रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

आनंदवन

आनंदवन 

     वर्ध्याहून मिनीबस ने निघालो. वाटेत हरभरा ,कापूस , तांदूळ शेती भरपूर प्रमाणात दिसते. कापसाची अशी मोठ्या प्रमाणात शेती पहिल्यांदाच पाहीली. मेंढपाळ, गुराखी शेळ्या आणि गायींचे कळप च्या कळप घेऊन शेताकडे जाताना दिसतात. सगळ्या देशी गायी च दिसल्या ,फार छान वाटले. कर्नाटकात अशा देशी गायी आता पाहायला ही मिळत नाहीत. सगळ्या शेतकऱ्यांकडे जर्सी गायीच दिसतात त्याही औषधांवर च जास्त पोसलेल्या.
      साधारण दीड ते दोन तासांनी वरोरा, आनंदवन ला पोहचलो. कमानीवरची आनंदवन ची पाटी वाचली आणि मनात खूप कुतूहल जागे झाले. थोड्या संमिश्र भावना मनामध्ये होत्या. गेट मधून जसे आत गेलो तसे परिसरात एकदम स्वच्छता जाणवली. कुठेही रस्त्यांवर कचरा, पाला पाचोळा, थुंकीच्या पिचकाऱ्या , उघडी गटारे अशा कशाचाही मागमूस ही नव्हता. खरंच सुखद धक्काच बसला. आम्हाला  सर्वांना एकेक ग्रुप ला एक खोली अशी व्यवस्था त्यांनी तिथे केली होती. खोल्या ही अतिशय स्वच्छ , नीटनेटक्या होत्या. एका खोलीत पाच सहा कॉट आणि खोलीला लागूनच बाथरूम ची सोय केली आहे.

      आम्ही पोहचलो तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. सर्वांसाठी जेवणाची चहापाण्याची उत्तम सोय तिथे कॅन्टीन मध्ये आहे. चप्पल बाहेर काढून आत जायचे. सर्वांना सारखे जेवण, हवं तेवढं घ्यायचं आणि आपापली ताटे,वाट्या,पेले आपले आपण घासून धुवून ठेवायचे. स्वावलंबनाची पहिली पायरी.

    जेवणं आटोपून आम्ही कै. ति.बाबांनी आणि श्री विकास आमटे यांनी बऱ्या झालेल्या कुष्ठरोगी बांधवांसाठी निरनिराळे औद्योगिक प्रकल्प त्यांना तिथे सुरू करून दिले आहेत. ते पाहायला आम्ही गेलो. काय नाही तिथे!! सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्प बरे झालेले लोक तिथे चालवतात. शेती, हातमागावर सतरंज्या विणणे असो, भरत काम,विणकाम, शिवणकाम, प्रवासासाठी लागणाऱ्या लहान मोठ्या बॅग्स बनवतात, गोधडी, काष्ठ शिल्पं, फॅब्रीकेशन डिपार्टमेंट मध्ये कपाटं, कॉट , अपंगत्व आलेल्या बांधवांसाठी व्हीलचेअर, कपड्यांच्या तुकड्यांची विशिष्ट जोडणी करून चित्रं बनवतात, धागे विणून चित्रं काढतात , कणसाच्या पानांपासून आणि केळीच्या सोपटा पासून चित्रं काढून फ्रेम्स बनवतात, माती काम करून शो पिसेस, पणत्या, बांबूचा उपयोग करून  वस्तू बनवतात, इलेक्ट्रिकल dept आहे, बायो गॅस प्रकल्प आहे, मोठ्या प्रमाणात जेवण बनवले जाते त्यामुळे मोठं स्वयंपाक घर , शाळेतील सर्व मुलांना, तिथे काम करणाऱ्या लोकांना तिथूनच डबे दिले जातात. असे एक ना अनेक उद्योग त्यांनी तिथे चालू करून त्यांच्यातली कला तिथे बहरलेली पाहायला मिळते. मोठे हॉस्पिटल आहे तिथे . चौदा मानव निर्मित तलाव बांधले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उरला नाही. आगळावेगळा मियावॉकी जंगल प्रकल्प ही पाहिला.

