रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

।।गणपती।।

#१६
🌺।।गणपती।।🌺

     शाळेसमोरच मोठा कुंभारवाडा होता. नागपंचमी पासून कुंभारवाड्यात गणपतीच्या मूर्तींची तयारी चालू व्हायची. शाळा दुपारची. तासभर आधी तिथे जवळच राहणाऱ्या मैत्रिणीकडे दप्तरं ठेऊन आम्ही मैत्रिणी मूर्ती पाहण्यासाठी जात असू. हाताने मूर्ती बनवण्यावर जास्त भर होता त्यावेळी. साच्याने तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींचं प्रमाण अगदी हातांच्या बोटांवर मोजण्या इतपतच होतं. कुंभारांच्या हातून ती मूर्तिकला साकारत असतानाचं निरीक्षण करत तासभर कसा निघून जाई कळतच नसे. जरा नाखुषीनेच मग शाळेची वेळ झाली की आम्ही शाळेकडे परतत असू. गणेशोत्सव सुरू होईपर्यंत आमच्या अशाच नियमित खेपा होत असत कुंभारवाड्यात.
      घराजवळही एक छोटा कुंभारवाडा होता. तिथे सणा नुसार  बेंदूराला  बैल, नागपंचमीला नाग, हरतालिका, दिवाळीत सैनिक,मावळे, शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्ती असं काय काय बनवलं जाई. त्याही छोट्या, रेखीव मूर्ती बनवताना बघायला भारी मजा येई.
     मूर्तीकार आधी गणपतीच्या फोटोची पूजा करत. खाली आसनावर बसून समोर एक चक्राकार फिरणाऱ्या पाटावर मऊ मातीचा गोल गोळा ठेऊन त्या मातीची ही रीतसर दिवा, उदबत्ती ओवाळून पूजा करत. मगच मूर्ती बनवायला सुरवात करत. एकावेळी घरातले दोनतीन सदस्य वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यासाठी सुरवात करत. त्या मातीचे निरनिराळ्या आकारांचे गोळे बनवून त्यापासून हळूहळू गणेशाची निरनिराळी रूपं आकार घेत. आसनापासून सुरवात करून प्रथम पोट मग पाय, हात, सोंड, मोठे कान,चेहरा मधे मधे तो फिरता चक्राकार पाट फिरवून मूर्तीच्या पाठीकडच्या भागाला आकार दिला जाई. काही दोन हातांच्या तर काही चार...मुकुट असलेल्या, तर काही फेटे वाल्या....कमळा मधे बसलेला बाल गणेश, कृष्ण वेशात, तर कधी वारकरी वेशात. कधी शंकर पार्वती सोबत, तर कधी मोठ्या मूषकावर आरूढ. काही छोटे तर काही सार्वजनिक मंडळांसाठी पाच सात फूट उंच. रोज थोडा थोडा आकार घेणाऱ्या ह्या मूर्ती.   मूर्तिकारांच्या मनांमधून साकारणारा निरनिराळ्या रूपात दिसणारा पण एकच असणारा तो गणराज. मलाही मनातून तेेंव्हा फार वाटे ,एकदातरी तो मऊ मातीचा गोळा हातात घेऊन मूर्ती बनवायला शिकावी. 

     मूर्तींना रंग कसा आणि कोणता देतात ते पाहायची ही भारी उत्सुकता असे. मूर्ती सुकल्या की आधी व्हाईट वॉश देत. मग spray ने painting होई. चेहरा, आभूषणं, वस्त्राच्या वरची जरीची नक्षी, बॉर्डर असं बारीक रंगकाम सगळं हाताने ब्रश चा वापर करून केले जाई. मातीच्या गोळ्या पासून त्या संपूर्ण साकार रुपातल्या अत्यंत रेखीव अशा मूर्ती बघून आम्ही भारावून जात असू. 

     गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बाबा दुकानातून लवकर येत असत. शुचिर्भूत होऊन बाबा नवीन कपडे, डोक्यावर टोपी, कपाळाला गंध लावून  तयार होत. आम्हीही नवीन कपडे घालून त्यांच्याबरोबर जायला सज्ज होत असू. आई मोठ्या ताम्हणात गणपतीसाठी नवीन केशरी किंवा लाल वस्त्र ,हळदीकुंकू, पान सुपारी, अक्षदा, उदबत्ती, एक श्रीफळ, घंटी अशी सगळी तयारी करून देत असे. आम्ही सगळे, सोबत शेजारचे सगळे सवंगडी अशी वरात गणपती आणायला जात असू. बाबा दरवर्षी ठरल्या प्रमाणे एकाच कुंभराकडून मूर्ती बनवून घेत असत. मूर्तीला हळदीकुंकू वाहून,उदबत्ती ओवाळून वस्त्र घालून ती मूर्ती ताम्हणात ठेवत. कुंभार नेहमी त्याबरोबर एक गणोबाची छोटी मूर्तीही देत. बाबा सोबत नेलेली पान सुपारी, श्रीफळ आणि दक्षिणा त्या मूर्तिकारांना देत. मूर्तीचे मोल करण्याची प्रथा नव्हती...कुंभार कधीही ती सांगत नसत. मूर्ती घेणारे आपल्या मनानेच योग्य वाटेल ते मानधन म्हणून मूर्तिकारांना देत असत. 
     " गणपती बाप्पा मोरया।।, एक दोन तीन चार...गणपतीचा जयजयकार...।।" असं मोठमोठ्याने म्हणत...वाटेत भेटणाऱ्यांना "मोरया।।मोरया।।" अशी साद देत...वाजातगाजत जयघोषात श्रीगणेशाचे घरी आगमन होई. आई दारात निरांजन, आणि दूध पाणी घेऊन स्वागताला सज्ज च असे. पायावर गरम पाणी ,दूध घालून , तुकडा ओवाळून दोन्ही बाजूला टाकून, गणपतीचं औक्षण करून घरामध्ये स्वागत करी. दुसऱ्या दिवशी गुरुजी येऊन त्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत. गणपती बसला की घर एकदम प्रसन्न वाटे.
    गणेशोत्सव सगळीकडे उत्साह, प्रसन्नता घेऊन येई...नवीन काहीतरी शिकण्याची , करून पाहण्याची मनात उर्मी येई..... संगीत, कला , पाककला, नाट्य कला, वक्तृत्व, गायन यांना वाव मिळे.... सकाळ संध्याकाळी म्हंटल्या जाणाऱ्या अरत्यांनी सभोवताल भक्तीनं भरून जाई...घरातली आरती झाली की एकमेकांकडे आरत्या म्हणायला सगळ्यांच्या घरी फिरत असू. सगळ्यांना वाटायला प्रसादाला मोदक, पंचखाद्य, अशा वेगवेगळ्या खिरापती केल्या जात.           
     एक दिवस आधी येणाऱ्या हरितालिकेच्या पूजेला लागणारी झाडांची पत्री आजूबाजूला फिरून गोळा केली जाई ...त्यादिवशी आईचा उपवास असे त्यामुळे आम्हाला आवडतात म्हणून उपवासाचे पदार्थ असत. गणेश चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक  तर दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमीला, नैवेद्याला ऋषीच्या भाजीचा थाट असे. गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौरी, आम्ही मुली नटून थटून गप्पा मारत नदीवर जाऊन पूजा करून घेऊन येत असू. येताना मात्र मौन व्रत असे. आई दुधपाणी पायावर घालून तिचं औक्षण करून घरात स्वागत करी  आमचं मौनव्रत इथे सोडून "आली का गौराई? ...कशाच्या पावलाने... सोन्या रुप्याच्या पावलांनी..., धन धान्यांच्या पावलांनी,...हिऱ्या माणक्यांच्या पावलांनी.....असं म्हणत घरात सगळीकडे फिरवून मग गणपती जवळ त्यांची प्रतिष्ठापना  केली जाई.  
     सात खड्यांच्या गंगा गौरी, कलशात घालून आणलेले तेरड्याचे फुलोरे, मुखवट्यांच्या, साडी नेसवलेल्या उभ्या, तर काही बसलेल्या, तांब्यांवर लिहिलेल्या अशी गौरईंचीही निरनिराळी रूपं प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळत. त्यादिवशी गौरी आल्या आल्या दही पोहे आणि काकडी प्रसाद म्हणून दिली जात असे. नैवेद्याला शेपूची भाजी आणि भाकरी असा साधा बेत. आरास मांडून सगळे फराळाच्या पदार्थांचाही नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत पुरणा वरणाचा नैवेद्य असे.  घरातल्या गृहिणींचा पाककलेचा कस लागे आणि घरातल्या सगळ्यांची खाण्याची चंगळ. आपल्या प्रत्येक भारतीय सणांमध्ये केले जाणारे पदार्थ हे त्या त्या ऋतूत सेवन करायला उपयोगी , भरपूर जीवनसत्व युक्त असतात. पूर्वजांनी अत्यंत विचार करून बनवलेली समृद्ध अशी  ही  आपली खाद्य  संस्कृती. 
      सगळेजण एकमेकांच्या घरी गौरी गणपती आणि आरास बघायला जात असू. हळदीकुंकू सोहळे आणि मोठमोठ्या  काढलेल्या रेखीव रांगोळ्यांचेही कौतुक असे.
      सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती,  निरनिराळे देखावे पाहण्यासाठी आम्ही सगळे एक दिवस ठरवून मिळूनच जात असू. अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात आमचा गणेशोत्सव साजरा होई.

.
.
.
     इकडेही दरवर्षी आम्ही घरी आणि  सोसायटी मध्ये सगळे मिळून गणेशोत्सव साजरा करतो. सकाळ संध्याकाळच्या आरत्या मित्रपरिवार मिळून म्हणतो... उत्साहाने सर्वांना वाटायला खिरापती बनवल्या जातात. मिरवणुका, लेझीम, झिम्मा, फुगड्या , मिळून काढलेल्या रांगोळ्या, बालगोपाळांचे नाटुकल्यांचे सादरीकरण अशी नेहमीच मौजमजा असते.

     पण ह्यावर्षी कोरोना मुळे बरीच बंधनं आहेत आपल्याला. त्यामुळे घराजवळ मूर्ती ही मिळतील की नाही अशा चिंतेत होते. ऑनलाईन मूर्ती मागवली तर ती नीट येईल की नाही अशी साशंकता होती मनामधे. खूप वर्षांपासून मातीची मूर्ती बनवायची सूप्त इच्छा मनात होती. पण मनामधे भीतीही होती की जमेल की नाही?...मूर्ती बनवताना काही चुकेल तर...
म्हणून नागपंचमीला आधी घरातलीच झाडातली थोडी माती काढून नाग बनवून पाहिले...कसेबसे जमले...अगदी ओबडधोबड...ते बनवत असताना लक्षात आलं माती चाळून घेतली तर मधे मधे छोटे खडे येणार नाहीत  आणि मूर्ती नीट बनू शकेल. 
मग त्याप्रमाणे अजून एक प्रयत्न केला हरतालिका बनवण्याचा. माती चाळून घेतल्यामुळे आकार नीट यायला मदत झाली पण तरी हव्या तशा रेखीव जमेनात....
गणपती बनवायचा असेल तर तो नीट च बनला पाहिजे,...त्यासाठी मी अजून कुठे माहिती दिसतेय का पाहू लागले. 
     एकदिवस आमच्या एका फॅमिली फ्रेंड ने, त्याने  बनवलेल्या मूर्ती चा फोटो whats up वर share केला होता. तो बघून माझा एकदम आत्मविश्वास वाढला. त्याने मातीची , आणि मूर्ती कशी बनवायची याची थोडी माहिती दिली. माझ्या अजून काही usa च्या मैत्रिणी बरेच वर्षांपासून घरीच मूर्ती बनवतात त्यांच्याकडूनही माहिती विचारली. आणि दहा मातीच्या गोळ्यांपासून तयार होणारा गणपतीचा विडिओ viral झाला होता तो पाहून आधी एक छोटी मूर्ती करून पहिली. ती एकदम मस्त जमली. मग ऑनलाईन माती मागवली. तरीपण प्रत्यक्ष मोठी मूर्ती बनवताना थोडं दडपण होतंच. 
     संकष्टी दिवशी आधी देवाची पूजा करून मग मातीचीही पूजा केली. गणपतीला नमस्कार केला आणि मनात म्हंटलं," बाप्पा, आता तुला हवी तशी तूच माझ्याकडून तुझी मूर्ती बनवून घे." एकीकडे शंकर महादेवनचं, " गणनायकाय, गणदैवताय, ...."गाणं लावलं...त्यादिवासापूरता tv चा आवाज घरामध्ये ban केला😀...आणि त्या मातीच्या मऊ गोळ्यापासून साकारली गेली गोड रुपातली गणेशाची मूर्ती. सोबत एक गणोबा आणि छोटा मूषक.

     जगावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होवो आणि आणि निरामय पहाटेचा उदय होवो , हीच त्या बाप्पाला प्रार्थना. 

 एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्।
 विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥

।।गणपतीबाप्पा मोरया।।🌺🙏

© सौ. श्वेता अनुप साठ्ये
22/08/2020

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

बेल


🌿 बेल 🌿

       दर सोमवारी सकाळी दत्तूमामा बेल घेऊन यायचे. त्यांना यायला जरा जरी उशीर झाला की " आले का? आले का दत्तूमामा ? " शेजाऱ्यांच्या अशा हाका कानावर पडायच्या.  घरांच्या खिडक्यातून दोन चौक पुढेपर्यंतचा रस्ता दिसायचा तेव्हा.  पुढच्या चौकातून त्यांची सायकल कॉलनीकडे वळताना दिसली की सगळ्यांचे जीव एकदाचे भांड्यात पडायचे.  सदरा ,धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी अशा नेहमीच्या साध्या पांढऱ्या शुभ्र पोशाखात दुरुन सायकलवरून येणारी त्यांची आकृती स्पष्ट ओळखू यायची. 
     रस्त्याच्या चढावरून स्वारी धापा टाकत कॉलनीत येऊन दाखल व्हायची. सायकलला लावलेली एक नायलॉनची पट्यापट्या ची हिरवी पिशवी असायची. त्यात बेल ,दूर्वा, बेलफळं, पांढरी फुलं, अशी महादेवाच्या पूजेला लागणारी फुलं, पत्री ते विकायला घेऊन येत असत. नदीकाठच्या बेलांच्या झाडांवर चढून ते बेल काढत असावेत. त्यांच्या हातांवर पडलेले काट्यांचे पांढरट ओरखडेच सांगत. गल्लीतली छोटी पोरं गोंगाट करत खेळता खेळता त्यांची सायकल बघून त्यांच्या मागं मागं करत. सायकल रस्त्याच्या कडेला लावून , डोळे वटारून  मुलांना घाबरवून दम भरत ,"पोरांनु, हात लावायचा न्हाई सायकलला. नायतर आल्याव चांगलं रट्टे घालीन एकेकाच्या पाटीत, सांगून ठिवतुया."  
     "आलोच, वाईच बेल दिऊन सगळ्यास्नी.  च्या टाकता का वैनी? "  दारात रांगोळी काढत असलेल्या आमच्या आईला अशी हक्कानं चहाची ऑर्डर देत.  सगळ्यांना बेल देऊन आमच्यात आईच्या हातचा चहा पिऊन बेल फुलं देऊन निघत. त्यांनी दिलेला बेल महादेवाला वाहूनच सगळ्यांना पूजा केल्याचं समाधान होई. 
      जाता जाता रागवून पिटाळून लावलेल्या मुलांना परत हाका मारून गोळा करत.  कोणीकोणी त्यांच्या नातवंडांसाठी दिलेले खडीसाखर, एखादा लाडू, बिस्किटं त्या मुलांमध्ये प्रेमानं वाटत. उरलेलं घरी नेण्यासाठी पुडी पिशवीत टाकत. मगाशी घाबरवून मुलांना पिटाळून लावणारे हेच का ते दत्तूमामा असा प्रश्न पडे. मुलांना सायकल वरून एखादी चक्करही मग मिळे. मुलंही खुश... पुन्हा पुढचा सोमवार येईपर्यंत. 
     दोन कारणांसाठी त्यांचं महत्व पाटण कॉलनीत खासच होतं. एक म्हणजे बेल आणि दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचे सरपटणारे प्राणी  हाताने अगदी लीलया पकडण्याचे कसब असलेली व्यक्ती म्हणून. कोयनेकाठी वसलेली  कॉलनी. त्यात त्यावेळी प्रत्येकाच्या घराजवळ भरपूर झाडी होती. त्यामुळं बऱ्याच प्रकारचे सापांचे आणि अस्सल नागांचे दर्शन हे नेहमीचंच असायचं. बऱ्याचदा छोटे छोटे साप वाटेत दिसले तरी स्वतःच्या जीवाच्या भीतीने झाडीत सळसळत नाहीसे व्हायचे. क्वचित कधीतरी न्हाणीघरात, घरात छापरांच्या कडीपाटातही वेटोळी दिसायची. असे दर्शन झाले की काही लोकांची  मात्र जाम पाचावर धारण बसायची. पुढचे काही दिवस मग रामाचं नाव घेऊनच त्यांचा वावर व्हायचा. न्हाणीघरात जाताना आधी कुठे काही नाही ना, एक नजर टाकून तपास करूनच  जायचे. 😀

