#वाराणसी
भाग २
अयोध्या ,प्रयागराज
दोन दिवस काशी मधील बरीचशी पुरातन मंदिरं पाहून आम्ही तिसऱ्या दिवशी पहाटे अयोध्येला गेलो. तिथे पोहचेपर्यंत अकरा वाजून गेले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा त्यातून हायवे पासूनच वाहनांना गावात जायला बंदी घातली होती. कावडी यात्रेकरूंची इकडेही खूप गर्दी होती. त्यामुळे सर्व पायी पाहायला लागणार होते . त्यात दुपारी बरीचशी मंदिरं बंद असतात हे कळले. थोडा मूड ऑफ झाला. राममंदिर बांधकाम ची site, सीता रसोई आणि एकदोन मंदिरं कशीबशी पाहता आली. नंतर सगळी बंदच झाली.
तिथून निदान शरयू नदीचे दर्शन घ्यावे म्हणून भर उन्हात चालत शरयू नदी पाहायला गेलो. तीर्थ बाटली मध्ये भरून घेतले, मस्तकाला, डोळ्यांना लावून मार्जन केले. उन्हाच्या तडाख्यात फिरणं मुश्किल होऊ लागलं. त्यामुळे तिथून लगेच निघून प्रयागराज गाठायचे ठरवले. कदाचित राम मंदिर पूर्ण झाल्यावर परत सगळं पाहायला यायचा योग असेल अशी आशा करून अयोध्येचा निरोप घेतला.
संध्याकाळ पर्यंत प्रयागराज ला पोहचलो. शहर मोठं,सुंदर आहे. खूप डेव्हलपमेंट दिसली. त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरून त्रिवेणी संगमावर गेलो. पहाटे रस्त्यात चौका चौकात बासरी, सतार, वीणा वादना चे, संगीत speaker वर लावले होते ते सुमधुर सूर ऐकू येत होते. गंगा यमुना सरस्वती असा हा त्रिवेणी संगम. कुंभमेळा याच क्षेत्री भरतो.
तिथून एका नावेत बसून आम्ही संगमाच्या मध्यभागी गेलो. सूर्योदय होत आला होता. पहाटेचं अतिशय आल्हाददायक असं वातावरण होतं. त्रिवेणी संगम तिर्थाने मार्जन केले. सोबत रामेश्वरम् तीर्थ, रामसेतू नेले होते त्याचे शिवलिंग बनवून दोघांनी यथासांग पूजा केली. रामेश्वरम तिर्थाचे आणि संगमतील तीर्थाचे अर्घ्य उगवत्या सूर्याला दिले. नद्यांना श्रीफळ अर्पण केले. डोळे मिटून थोडावेळ ध्यानस्थ बसून राहिलो. पवित्र त्रिवेणी संगमाचे तीर्थ मस्तकाला, डोळ्यांना लावून, थोडे बाटली मध्ये ही भरून घेतले. आणि सूर्योदय झाला. नदीपात्रात सूर्याची कोवळी किरणं लाटांवर आरूढ होऊन चमचमु लागली. त्यांच्या तेजाने संगामातील पाण्याच्या लाटाही उजळून निघाल्या. असीम शांतता, प्रसन्नता याचा प्रत्यय त्या प्रत्येक क्षणात अनुभवत होतो. त्यावेळच्या आमच्या मनातील भावना इथे शब्दात मांडणे कठीण आहे. नावेनी थोडावेळ संगमात त्या सूर्य किरणांनी तेजाळलेल्या लाटांसोबत विहार करत काठावर आलो. नद्यांना आणि त्या दोन नावाड्यांनी ही आम्हाला यात्रा घडवली म्हणून त्यांनाही नमस्कार करून तिथली बाकीची मंदिरं पाहायला निघालो.
* बडे हनुमान मंदिर (लेटे हनुमान)
*आदि शंकराचार्य स्थापित महादेव, मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर
* आलोपी माता मंदिर( शक्ती पीठ आहे. निर्गुण रुपात पूजा होते. एक पाळणा आहे त्याखाली मोठे कूप/विहीर आहे...बंदिस्त आहे... त्यामध्ये माता सतीचे अवशेष पडले होते अशी अख्यायिका...त्याची पूजा केली जाते.
वेळे अभावी दिव्य वड आणि किल्ला लांबूनच पाहिला.
तिथून परत वाराणासीला परत जाताना विंध्यवासिनी आणि सीतामढी पाहायचे ठरवले .
विंध्याचलावर गंगा किनारी विंध्यवासिनी देवीचे मंदिर आहे.
विंध्यवासिनी/ योगमया /महामाया
अशा इतर नावांनी देखील प्रसिध्द असलेली पराशक्ती रुपी देवी, दुर्गेचे रूप. ही यशोदा आणि नंदा ची मुलगी. वसुदेवाने नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला मित्र नंद यशोदेकडे सुरक्षित सुपूर्द केले आणि नंदाने आपली नुकतीच जन्मलेली मुलगी वसुदेवाला दिली.
कंसाने वसुदेव देवकीच्या इतर मुलांप्रमाणेच हिला ही मारायला उचलले तशी ही त्याच्या हातून निसटून महामाया रुपात प्रगट झाली . ही पराशक्ती कंसाला त्याच्या वधाची आकाशवाणी ऐकवून विंध्याचलावर गेली विंध्यवासिनी रुपात भक्तांसाठी तिथेच वसली. शक्तीपीठ... कृष्ण बलराम यांची ही बहीण.
जागृत देवस्थान आहे. देवी ची मूर्ती खूप सुंदर आहे.
इथेही गंगेपासून मंदिरा पर्यंत कॉरिडॉर बनवण्याचा प्लॅन आहे असे ऐकले. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि गावातील रस्त्यांची दुरावस्था आणि अस्वच्छता दूर होईल अशी आशा करू. सीता मढी वेळेत होऊ शकले नाही. त्यामुळे ते skip करून तिथून संध्याकाळ पर्यंत वाराणसीला परत येऊन पुढच्या दोन दिवसांच्या planning मध्ये आम्ही गढून गेलो.
||जय श्रीराम||🙏🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा