गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

महापूर


"महापूर"

     आई कशी ना अगदी जन्मापासूनच आपल्या लेकरांची काळजी घेत असते. हवं नको ते पाहते. जेवणखाण, कपडेलत्ते ,सर्व सर्व काही तैनात ठेवते. मायेनं आंजारते गोंजारते. अगदी त्यांचे भरपूर लाड पुरवते . सर्वतोपरी चांगली शिस्त लावायचाही आटोकाट प्रयत्न करते. कधी प्रेमाने समजावून तर वेळप्रसंगी नाहीच बधली तर पाठीत दोन रपाटे घालूनही.

         काही मुलं कशी अगदी शांत, तिचं सर्वकाही ऐकणारी, तिला घर आवरण्यात मदत करणारी , तिच्याकडून बरंच काही शिकणारी तिचा आदर करणारी असतात . पण काही जणं मात्र तिनं कितीही प्रेमानं सांगितलं ,शिस्त लावायचा प्रयत्न केला तरी तिला अज्जिबात न जुमानणारी असतात. त्यांना हवं तेच आणि हवं तशीच मनमानी करणारी असतात. काही केल्या ती बधत  नाहीत. कितीही समजावले तरी त्यांची ऐशारामी ,आयदी वृत्ती काही जात नाही. घरभर वस्तूंचा पसारा, कपड्यांचे ढीग, वस्तूंची मोडतोड, बेशिस्तीचा कारभार नुसता.  त्यामुळे आईला त्रास होतोय, ती दुःखी होतीय , बऱ्याचदा स्वतःच्या इच्छा आकांक्षाही बाजूला ठेवून आपल्यासाठी झटतीय हे गावीच नसते त्यांच्या. एवढं तिला गृहीतच धरून चालतात. कधीतरी मग तिच्याही भावना अनावर होतात आणि ती मग दुर्गेचं रूप धारण करते. नाठाळ मुलांना ओरडते, रागोभरते. भरपूर धपाटे घालते पाठीत. चांगली बडवून काढते आणि मग मारल्यावर वाईट वाटलं म्हणून मनाचा बांध फुटून स्वतः च रडरड रडते. आसवांचा अगदी पूर येतो. चिंता एकच असते तिला की ह्या मुलांना मी कशी सुधारू?
     आईच  ती! , तिच्या रागाने घाबरून कोपऱ्यात उभ्या असलेल्या मुलांना पुन्हा काळजाशी घेऊन कवटाळते. मुलं ही मग कावरी बावरी होऊन तिचे डोळे पुसायला जातात. "आम्ही आता छान नीट वागू "अशी हमी देतात. तिचा आलेला राग कुठल्याकुठे पळून जातो. तिही लेकरांना प्रेमाने समजावते आणि पुन्हा 'शहण्यासारखं वागा आता ',असं म्हणून परत पसरलेलं घर हसतमुखाने सावरायला जाते.

     तसंच असेल का हो आपल्या आई, वसुंधरेचं?