     समाजाने आणि नातेवाईकांनी जरी त्यांचा त्याग केला त्यांना वाळीत टाकले गेले तरी आमटे कुटुंबियांनी त्यांना मदतीचा आणि प्रेमाचा हात देऊन त्यांना निरनिराळ्या औद्योगिक ट्रेनिंग देऊन अशा औद्योगिक वसाहती निर्माण करून स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन देऊ केलंय आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत.  दुसऱ्या पीडितांना मदतीचा हात द्यावा या हेतूने तिथे मुकबधीर, अपंग , दृष्टी बाधित मुलांसाठी मोठी बारावी पर्यंत  शिक्षणासाठी निवासी शाळा बांधली आहे. निरनिराळे डिपार्टमेंट मधून पुढे रोजगार उत्पन्न होऊन त्यांचा चरितार्थ चालावा या हेतूने सर्व प्रकारचे ट्रेनिंग तिथे मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. Computer विभाग ही आहे. सर्वांनी मिळून एक ऑर्केस्ट्रा ही तिथे काढला आहे. सर्व मिळून कलांचे सादरीकरण करतात. एक से एक कलाकार तिथे पाहून अगदी थक्क व्हायला होते. एवढं च नव्हे तर तिथे त्यांनी वधुवर सूचक मंडळ ही काढले आहे. जिथे जातपात, धर्म, पंथ सगळे भेद गळून पडतात आणि फक्त प्रेमाने आयुष्यभर एकमेकांना साथ देऊन संसार केले जातात. 

     जितकं लिहू तेवढं कमीच आहे. हिमालया एवढं समस्त आमटे कुटुंबाचं काम आहे . ते लिहिण्याची माझी खरंतर कणभर ही पात्रता नाही. पण जे पाहून आले, अनुभवले ते थोडक्यात मांडण्याचा आणि तुमच्या सर्वांसोबत वाटण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. 

    ति. बाबांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अग्निसंस्कार न करता देहाचा निसर्गाला उपयोग व्हावा या हेतूने त्यांचे केळीच्या पानात गुंडाळून जमिनीत दफन केले गेले. केवढा मोठा आणि पुढचा उदात्त  विचार !!  तेथील बांधवांनी श्रध्देने तिथे चौथरा बांधून समाधी बांधली आहे. पुढे ति.साधना ताईंच्या इच्छेनुसार त्यांचाही दफन विधी बाबां च्याच शेजारी केला आहे. आणि नातीचाही.... आजूबाजूने तिथे  झाडे लावली आहेत त्यांची फुले सतत त्या समाधीवर पडतात. तेथील लोकांच्या तसेच  पु ल  देशपांडे, लता मंगेशकर इत्यादिंच्या देवाज्ञा झालेल्यांच्या  अस्थी दफन करून त्यांच्या स्मरणार्थ झाडे लावून  स्मृती उद्यान तयार केले गेले आहे. नाव आहे "श्रद्धावन". एक बरे झालेले आजोबा  श्रध्देने तिथली सर्व देखभाल करण्याचे काम करतात. 🙏
     
     झाडांवर अत्यंत प्रेम करणारे त्यांना मुलांसारखे जपणारे बाबा होते. जंगलातील कत्तल झालेल्या झाडांच्या स्मरणार्थ स्मृतिशिला, तसेच गर्भपात करून गर्भातच जीवन संपवले गेलेल्या मुक्या जीवांच्या स्मरणार्थ स्मृतीशिला बांधली आहे. 
     
     निघायच्या दिवशी ति. श्री विकासभाऊनी आमच्याशी दोन अडीच तास गप्पा मारल्या.     ति. बाबांचा जीवनप्रवास, त्यांचं कार्य, गरजे नुसार केली जाणारी बांधकामे, आत्ता तिथे केली जाणारी कामं असं सर्व विषयांवर ते बोलत होते. एवढी मोठी माणसं, कशातही तोलता न येणारं निस्वार्थी कार्य पण अगदी साधेपणा, कुठेही अहंकाराचा लवलेश ही नाही. उलट समाजानेच त्यांचं कार्य समजून न घेता त्यांच्यावर केलेले आक्षेप, आरोप, शंका, टीका त्यात पोटच्या मुलीचं अचानक सोडून जाणं, ऐकताना गहिवरून आलं मला. मोठ्या माणसांची दुःखही आभाळा एवढी पण त्यांचं सगळं दुःख बाजूला सारून त्यातूनही वटवृक्षा सारखे भक्कम, अडीग उभे राहिले आहेत हे सर्व कुटुंबीय वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या. सोप्पं नाही. अशक्यही शक्य करून दाखवलेली आणि एकाच ध्यासाने झपाटलेली ही देव माणसं. त्यांना माझा साष्टांग दंडवत. 🙏 त्यांना पाहता आलं त्यांच्याशी बोलता आलं हे माझं परम भाग्य. त्यांच्या विचारतील, गुणातील कणभर तरी गुण माझ्यात रुजावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भारावून गेलेल्या अवस्थेतच आम्ही त्यांचा तिथून निरोप घेतला. 