    अगदीच एखाद्याच्या घरात किंवा घरां जवळच्या एखाद्या बीळात त्यांचं वास्तव्य असलेले लक्षात आले तर दत्तूमामांना निरोप जायचा. ते आले की बिनधास्त झाडांच्या बुंध्यात असलेल्या बीळात हात घालून त्यांच्या शेपटीला धरून बाहेर ओढत . आजूबाजूला माणसांचा एकच गलका चालू होइ, "मामाss , मारून टाका, मारून टाका त्याला,  ठेचा त्याला." 
" हम्म्म, मारून टाका म्हनं, काय करतुया तवा?? गुमान बसलाया, सोताच्या जीवाच्या भीतीनं. पोटासाटनं आलया जवळ हितं. जगुन्द्याकी तेला बी. सोडून येतो नदीकडला." असं म्हणून ते 
त्याचं एका हाताने मुंडकं आणि दुसऱ्या हाताने शेपूट पकडून नदीकडं जाऊन सोडून येत.  सोमवारी मात्र ते  कितीही कुणीही सांगितले तरी बिलकुल त्यांना हात ही लावत नसत.
     आमच्यात एक छोटंसं पांढरं शुभ्र मांजराचं पिल्लू होतं. दिवसभर त्याचं घरात उड्या मारणं चालू असे. कुठं भिंतीवरच्या पालींवर डूख धर, तर कधी एखाद्या उंदरामागे उगाचच पळत पाठलाग कर , असे चाळे त्याचे सतत चालू असत. अगदीच कंटाळले की बाहेरच्या सोफ्यावर आळोखे पिळोखे देत पडून राही. 
     एक दिवस अचानकच ते घरात कुठेच दिसेना. सगळीकडे शोधलं तरी काही पत्ता नाही, की कुठूनही हलकासा आवाजही नाही. हाका मारत बराच वेळ शोधल्यावर हे पिटुकलं शेजारच्या सोनचाफ्याच्या आणि त्याला लागून असलेल्या रातराणीच्या झाडाच्या बुंध्यात एकदम स्तब्ध दबा धरून , अंग आणि  शेपटी फुगवून उभं असलेलं  आम्हाला दिसलं. दुरून फारसं झाडीतलं दिसेना म्हणून थोडंसं जवळ जाऊन पाहायला म्हणून गेलो न एकदम आमच्या छातीत धस्सच झालं. अगदी झाडाच्याच खोडाच्या रंगाचा , जवळपास आठ दहा फूट लांबीचा चांगला मोठा नाग  ह्या पिल्ला पुढे साधारण एकदीड फूट तोंडाचा भाग वर करून  मोठा फणा काढून फुत्कारत उभा होता.  ते बघून एकदम सगळे घाबरून  मागे झालो. पण पिल्लाला वाचवायचे प्रयत्न चालू झाले. ते पील्लू ही त्याच्या इवल्याश्या जीवाच्या मानाने तगडीच टक्कर द्यायला उभं होतं. मधूनच गुरगुरणं आणि पंजा मारणं चालू होतं त्याचं. अशात आजूबाजूच्या माणसांची  गर्दी जमायला लागली. तसं, कसं काय कोण जाणे पण ते मोठं जनावर कुठेतरी त्याच झाडीत नाहीसं झालं. पटकन कुठं गायब झालं काही कळलंच नाही.  पिल्लू ही पळत परत घरात परतलं. पण सगळ्यांना एकदम दहशत बसली.  भीतीने  मुलांचे खेळ थांबले, त्या जागेच्या जवळपास ही कुणी फिरकेना.  
      मांजराचं पिल्लु एकदम मलूल दिसायला लागलं. अधून मधून नुसतं कान टवकारायला लागलं. उड्या मारेना. काही खाईना. दुसऱ्या दिवशी सकाळी परत कुठे दिसेना म्हणून  मनी मनी म्हणून आम्ही हाका मारत बाहेर गेलो तर बाहेरच्या गटारीत ते निपचित मरून पडलेलं दिसलं. अंगावर दोन दात उठलेले दिसले. बहुधा रात्रीत परत त्या नागाशी जबरदस्त फाईट झालेली असावी. सगळे हळहळले. मेलेलं पिल्लू पाहायला गर्दी जमली. त्यातच कुणीतरी म्हंटलं , " जाss रे , बोलवून आणा त्या दत्तूमामा ना."