     कित्ती कित्ती करते नै ती आपल्यासाठी. आजपर्यंत  काही म्हणून कमी पडून दिलं नाही तिनं आपल्याला खरं तर. भाजीपाला, फळफळावळ, गुरं ढोरं , दूध दुभतं, बाग बगीचे ,शुद्ध ,पवित्र पाण्याच्या नद्या विहिरी, तळी डोंगर दऱ्या, जंगलं ,अथांग समुद्र सर्व सर्व काही. यादी अगणित आहे. पण आपल्या सारख्या तिच्या हट्टी लेकरांनी मात्र तिला फारच गृहीत धरलं. मन मानेल तसं वागत राहिलो. आपल्याला हवं तेच करत राहिलो. तिनं बनवलेल्या सुंदर सृष्टीत... जगभरात प्लास्टिकचा पसारा मांडून बसलो. नद्या नाल्यांमध्ये विषारी पाणी बिनदिक्कत सोडत राहिलो . प्रदूषणाने ती अगदी गुदमरून गेली तरी आपल्या लक्षात आलं नाही. तिनं नेसलेल्या तिच्या आवडीच्या हिरव्याकंच शालूची तर आपण फाडून फाडून पार अगदी लक्तरं करून टाकली. वाहत्या नद्या नाले  मिटवून त्यावरही इमारती बांधून रिकामे झालो. तिच्या मनाचा थोडाही विचार केला नाही. की तिला समजून घेतले नाही. किती सहन करेल बिचारी?
      परवा  मग ती फारच चिडली. दुर्गेचंच रूप तिने जणू धारण केलं. विजेच्या कडकडाटाने सर्वांवर रागावली. "काय केलं म्हणजे ही लेकरं सुधारतील ?", मनामधे तिच्या काहूर उठलं. विचारांनी तिचं मन फार उद्विग्न झालं. आभाळ दाटून आलं. तिची सहनशक्ती पार संपून गेली. भावनोद्रेकाने तिच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धाराच्या धारा वाहू लागल्या. सर्वदूर त्या अश्रूंच्या पाण्याने महापूर आला. कृष्णा कोयना पंचगंगा अगदी दुथडीभरून वाहू लागल्या. आजूबाजूचं सगळं कवेत घेत निघाल्या. सर्वांची घरं दारं, गुरं ढोरं, शेतीवाडी सर्वच्यासर्व आसवांच्या पाण्यामधे वाहून जाऊ लागलं. सर्वजण घाबरून सैरावैरा धावू लागले. सर्वांचे हाल बघवेना झाले.  प्रलयच आला . रडून रडून डोळ्यातली आसवंही संपली तिच्या. पूर तर ओसरला पण दुःखी मनाने आहे तशीच अजून बसून.

     काढुयात का हो समजूत तिची? आवरूयात का आपण सर्व जगभरचा प्लास्टिकचा पसारा? सांगूयात तिला ,'आता खरंच नाही करणार प्रदूषण आणि नद्यांनाले दूषित.' तिचा आवडीचा आपण फाडलेला हिरवा शालूही देऊयात की परत शिवून...वर त्याच्या भरजरी फुलांचे रंगबिरंगे बुट्टेही विणून.
     सरतेशेवटी आईच आहे की आपली ती . घेईल हृदयाशी कवटाळून . करेल आपल्याला माफ. हसेल पुन्हा एकदा छान आणि करेल परत मायेचा वर्षाव . बघुयात प्रयत्न करून.
©®सौ.श्वेता अनुप साठये
२१/०८/२०१९
फोटो गुगलवरून

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

चकुल्या

20/12/2018
©श्वेता मोघे साठये

"चकुल्या"

