेदी माझ्यासाठी ठरलेली . घागरा असेल, नथणी असेल एक ना अनेक.
     मी मोठी होत होते अभ्यासही वाढत होता तसं माझं येणं जाणं जरा कमी होत होतं. पण भाभींचे माझ्यावरचं प्रेम मात्र सदैव तसच राहिलं.
     एकमेकींच्या सुखदुःखात सदैव साथ करणारी , पाठीशी उभी असणारी निरपेक्ष मैत्री होती खरच आई आणि भाभींची. घरामध्ये काहीही बनवले तरी एकमेकींना पोस्तं केल्याशिवाय चैन पडायची नाही दोघींनाही.
     दर दिवाळीला धनत्रयोदशीला देवळात जातानाच सर्वात पहिला सर्व फराळाच्या पदार्थांनी भरलेला मोठा डबा आमच्याकडे पोस्तं होत असे. सोबत दुसरा डबा असे तो गुळात बनवलेल्या चुराम्याच्या लाडवांचा. 😊
डबा कसा नीटनेटका भरावा हे खरंच भाभींकडूनच शिकावं. गोड पदार्थ तिखट पदार्थ वेगवेगळे, दोन पदार्थांमध्ये एक पांढरा स्वच्छ कागद( त्यावेळी papernapkins/ प्लास्टिक पिशव्याही नव्हत्या). शिस्त ,स्वच्छता, नीटनेटकेपणा यात आई आणि भाभी म्हणजे एक नंबर. सर्वच फराळाचे पदार्थ अगदी अप्रतिम चवीचे. गुळाचे कानोले, करंज्या, त्यात रिकामी जागा कुठेही दिसणार नाही . सारणाने अगदी गच्च भरलेल्या , एकसारख्या तळलेल्या. चिरोटे अगदी खुसखुशीत साजूक तुपातले. चकली, चिवडा, मोहनथाळ, बेसनाच्या तिखट पुऱ्या आणि चुरम्याचे गूळ घालून बनवलेले लाडू .😊 असा साग्रसंगीत थाट असे त्या डब्याचा . तो डबाही अगदी तृप्त होत असेल असे सुगरणीच्या हातचे मस्त मस्त पदार्थ त्याच्या पोटात गेले की.
     मी कॉलेजमध्ये असताना भाभी हे जग सोडून देवाघरी गेल्या. देवालाही बहुतेक त्यांच्या प्रेमळ हातचं खायची इच्छा झाली असावी. आता त्या नसल्या तरी त्यांच्या त्या निर्व्याज, निरपेक्ष, ममतेने भरलेल्या स्मृती मात्र सदैव माझी साथ करत असतात.
     चुरम्याचे लाडू दिवाळीत आणि महावीर जयंतीलही त्या करायच्या. अप्रतिम चवीचे असे "चुरम्याचे लाडू" .
     बघुयात माझ्या लाडक्या भाभींच्या हातचे चुरम्याचे लाडू कसे असायचे ते ....
साहित्य:-
कणिक - चार वाट्या( गहू पोळीच्या कणकेपेक्षा थोडे जाडसर दळून आणले तर उत्तम.)
गूळ- चिरलेला दीड वाटी (आवडीप्रमाणे थोडा कमीजास्त करणे)
तूप - 2 वाट्या
तेल - तळणीसाठी ( आवडत असल्यास तूपही चालेल)
मीठ - चवीपुरते
वेलदोड्याची पूड - दोन चमचे
कृती:-
* कणकेमध्ये गरम तुपाचे मोहन व चवीपुरते मीठ घालून कणिक घट्ट मळून घेणे.
* थोडावेळ कणिक ठेवून चांगली मुरली की त्याचे मुटके बनवून तेलात / तुपात तळून घेणे. (जाडसर पोळ्या बनवून शंकरपाळे सारखे कापून तळले तरी चालते. ) मंद गॅसवर बदामी रंग येईपर्यंत एकसारखे तळून घेणे.
* कोमट झाल्यावर त्याचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घेणे. आवश्यक वाटल्यास चाळणीने चाळून घेणे.
*चिरलेला गुळ थोडा कढईत गरम करून तो वितळला की लगेच गॅस बंद करून त्यात वरील चुरमा व वेलदोड्याची पूड घालून मिश्रण एकजीव करावे.
* तूप गरम करून घेऊन आवश्यकते प्रमाणे त्यात थोडे थोडे घालत लाडू वळावेत.
(आवडत असल्यास ह्या लाडवांत डिंक, सुकामेवा,खसखस ही घालतात. )
आम्हाला हे असेच आवडतात.😊
तयार आहेत भाभींचे " चुरम्याचे लाडू " 😊
©सौ. श्वेता अनुप साठये



मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

दैत्यनिवारणी

दैत्यनिवारणी
     
     " श्वेतु, उठतेस ना? येणार ना दैत्यनिवारणीला?"  😊
नवरात्रातले नऊ दहा दिवस ब्रह्म मुहूर्तावरच आईच्या अशा गोड हाकेनी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. कऱ्हाडला शारदीय नवरात्रात दैत्यनिवारणी देवीच्या दर्शनाला जायची प्रथा आहे. एरवी सुट्ट्यांमध्ये दिवस उजाडेपर्यंत अंथरुणात लोळणारी आम्ही मुलं नवरात्रात मात्र पहाटे लवकरात लवकर उठून आवरून तयार होण्याची आमच्यात चढाओढच लागे. कॉलनीतल्या सर्व मायलेकी, सासवा सूना पहाटे सव्वाचार साडेचार पर्यंत आवरून, नटून थटून एकत्र मिळून देवीच्या दर्शनाला जायला निघत असू.
      इतरवेळी एवढ्या भल्या पहाटे बाहेर पडायचे म्हणजे कॉलनीतल्या भटक्या कुत्र्यांची आम्हाला फार भीती वाटायची पण ह्या दिवसात ती सुद्धा न भुंकता आमची अगदी देवळापर्यंत सोबत करायची. नदी कडून येणाऱ्या गार वाऱ्याने शरदातल्या थंडीची चाहूल लागायची. जसजसे देऊळ जवळ येई तसतसे देवळात लावलेली सुरेल गोड आवाजातली भक्तिगीतं अगदी अर्ध्या एक किलोमीटर लांब पासूनच ऐकू येऊ लागायची.  अत्यंत उत्साही, आनंदी  वातावरणात आणि गप्पांच्या नादात आम्ही कोयनेच्या जुन्या पूलाजवळ देवीच्या देवळाजवळ पोहचत असू.  त्या सबंध रस्त्या पासूनच मंदिरा पर्यंत रंगीबिरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई केलेली असे. झेंडूची पिवळी, केशरी ताजीताजी टपोरी फुलं, हार, जाईजुई मोगऱ्याचे सुवासिक गजरे आणि पूजेचं सामान टोपलीत विक्रीसाठी घेऊन रस्त्याकडेला उत्साहाने बसलेली बायका मूलं दिसत असत. मंदिराला लागून असलेल्या पटांगणातही निरनिराळी मातीची खेळणी, वस्तू घेऊन लोक विकायला बसलेले दिसायचे. त्याच आवारात कधीतरी छोटे स्टेज उभे केलेले असत. त्यावर प्रजापिता ब्राह्मकुमारीच्या साध्वी ध्यान लावून स्तब्ध बसलेल्या असत. त्यांना बिलकुल हलचाल न करता बसलेल्या बघून आम्हाला फार अप्रूप वाटायचं. मग आम्ही मुलं थोडा वेळ तिथेच रेंगाळून त्या कधीतरी हलतील ह्याची वाट बघायचो. कोणा मोठ्यांची हाक आली की मग पुन्हा त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना गाठायचो. 
     कधीकधी त्या नऊ दिवसात त्या स्टेजवर मुली देवीच्या नऊ अवतारांची रूपं धारण करून देखावे किंवा छोट्या नाटुकल्या सादर करायच्या. कोणी दूर्गा बनायची तर कोणी महिषासूर. पहायला खूप छान वाटायचे.
    मनात वाटत असे ,एवढ्या लवकर निघालोय आपण, आपलाच पहिला नंबर लागणार दर्शनाला. पण देवळाजवळ पोहचल्यावर मात्र हीsss भलीमोठी रांग दिसत असे. बायकांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा दोन रांगा केलेल्या असायच्या. मंदिराचे कार्यकर्ते दर्शनाचे सगळे नियोजन करायचे. आळीपाळीने महिलांना आणि पुरुषांना मंदिरात प्रवेश द्यायचे काम ते करायचे. रांगेत एकदीड तास उभे राहिल्यावर शेवटी दर्शनाला आमचा नंबर लागायचा. तिथे वाट अडवून उभा असलेला कार्यकर्ता एकदम दहाबारा लोकांना देवळात प्रवेश द्यायचा. सगळ्यांचा एकदम गोंधळ होऊ नये म्हणून असे टप्प्या टप्प्या ने छोट्या ग्रुप ना आत सोडायचे काम तो करायचा. कुठलीही गोष्ट सहज सरळ साध्य झाली तर त्याचे आपल्याला महत्व वाटत नाही नै. त्यामुळेच पहाटे लवकर उठून ,आवरून, चालत येऊन रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहून एवढी वाट पाहून मग मंदिरात प्रवेश मिळाला की एक आत्मिक समाधान मिळायचे.  
     देवीचे देऊळ तसे छोटे आहे. कोयना नदीकाठी ब्रिटिश कालीन जुन्या पुलाच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे देऊळ. मंदिराच्या अगदी गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन सर्वांना घेता येते. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार अगदी छोटे आहे. खाली वाकूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. आपला सगळा अहंकार,गर्व बाहेर सोडून नतमस्तक होण्याचाच तो क्षण. नाही वाकलो तर डोकं प्रवेशद्वारावर जोरात आपटणारच हे निश्चित.  कोयनेकडे मुख असलेली ही देवीची मूर्ती पूर्वेला स्थापन केली आहे. डाव्याबाजूला थोडीशी तिरकी झुकलेली मान असलेली आणि संगमरवरात रेखीव कोरलेली ही मूर्ती अत्यंत लोभस अशी आहे. असे म्हणतात की कृष्णाबाई आणि दैत्यनिवारणी नदीपात्राकडे पाहत असतात त्यामुळे त्यांची मान थोडी तिरकी झुकलेली आहे. नुसत्या तिच्या दर्शनानेच आपल्या मनावरचा सगळा भार हलका होऊन चित्त शांत होते.  गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन सर्वांचं तिला हळदीकुंकू वाहून ओट्या भरणं, साडी नेसवणे चालू असे. सोबत आणलेले हार ,फुलं आपट्याची पानं वाहून कडकण्यांच्या माळांचा ही नैवेद्य दाखवला जाई. देवळात माळा बांधल्या जात. तिच्या पायाशी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून आम्ही मंदिरात थोडावेळ बसत असू. देवीच्या दर्शनाने मन एकदम शांत प्रसन्न होई.