     थोड्याच वेळात दत्तूमामा हजर झाले. त्यांच्याबरोबर काठ्या बरचे घेऊन आजूबाजूची बाकीची माणसंही सामील झाली.
 "मामा, लै मोठ्ठं हाय जनावर. पोरं बाळं खेळत्यात हितं , लोकांचा बी बराच वावर हाय. एकांद्याला चावलं बिवलं नाsss ... तर पानी मागून द्याचं न्हाई.  ह्या टायमाला ठेचूनच काढू तेला.  आँ?? काय म्हणतासा?"  गर्दीतून कोणीतरी म्हटलं.
" आरं , न्हाय रं... आलं असंल पोटासाठी. धरून, दिऊ सोडून लांब." .... दत्तूमामा.
     माणसांची बरीच गर्दी जमली.  एकमेकात कुजबुज चालू झाली. 
     दत्तूमामांनी लांबूनच आधी त्या जागेची टेहळणी केली. रातराणीच्या बुंध्यात त्यांना एक मोठं बीळ दिसलं. रातराणीच्या थोड्या फांद्या छाटल्या. थोडा लांबूनच बीळातल्या हालचालींचा  अंदाज घेतला .  "हाय, हाय...", कोणीतरी हळूच कुजबुजलं. कोणीतरी पेट्रोलचा बोळा आणला. मामांनी तो त्या बीळापाशी धरला आणि आत हात घालून क्षणार्धात त्याच्या शेपटीला पकडून त्याला बाहेर काढला. त्यानं लगेच मोठा फणा उगारला. चिडून फुत्कारायला सुरवात केली. कोणीतरी गर्दीतून ओरडलं, " ते बघ,ते बघ, फण्यावर दहा चा आकडा दिसतोय. अस्सल नाग च आहे." बाकीच्या माणसांनी लगबगीनं बरच्यांनी त्याचं तोंड पकडायचा प्रयत्न केला. काहींनी काठीने मारायला सुरुवात केली. तसा तो अजूनच घाबरून, चिडून फुत्कारायला लागला. तोंड जमिनीवर अपटायला लागला. ताब्यातून सुटण्याचा वृथा प्रयत्न करायला लागला. बऱ्याच प्रयत्नांनी दोघातिघांनी शेवटी त्याचं तोंड बरच्याने  जमिनीवर दाबून धरलं. तसं दुसऱ्या एकाने घाईघाईने त्याच्या तोंडावर काठीने मारायला ,  ठेचायला सुरुवात केली.
  "आरं, आरं....मारू नगं रंss... मारू नगं " ....मामा हळहळले.
     पण त्यावेळी ते ऐकण्याच्या कोणीही मनस्थितीत नव्हतं . मनातली भीती, पुढे दिसणारे धोके याचा त्या गर्दीला नायनाट करायचा होता. नागाचं तोंड पार ठेचलं गेलं होतं. सगळ्यांच्या अंगावर अगदी शहारे आले. विषारी असला तरी तोही एक जीवच होता. त्यालाही जगण्याचा अधिकार होता. नदीकाठच्या जंगलाच्या सीमारेषा ओलांडून माणसांच्या वस्तीत वास्तव्याला आला होता हीच त्याची त्याला न उमजलेली चूक(??? ) होती बहुधा.  मनातून सगळेच हळहळले.  एक विषणण शांतता पसरली. त्याला तसाच झाडीतून बाहेर ओढत रस्त्याच्या बाजूला आणला गेला. तोंड पूर्ण ठेचलं गेलं असलं तरी शेपटीत जीव शिल्लक होता अजून. जवळजवळ अर्धा तास तरी पुढे ती वळवळत , तडफडत अखेर शांत झाली. माणसांची गर्दीही ते सगळं सुन्न होऊन चुकचुकत बघत उभी राहिली.

     दत्तूमामांनी आजूबाजूच्या झाडाच्या वाळलेल्या काटक्या गोळा केल्या . 
"असाच न्हाय टाकायचा, अग्नी दिऊ तेला",....दत्तूमामा  म्हणाले. 
गोळा केलेल्या काटक्यांवर दोघांनी त्याचा देह ठेवला. बाजूच्या झाडांची फुलं काढून वाहिली. कोणीतरी हळदकुंकू घेऊन आलं ते वाहिलं. काहीतरी आठवत दत्तूमामानी त्यांच्या खिशात हात घातला. बेलाची दोन पानं आणि खडीसाखरेची पुडी  हाताला लागली ती ही त्यावर वाहिली. पुन्हा थोड्या काटक्या त्याच्यावर पसरून त्याला नमस्कार करून त्याला अग्नीला सुपूर्द केले. 
"शंभोsss , मुक्ती देss रं, तेला. ....माप कर आमाला." ....दत्तूमामा. 
मारणाऱ्यांचे आणि गर्दीचे डोळेही आपसूकच पाणावले. सरतेशेवटी मनातलं भय त्याच्यासोबत सोडून सगळे आपापल्या वाटेला परतले.  
.
.
.
    मागच्या वर्षी आमच्या इथे जवळच्या बिल्डिंग मध्ये अजगराचे एक पिल्लू  सापडले होते. आधी हा एरिया ही त्यांच्या जंगलाचाच भाग होता , आता ते आपलं सिमेंट चं जंगल झालंय एवढाच काय तो फरक. तो फरक त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे आपलंच जंगल समजून, येतात कधीतरी वाट चुकून. 
     कोणीतरी लगेच सर्पमित्रांना कॉल केला...पंधरा मिनिटात ते सगळ्या तयारी निशी हजर झाले. चार पाच जणांची टीम होती. त्याला इजा होऊ न देता पकडलं आणि कुठेतरी लांब जंगलात सोडून आले म्हणे. आजकाल हे एक बरं झालंय नै , एका कॉल वर सर्पमित्र लगेच  हजर होतात. त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचाच ते आटोकाट प्रयत्न करतात.  विषारी असले तरीही.

©सौ.श्वेता अनुप साठये
30/07/2020
(लेख नावासकट share करण्यास हरकत नाही.)
(फोटो गुगल वरून साभार.)