     "चकुल्या"! हो , असंच म्हणायची ती. गोरी गोरी पान, फुलासारखी छान! अगदी तशीच होती ती . लहान वयात लग्न होऊन शेजाऱ्यांच्यात आली आणि तिच्या हसतमुख , मनमिळावू स्वभावाने आमच्या आख्या कॉलनीचीच ती लाडकी वहिनी बनून गेली . तिचं ते खळखळून हसणं. आलेगेले , पै पाहुण्यांचं अगत्याने स्वागत करणं. त्यांचा पाहुणचार करणं. हौशी होती ती फार. संकटांना ही अगदी हसत मुखानं सामोरी जाणारी ती. अजूनही डोळ्यांसमोर तिची जशीच्या तशी प्रसन्न करणारी मूर्ती उभी राहते.
     खाण्याची आणि खिलवण्याची भारी हौस होती तिला. आम्ही माहेरवाशिणीनी माहेरी पाऊल ठेवले की धावत येऊन हसऱ्या चेहऱ्याने पहिल्यांदा स्वागताला हजर असायची. "आलीस का गं बाय", म्हणून मायेची विचारपूस असायची तिची. गाठभेट घेऊन झाली की घरी जाऊन जेवणाच्या वेळे आधी गरमगरम पदार्थांनी भरलेलं ताट आणून द्यायची. "चला, खावा गरम गरमच" , असा सोबत प्रेमळ आग्रहही असायचा. आम्हीही आनंदाने मग गप्पांच्या मैफिलीत त्या पदार्थांवर तुटून पडायचो. वडे, शिरा ,भजी, ब्रेड रोल्स असा साग्रसंगीत असे त्या ताटाचा थाट . आमच्या पिल्लांना मग सोबत घेऊन जाऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी करत , घरातली मांजरी, कुत्र्यांची पिल्लं दाखवत, त्यांना खेळवत, त्यांच्या आवडीचा खाऊही बनवून मुलांना  प्रेमाने खायला घालत असे.
     दर सोमवारचा उपवासाचा दिवस. संध्याकाळचा चकोल्यांचा बेत असायचा. सोमवार म्हंटलं की चकोल्या असं गणित ठरलेलंच असायचं. आम्हाला सगळ्यांना तिच्या हातच्या चकोल्या फार आवडायच्या. माहीत होतं तिला. मग सकाळीच येऊन सांगून जायची," संध्याकाळी चकुल्या देतीया. बाकी काय करू नका." त्या दिवशी संध्याकाळची वाट बघण्यातच मग आमचा दिवस सरायचा . पातेलं भरून गरमागरम चकोल्या रात्रीच्या जेवणापर्यंत हजर असायच्या. घरभर त्या चकोल्यांचा वास असा काही दरवळायचा की आमच्या पोटातले कावळे काही धीर धरायचे नाहीत. मग आम्ही सगळे त्या चकोल्यांवर मनसोक्त ताव मारायचो. तृप्त व्हायचो.  माहेरपणाला आल्यावर मिळणाऱ्या तिच्या ह्या प्रेमाने आणि  आपुलकीने  मन भरून यायचं.
     दर सोमवारी नित्यनेमाने चकोल्या करणारी आमची ही लाडकी ,सुगरण वहिनी आता साक्षात शिवपार्वतीलाच तिच्या हातच्या ,"चकुल्या" करून खायला घालायला गेलीय. हसत हसत च. तृप्त झाले असतील तिकडे  शिवपार्वतीही .

"चकुल्या"
साहित्य---
कांदा -1,
खोबऱ्याचा तुकडा,
दहा पोळ्यांची मळलेली कणिक, थोडा पुदिना 10,12 पानं , कोथिंबीर मूठभर, कढीपत्ता-8,10 पानं,
कांदा लसूण मसाला 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा,
 तुरीच्या डाळीचं वरण वाटीभर, मीठ, पाणी,
तेल फोडणीसाठी 2,3 चमचे, जीरे, मोहरी,हिंग,हळद.

कृती--
*कांदा साल काढून, खोबरं विस्तवावर भाजून घेऊन खोबऱ्यावर थोडे जिरे भुरभुरावेत.
*भाजलेला कांदा, खोबरं, जीरे, कोथिंबीर,पुदिना,कढीपत्ता,कांदा लसूण मसाला,मीठ सर्व जिन्नस मिक्सर मधून वाटून घ्या.
* कढईत तेल तापवून, जीरे, मोहरी,हिंग,हळद, घालून फोडणी करा नेहमीप्रमाणे.
त्यात वरील वाटण घालून किंचित परतवून हवे ठेवढे पाणी ,चवीप्रमाणे मीठ घाला. उकळी येऊ द्या.
* कणकेची पातळ पोळी लाटून त्याच्या चकत्या पाडून त्या उकळणाऱ्या पाण्यात सोडा.
* शिजत आल्यावर वरण घाला .
*एक दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करा.
* गरम गरम ' चकुल्या ' वर तूप घालून सर्व्ह करा.


©सौ श्वेता अनुप साठये


मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

गव्हाच्या चीकाच्या वड्या


🌺बॉम्बे हलवा/माहीम हलवा , चीकाच्या वड्या🌺

आज संकष्टीनिमित्त गणपतीला नैवेद्यासाठी माहीम हलवा बनवला. 
असं वाटलं बाप्पा ही नुसते मोदक खाऊन कंटाळत असेल नै, 😄 म्हणून जरा व्हरायटी नैवेद्यात. 

