श्री महालक्ष्मी मंदिर, डोड्डगड्डवल्ली , हसन
हाळेबीड ,बेलूरची मंदिरं तर जगभर प्रसिद्ध आहेत. बेलूरच्या अलीकडे हसन जिल्ह्यात डोड्डगड्डवल्ली या गावात असेच एक हे श्री महालक्ष्मी मंदिर आहे. महालक्ष्मी ही नेहमी बसलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. पण कोल्हापूरची आंबाबाई, आणि ही महालक्ष्मी या दोनच उभ्या स्वरूपात पाहायला मिळतात. अकराव्या/ बाराव्या शतकात हे सुंदर मंदिर बांधले गेले. चार दिशांना चार मंदिरं एकाच सभामंडपाने जोडली गेली आहेत.
मुख्य मंदिर हे महालक्ष्मीचे आहे ते पूर्वेला आहे.उत्तरेला कालीदुर्गा,ही मूर्ती सौम्य स्वरूपातील पाहायला मिळते. बंगालमध्ये रुद्र काली असते. पश्चिमेला शंकराची पिंडी आणि नंदी आहे. आणि दक्षिणेला विष्णूची सुंदर मूर्ती होती ती आता इंग्लंड मध्ये museum मध्ये आहे असे गाईड ने माहिती दिली. त्याजागी आता एक छोटी मूर्ती पूजेसाठी स्थापन केली आहे. काली दुर्गा समोर विष्णु...महालक्ष्मी समोर महादेव असे बहिण भाऊ समोरासमोर असलेलं असं हे दुर्मिळ मंदिर. मुख्य महालक्ष्मी मंदिराचा आवार इतर मंदिरांपेक्षा मोठा आहे आणि चौकटीवर गजलक्ष्मी कोरलेल्या पाहायला मिळतात.
मंदिराच्या छतावर प्रत्येक दिशेच्या देवतांची सुंदर रेखीव शिल्पे कोरलेली आहेत. इंद्र शुचि, नैऋती, अग्नी, पवन देव. बाकीही दुर्मिळ शिल्पकला , कोरीव काम पाहायला मिळाले. कमळ मंडल , वेताळ दोन प्रकारचे एक भारतीय शैली, दुसरी इजीप्शीयन...योग नरसिंह, चामुंडा , गजलक्ष्मी... बऱ्याच मूर्ती चोरीला ही गेल्या आहेत. काही भग्नावस्थेत आहेत. आता थोडी डागडुजी चालू आहे. सगळी मिळून नऊ मंदिरं आहेत. उत्तरभारतीय नागर कदंब शैलीतील ही शिखरं आहेत. प्रत्येक शिखरा जवळ एक सिंहाचे शिल्प आहे वेगवेगळ्या चहु दिशांना त्यांची मुखं आहेत. द्रविड शैलीतील महालक्ष्मी मंदिर शिखर सर्वात मोठे आहे. होयसला स्टाईल ने बांधलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. तसं दुर्लक्षित आहे. बाजूला छोटा तलाव आहे. गावात आजूबाजूला इतर ही मंदिरं आहेत. हे मंदिर फारसं कुणाला माहीत नाही त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती. गाईड ने खूप छान माहिती दिली.
सौ श्वेता अनुप साठये