दैत्यनिवारणी ची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी...

कराडची ग्रामदेवता म्हणून दैत्यनिवारणीचा उल्लेख होतो भगवान विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने अमृतकुंभ आणण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण केले विश्रंतीसाठी तो कराड क्षेत्रावर थांबला असताना दैत्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी गरुडाने सुटका करून घेतली मात्र अमृत कलशातील काही थेंब पडले त्या क्षेत्राला आजही गरुडतीर्थ म्हणून संबोधले जाते

आसुरांचा संहार करण्यासाठी महाकाली  महालक्ष्मी ,महासरस्वती यांचे एकत्रित रूप देवांनी पृथ्वीवर पाठवले त्यांनी  आसुरांचा संहार केला . विश्रंतीसाठी त्यांना  देवांनी कराड क्षेत्रावर बोट दाखवले तेव्हापासून ही शक्तीदेवता दैत्यनिवारणी म्हुणुन कराडला वास्तव्यास राहिली .. अशी आख्यायिका सांगितली जाते. (ही माहिती गूगल वरून घेतली आहे.)

    थोडावेळ मंदिरात बसून मग आम्ही कोयनामाईकडे जायचो. तिथे आई आणि तिच्या मैत्रिणी नदीची पूजा करून द्रोणांमध्ये तुपाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडत असत. पहाटेच्या निळया प्रकाशात ते दिवे कोयनेवर तरंगत प्रवाहित होताना आम्ही बराच वेळ ते दिसेनासे होईपर्यंत पहात राहायचो. असे वाटे जणु ब्रह्माण्डातले ग्रह तारे च पृथ्वीवर आवतीर्ण होऊन कोयनेत विहार करत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानी, शांततेचे प्रसन्न भाव तरळत असायचे. 
     असे असीम आनंदाचे क्षण आम्ही स्मरणात कायमचे साठवून आहोत. त्यावेळी त्या क्षणांचं फारसं महत्व वाटलंही नसेल कदाचित आम्हाला पण आज ते आठवले की आमचं आयुष्य त्या अमूल्य क्षणांनी किती समृद्ध केलंय, श्रीमंत केलंय ह्याची जाणीव मात्र नक्की होते. 
     कोयनामाईला नमस्कार करून सूर्य उगवायच्या वेळी आम्ही सगळे घराकडे परतायला लागत असू. वाटेत लागणाऱ्या दोन तीन मंडळांच्या देवींचे ही दर्शन घेऊन मग घरी परतत असू. नवरात्र बसल्यापासून ते दसऱ्यापर्यंत नऊदहा दिवस रोज आमची अशी दर्शनयात्रा असे. उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येणारा असा हा आपला सण. दसऱ्यादिवशी देवीला आपट्याची पानं वाहून सगळ्यांना वाटून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करण्याची आपली प्रथा. "सोनं घे सोन्यासारखी रहा" असा डोक्यावर हात ठेवून  मोठ्यांनी दिलेला आशीर्वाद खऱ्या सोन्यापेक्षाही मौल्यवान वाटायचा. 