गव्हाचा चीक खायची इच्छा झाली होती म्हणून गहू घातले होते भीजत तीन दिवसांपासून. आज त्याचा चीक काढला. थोडा तसाच कुरडयांसाठी उकडतो तसा उकडून मस्त तूप तिखट घालून खाल्ला एकदम वाटी चाटून पुसून. पण मुलाला काही फारशी अशी चव आवडत नाही. खा ,खा, म्हणून मागे लागून आणि पौष्टिकपणाचे गोडवे गाऊन, बरंच समजावून झालं पण काही उपयोग होईना. त्याच्या पोटात हा पौष्टिक पदार्थ कसा जाईल अशा विचारात होते ," खीर करावी का? की त्याला साखर घालून देऊ? " तेवढ्यात आईचा फोन आला नातवाला परीक्षेसाठी बेस्ट लक द्यायला. नेहमीप्रमाणेच लगेच मी तिला माझी काळजी बोलून दाखवली . तिच्याकडे एकवीस अपेक्षित गाईड सारखी असतातच उत्तरं तयार माझ्या कुठल्याही प्रश्नांना.
आईने सांगितले ह्याचा माहीम हलवा /बॉम्बे हलवा कर चितळेंच्यात मिळतो तसा मग बघ कसा चट्टामट्टा करून संपवेल ते. 😊
माझी तर एकदम ट्यूब च पेटली. 😇 म्हंटलं हे नक्की खाणारच तो. 
लागले तयारीला...
आईने सांगितल्या प्रमाणे एक वाटी साखरेचा साधारण एकतारीच्या अलीकडचा पाक केला त्यात गव्हाचा अर्धी वाटी चीक,आणि चमचाभर  तूप घालून गॅस मंद ठेवून एकसारखं मिश्रण हलवत राहिले. चीक घट्ट होत आल्यावर त्यात केशरी रंग,  रोझ इसेन्स, सुक्यामेव्याचे काप घातले . चांगलं एकजीव होऊन काढाईपसून सुटून येईपर्यंत चीक चमच्याने हलवत राहिले. छान गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ताटात तो गोळा ओतून एकसारखा थापून गार झाल्यावर वड्या पाडल्या. 

आता दुसऱ्या पद्धतीचा...

दीड वाटी दूध, एक वाटी चीक, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर सगळं छान एकजीव करून कढई मंद गॅस वर ठेवून हे मिश्रण एकसारखं चमच्याने ढवळत राहिले. वरीलप्रमाणेच छान गोळा तयार होत आल्यावर त्यात वेलदोडापूड, सुक्यामेव्याचे काप घालून तो गोळा छान एकजीव होईपर्यंत चमच्याने हलवत राहिले. त्यात गाठी होता कामा नये असं एकजीव व्हायला हवं. तो गोळा अल्युमिनियम फॉईल वर घालून त्यावर केशराच्या काड्या घालून वरून परत दुसरी फॉईल त्यावर घालून लाटण्याने मिश्रण गरम असतानाचअगदी पातळ होईल असे लाटून घेतले . व्यवस्थित गार झाल्यावर आयताकृती काप केले . 
तयार माहीम हलवा, बॉम्बे हलवा. 