     अजुन एक योगायोग असा जुळून आला होता आमच्यासाठी की आम्ही असताना, वीर सावरकरांवर काढलेलं "सागरा प्राण तळमळला " या नाटकाचा पहिला प्रयोग तिथे झाला. तोही पाहण्याचा आमचा अमूल्य योग तिथे आला. नाटक फार सुंदर आहे. फिरत्या रंगमंचावर कलाकारांचे सादरीकरण अप्रतिम. सर्वांनी अवश्य पहावे , पुढच्या पिढ्यांपर्यंत त्यांचं कार्य पोहचावं हा त्यांचा उद्देश्य आहे. नाटकाच्या टीम सोबत ही गप्पा मारल्या. त्यांना शुभेच्छा दिल्या. 

     सर्वार्थाने नावाप्रमाणेच सार्थ असलेली आनंदवन ची सहल भरभरून आनंद च देऊन गेली.

||हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे 

मानवाने मानवाशी मानवा सम वागणे||🙏

भेटू पुढच्या भागात सोमनाथ ला. 🙏

©सौ श्वेता अनुप साठये

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

(वर्धा, आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ ,ताडोबा सफारी)

     पुस्तक वाचन हा माझा आवडीचा छंद. पुस्तकं वाचत असताना मी नेहमी त्या पुस्तकाच्याच दुनियेत मनाने भ्रमण करत रमत असते. बऱ्याच वर्षांपूर्वी आलिबाबाच्या गुहेतून रत्नांचा खजिना  सापडावा तसे पुस्तकांच्या दुकानात मला अतिशय मौल्यवान अशी दोन पुस्तकरत्नं सापडली. 
नाव होते "नेगल"!! 
श्री विलास मनोहर यांनी लिहिलेली ती दोन्हीही पुस्तकं अक्षरशः झपाटल्यासारखे मी  एका बैठकीत वाचून काढली होती. अद्भुत पण अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा दुनियेची ओळख त्या पुस्तकांनी मला तेव्हा करून दिली होती. आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ ही नावं मी पहिल्यांदा तेव्हा ऐकली आणि आभाळा एवढी मनं असलेल्या अशा माणसांचा पुस्तकरूपातून परिचय झाला होता. आयुष्यात एकदातरी त्यांना तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटावे, त्यांनी राबवलेले सर्व प्रकल्प पाहून यावेत अशी तीव्र इच्छा माझ्या मनात तेव्हापासून होती. शुध्द हेतूने आपण जे चिंततो ते कधी ना कधी घडून येतेच. त्याप्रमाणेच ह्या महिन्यात माझी ती इच्छापूर्ती झाली. घरातल्या कुणालाही सुट्टिअभावी माझ्यासोबत येणं शक्य नव्हते त्यामुळे एका ग्रुप  सोबत केलेली ही अविस्मरणीय सफर....
     पहिल्या दिवशी पुण्याहून वर्ध्याला गेलो. तिथे सेवाश्रम, आचार्य  विनोबा भावे यांचा पवनार चा परमधाम आश्रम पाहिला. धाम नदीकिनारी असलेला ह्या आश्रमात शांतता, नीटनेटकेपणा, स्वच्छता, शुध्द हवा तिथल्या जुन्या वास्तूंमध्ये अनुभवली. तिथे खोदकामात सापडलेल्या पुरातन मूर्ती , राम भरत , गीताई ध्यान मंदिर सुंदर आहे. तिथल्या साधकांनी लावलेली आणि बहरलेली फुलबाग,भरपूर तुळशी, छोट्याशा वाफ्यात लावलेल्या हिरवागार भाजीपाला, शेजारीच असलेला गायींचा गोठा, नदीकिनारी दिसणारा उगवतीचा सूर्य... सहलीची सुरवात रामप्रहरी अशा सुंदर वातावरणाने झाली.
     पारिजातकाच्या फुलांनी ओंजळ भरुन तिथून आम्ही आनंदवन ,वरोरा ला जायला निघालो.

क्रमशः

©सौ श्वेता अनुप साठये