     नवरात्र बसल्यापासून रोज संध्याकाळी दसऱ्या पर्यंत कॉलनीमधे प्रत्येकाच्या घरी एकेक दिवस हादगा ही चाले. पाटावर हत्ती चं चित्र काढून त्याची पूजा करून आम्ही सगळ्या जणी  फेर धरून हादग्याची गाणी म्हणायचो. लहनमोठे सगळ्यांचा समावेश त्यात असायचा. शेवटी प्रत्येकीने करून आणलेली खिरापत ओळखायचा कस  लागायचा. त्यानिमित्ताने घरोघरी वेगवेगळे त्यातूनही लगेचच ओळखू न येणारे पदार्थ बनवण्याची जणू स्पर्धाच लागायची. प्रत्येकीची खिरापत ओळखून झाल्यावर तिथेच अंगणात बसून सगळ्यांना वाटून ती एकत्र बसूनच आम्ही खायचो. त्या सहभोजनाची गोडीच काही और होती. 
     देवीला कडकण्यांच्या नैवेद्याची प्रथा आमच्यात नसल्याने क्वचितच कधीतरी त्या आमच्या घरी केल्या जायच्या. पण देवीला नैवेद्य दाखवून झाला की दसऱ्याला हमखास सर्व शेजाऱ्यांच्यातून कडकण्या घालून ताटं आमच्यात यायची. पदार्थ एकच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र निरनिराळी असायची त्यामुळे चवीतही नावीन्य असायचे. प्रत्येकीच्या हातची चव वेगळी लागायची. कोणी रवा मैदा साखरेचा वापर करत तर कोणी अगदी पारंपारीक पद्धतीने कणिक आणि गूळ वापरून करत तर कोणी मैदा बेसनपीठ आणि साखर वापरून बनवत असत. सर्वच पध्दतीने केलेल्या कडकण्या आमच्या अगदी आवडीच्या आणि फस्त ही व्हायला वेळ नाही लागायचा. नवरात्रोत्सवाची सांगता व्हायची ती सोन्याची देवाणघेवाण करून आणि कडकण्या खाऊनच.
अशा सणावारी माझे मन माहेरच्या गोड आठवणींमध्ये एकदातरी फेरफटका मारून येतेच.
त्यातल्याच एक पारंपरिक पद्धतीच्या कडकण्या करण्याचा ह्यावेळचा माझा प्रयत्न.


कडकणी 

साहित्य:- 
१ वाटी गव्हाचे पीठ
१/४ वाटी गूळ
१ चमचा मीठ
पीठ मळण्यासाठी पाणी.
तळणीसाठी तेल 
कृती:-
*प्रथम गूळ पाण्यात विरघळवून घेऊन ते पाणी गाळून घेणे. म्हणजे गुळामध्ये काही कचरा असल्यास तो गाळून वेगळा होतो.
*पीठ अगदी घट्ट मळले जाईल एवढेच पाणी गुळात घालावे .
* त्या पाण्यात चमचाभर मीठ घालून गव्हाचे पीठ घालून घट्ट मळून घेणे.
* तो गोळा थोडेसे तेल लावून अर्धा तास मुरू दयावा. 
*एका कढईत तेल तापत ठेवावे.
*मुरलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून अगदी पातळ लाटून त्यावर काटेरी चमच्याने टोचावे. असे केल्याने कडकणी पुरीसारखी फुगत नाही.
* गरम तेलात मंद आचेवर कडकण्या तळून घ्याव्यात. 
*गार करून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. 
*तशा टिकू शकतात बरेच दिवस पण जर लगेच फस्त नाही झाल्या तरच. 😊

बोला ।। दैत्यनिवारणीचा उदो उदो।।🙏🌺😇

।।सोनं घ्या सोन्यासारखे रहा।। 😊

© सौ.श्वेता अनुप साठये
८/१०/२०१९

दैत्यनिवारणीचा फोटो गुगलच्या सौजन्याने.