असा कलरफुल हलवा पाहून मुलानेच बाप्पाला पटकन नैवेद्य दाखवला आणि काहीही आढेवेढे न घेता मस्तपैकी गट्टम पण केला . 
माझ्या एकवीस अपेक्षितच्या गाईडच्या उत्तराचे शंभर पैकी शंभर गुण ही मिळाले. परत एकदा मी मनोमन सरस्वती,अन्नपूर्णा रुपी माझ्या आईला नमस्कार केला. आणि देव्हाऱ्याजवळ जाऊन नमस्कार करायला वाकले, समईच्या उजेडात पाहते तर बाप्पाही माझ्याकडे पाहून गालातल्या गालात स्मित करत होता.😊

गणपती बाप्पा मोरया!🌺

© सौ. श्वेता अनुप साठये
२२/२/२०१९



शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

"अक्काची आमटी"

"अक्काची आमटी"

     आक्का, माझी आजी, आईची आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. 😊 एकदम शांत, सात्विक,सोज्वळ, हसरी अशी नऊवारीतील शिडशिडीत बांध्याची छोटीशी मूर्ती. तिच्या हातचे सर्वच पदार्थ म्हणजे साक्षात अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद.
     माझं आजोळ कोल्हापूर. मोठ्ठं घर. पुढे मोठ्ठालं अंगण तर मागेही मोठ्ठं परसदार. आजुबाजूला भरपूर फ़ुलं , फळं झाडं. घरामध्ये माजघरात कडीपाटाला टांगलेला मस्त मोठा सागवानी झोपाळा. आमचा गोतावळा तसा मोठाच. पाच मावश्या आणि एक मामा. आम्ही सर्व मिळून मावस मामे भावंडं वीस जणं.
     मे महिन्याची सुट्टी लागली रे लागली की मामाच्या घरी जायची ओढच लागायची. सर्व भावंडं सुट्टीत कोल्हापूरला जमायचोच. भरपूर खेळ, दंगा, मस्ती. मोठ्ठी भावंडं आम्हा लहान भावंडांना अगदी मस्त मायेने सांभाळायची.
     सकाळी सगळे लवकर उठून , आवरून आम्ही पहिला कट्ट्यावर म्हशीचे धारोष्ण दूध प्यायला जायचो. मोठया पितळी ग्लास मधून फेसळलेलं दूध पिऊन दिवसाची सुरुवात होत असे. मग समोरील बागेत , अंगणात, परसात खेळत अगदी धुडगूस घालत असू. थोडी उन्हं वर यायला लागली की अंगणातून आम्ही आत माजघरातल्या झोपळ्यावर झोके घेत बसायचो. एकीकडे दादांची (आजोबांची) देवपूजा चालू असायची. चंदन ,गंध,फुलांच्या, उदबत्तीच्या वासाने वातावरण अगदी सुगंधाने दरवळून जायचे. झोके घेत ती पूजा अगदी तल्लीन होऊन पाहत राहायचो. तर एकीकडे अक्काच्या हातचा स्वयंपाकाचा सुवास सगळीकडे दरवळत राहायचा.
अहाहा!! 😇
     त्यातून आक्काच्या आमटीचा वास तर अप्रतिमच. अगदी अंगणात जरी खेळत असू तरी तिथपर्यंत तो वास दरवाळायचा आणि नुसत्या त्या आमटीच्या वासानेच आम्ही घराकडे जेवण्यासाठी धाव घ्यायचो. 😊खेळून खेळून जाम भूकही लागलेली असायची.
     एकीकडे दादा देवांची आरती करत असत तर दुसरीकडे आक्का, आई,मावश्या,मामी सर्वांची पाने वाढायला सुरवात करीत असत. दादांनी दिलेलं देवाचं तीर्थ घेऊन आम्ही वाढलेल्या पानांवर जाऊन बसत असे.
     त्यात एक मोठया मण्या मण्याचं स्टीलचं नक्षी असलेलं ताट आम्हा सर्वांचच लाडकं होतं. त्या ताटात जेवण्यावरून आम्हा भावंडांची नेहमी भांडभांडी चाले. मग सरतेशेवटी रोज एकेकाला त्यात जेवायला मिळेल अशा समझोत्यावर समजूत निघे.
     आक्का मस्त मोठया पितळी तपेल्यात भात शिजवत असे . आणि मोठ्या पितळी पातेल्यात आमटी बनवत असे. पातेल्यात गोडतेल घालून ते चांगलं तापलं की त्यात मेथ्या,जीरे, मोहरी,हिंग,हळद, कढीपत्ता घालून फोडणी चांगली तडतडली की मगच त्यात शिजवून घोटून घेतलेली डाळ घालून मग क्रमाक्रमाने इतर जिन्नस पडत असत. तो खास फोडणीचा आवाज आणि सुवास मला स्वर्गसुख देणारेच वाटे.
     सर्वजण पंगतीत येऊन बसलो की एकसुरात "वदनी कवळ घेता" म्हणत असताना एकीकडे आक्का तो गरमगरम पहिल्या वाफेचा पांढरा शुभ्र भात तापेलीतून उकरून मोठ्या ताटात घेऊन एकेकाला वाढत असे.सोबत तिने केलेल्या लिंबाचे गोड लोणचे आणि नंतर पातेल्यात रटरट उकळत असलेली गरमागरम आमटी छोट्या पातेल्यात काढून घेऊन वाटीत वाढत असे.वरून मस्त लोणकढ तूप.
     शेवटचं एकदाचं "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" अशी प्रार्थना भरभर उरकून आम्ही त्या आमटी भातावर हल्ला करून यथेच्छ ताव मारायचो. तो आक्काच्या हातचा आवडीचा आमटी भात ओरपून खाऊन मन अगदी तृप्त होत असे. शेवटी ताजं ताजं बनवलेलं आणि वर पांढरा शुभ्र मऊ लोण्याचा गोळा असलेलं ताक पिऊन आमच्या यज्ञाकर्माची सांगता मोठी ढेकर देऊन होत असे.
     प्रत्येक नातवंडाच्या चेहऱ्यावर अक्कचा ममतेने भरलेला मायेचा मऊ हात फिरत असे. "भरले का बाळा पोट?" अशी मायेची विचारपूस.
     आता अक्का काही राहिली नाही.पण तिची मायेची आठवण मात्र सदैव मनाच्या कप्यात जपून जतन करून आहे.
     आता माझा मुलगाही माझ्या माहेरी गेल्यावर आईकडे म्हणजे त्याच्या आजीकडे आमटी भाताचीच फर्माईश करतो. आणि मलाही नेहमी आमटी करताना बजावतो,"आई ,आजीसारखीच आमटी कर अगदी." 😊
अक्काच्या आमटीचा वारसा आता आई चालवत आहे.
     मी आमटी करते पण अजून अक्काच्या "त्या" आमटीची सर काही येत नाही, घटक पदार्थ तेच असले तरी.
     अक्काच्या आमटीचा वारसा चालवायच्या प्रयत्नात ....
                      सौ.श्वेता साठये  😊
"अक्काची आमटी"
साहित्य:-
एक वाटी तुरीची डाळ
दोन चमच गोडे तेल
एक चमचा मेथ्या
दोन चमचे मोहरी
एक चमचा जीरे
अर्धा चमचा हिंग
एक चमचा हळद
थोडा कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेचा कोळ दोन चमचे
दोन लिंबाएवढा गूळ
मीठ चवीनुसार
दोन चमचे गोड मसाला
तीन/चार चमचे लाल तिखट (ब्याडगी)
भरपूर माया 😊
कृती:-
प्रथम तूरडाळ धुवून त्यात डाळीच्या वर दोन पेर पाणी घालून त्यात चिमूटभर हिंग, हळद ,एक चमचा तेल घालून कूकरमध्ये चार शिट्या देऊन शिजवून घ्यावी.
शिजलेली डाळ चांगली रवीने घोटून एकजीव करून घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात क्रमाने मेथ्या , जीरे,मोहरी,हिंग, हळद, घालून फोडणी चांगली तडतडली की लगेच कढीपत्ता, घालून  त्यावर घोटलेली डाळ ओतावी. त्यात  दोन ते तीन ग्लास पाणी घालून एकसारखी ढवळून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, तिखट,गोडा मसाला, गूळ घालून छान उकाळवी. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून एक उकळी आणून गॅस बंद करावा.
तयार मस्त " अक्काची आमटी"😊
सौ श्वेता अनुप साठये













बोडण


"बोडण"
२० वर्षांपूर्वी माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि कोकणस्थांच्यात केला जाणाऱ्या एका छान कुलाचाराची मला ओळख झाली. 😊 "बोडण"
शुभ कार्या नंतर घरामधे केला जाणारा कुलाचार.
देवाचं करण्याची मुळातच मला लहानपणापासून आवड .
त्यामुळे थोडे अवघड वाटले तरी खूप मनापासून केले जाते आणि त्यामुळे घरात " बोडण" झाले की मला खूप समाधान आणि मनःशांती मिळते. प्रसन्न वाटते.
परवाच एका कार्याचं "बोडण" मी घरी केले.
चार सवाष्णी आणि एक कुमारीका अशा पाच जणींनी मिळून परातीमधे अन्नपूर्णेची पूजा करून त्यामधे महानैवेद्य कालवायचा. कुमारीका जे मागेल ते पंचामृत वरुन दूध, तूप, मध,साखर,दही परातीत घातले जाते. कुमारीकेचा मान असतो. 😊
नंतर सर्वांनी मिळून सहभोजन घ्यावे.
सौ.श्वेता अनुप साठये ✍️








मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

श्रीगणेशा

   


                                                




  कृष्णा कोयनेच्या  कुशीत वसलेल्या छोट्याशा गावचा माझा जन्म. निसर्गाच्या वैभवाने नटलेलं, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेलं असं माझं गाव. त्यामुळेच  निसर्गाच्या सानिध्यात, चित्रकलेत आणि आई आणि आजी कडून वारसाने आलेल्या पाककलेत मी रमून जाते.
     लेखनाच्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी नातेवाईकांना घरातील वडीलधारी मंडळी सांगतील त्याप्रमाणे शुभेच्छांची आणि खुशालीची पोस्टकार्ड लिहीण्या इतपतच माझी काय ती मजल होती. बाकी शाळाकॉलेजात असताना अभ्यासक्रमात असलेले निबंध लिहिले असतील तेवढेच काय ते. लग्नानंतर मी अभिमानाने गृहिणीपद भूषवते आहे. 
     प्रापंचिक जबाबदऱ्यांमधून थोडीशी उसंत मिळाल्यावर जरा भीत भीत च फेसबुक अकाउंट काढणारी मी आणि सुरवातीला नुसत्या इतरांच्या पोस्ट ना लाईक्स आणि कंमेंट्स देणारी मी हळूहळू  अगदी सराईतपणे social मीडियावर वावरू लागले. हाती घेतलेलं हे व्रत सोडून देणं म्हणजे केवळ अशक्य.😀  " तू ही लिहू शकतेस, लिहीत जा ", असे कौतुक करून आत्मविश्वास मिळवून देणारे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामुळे  चक्क छोटे छोटे लेख लिहिण्या पर्यंत अगदी आता मी मजल मारली आहे. सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मला हे साध्य होत आहे. या सर्वांच्या आणि हो ,माझ्या लेखांवर मिळणाऱ्या लाईक्स आणि कंमेंट्स पाहून माझ्यापेक्षाही जास्त खूश होणाऱ्या माझ्या नवऱ्याच्या प्रेमळ आग्रहाचा मान राखून "अनुश्वेत" हा ब्लॉग काढण्याचा मानस केला.

    नेहमीप्रमाणेच आताही माझ्या ह्या ब्लॉग काढण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयत्नाचे यश हे तुम्ही दिलेल्या प्रतिसादातच आहे. 

चला तर मग माझ्यासवे "अनुश्वेत" च्या सफरीवरी

करीन म्हणते सादर इथुनी , काही आठवणीतले मोती आणिक चटपटीत गोड पाककृती

जोड असेल तयास माझ्या रंगबिरंगी चित्रांची

मनास भावे ते ते, लेखणीतूनी सादर करेन "अनुश्वेती"

सौ. श्वेता अनुप साठये