बुधवार, २४ मार्च, २०२१

संत्र्याचं झाड

बालकथा
संत्र्याचं झाड

"आईsssss"
छोट्या चिकूने एकदम घाबरून ओरडतच आईला हाक मारली. 
आई :"काय झालं बाळा?"...
चिकू कावराबावरा होऊन आईला म्हणाला,"मी चुकून संत्र्याची बी गिळली, संत्र खाताना. आता काय होणार? " ☹️
आईच्या मनात आलं चिकूची थोडीशी गम्मत करावी . म्हणाली , "अरे बापरे!!हो का? आता तर चिकूच्या पोटातून संत्र्याचं झाड उगवणार. "
चिकू :"खरंssssच?😳मग??" 
आई :"मग काही नाही ...त्याला थोड्यादिवसांनी संत्री येणार. "...

     हे ऐकून चिकू विचार करत करतच बाहेर मित्रांसोबत खेळायला निघून गेला. आईही गालातल्या गालात हसत तिच्या कामात गर्क झाली. आणि कामाच्या गडबडीत त्याची केलेली चेष्टा विसरूनही गेली. 
     इकडे चिकुच्या मनातून मात्र पोटातून उगवणारं ते संत्र्याचं झाड काही जाईना. 'झाड उगवणार म्हणजे ते मोठं होऊन माझ्या नाकातोंडातून ,कानामधून पण फांद्या बाहेर येणार. मग च त्याला संत्री लागणार.' असे काहीबाही विचार मनात येऊन त्याची अजूनच भीतीने गाळण ऊडाली. कशातच त्याचं लक्ष लागेना. खेळ अर्धवटच सोडून तो घराकडे परतला.
     संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी आले. नेहमीप्रमाणं चिकुशी गप्पा मारू लागले, पण त्याचा काही आज मूड दिसत नव्हता. जेवतानाही तो गप्प गप्प च. कसंबसं जेवण आटोपून चिकु बाल्कनीत येऊन उदास होऊन चांदण्यांकडे बघत बसला. आईबाबांना  वाटले खेळून दमला असेल म्हणून गप्प बसला असेल. जेवणं आटोपल्यावर आई पुन्हा तिच्या कामात गर्क झाली आणि बाबा चिकू शेजारी बाल्कनीत जाऊन आकाशाकडे पाहू लागले.  
बाबा : तुला सप्तर्षी माहितीय का रे , चिकू?
चिकू : हम्म...नाही.😐😒😒.....
बाबा : ते बघ ,ते सात तारे दिसतात ना , त्यात एक चौकोन आहे बघ आणि त्याला तीन ताऱ्यांची पतंगासारखी , झोपलेल्या c सारखी शेपूट आहे बघ, 'तीsss'. त्याला म्हणायचे सप्तर्षी. 
चिकू : हम्म...😒😒...
बाबा : आणि तो बघ तो ध्रुव तारा.. दिसला का?
चिकू : हम्मम्म्म...😒😒....
बाबा , आता माझ्या पोटातून संत्र्याचं झाड येणार आहे .मी चुकून बी गिळली ना सकाळी .मग मला खूप दुखेल का हो? माझ्या नाकातोंडातून फांद्या बाहेर येतील ना? तुम्ही गिळली होती का हो कधी अशी बी?
बाबा : पोटातून झाड??? असं नाही येत रे पोटातून झाडबीड वेडोबा. 😀
चिकू : खरंच नाही येत? 
बाबा : होss, खरंच नाही.
चिकू : मग, आईच मला म्हणाली सकाळी की आता चिकोबाच्या पोटातून संत्र्याचं झाड उगवणार आणि त्याला संत्री ही येणार म्हणून. म्हणून मी कित्ती घाबरलो होतो सकाळपासून माहितेय?.
बाबा : अस्सं होय , म्हणून आमचा चिकोबा उदास, गप्प गप्प होता होय मघापासून.
    अरे वेडोबा आईने चेष्टा केली तुझी. काही घाबरायचं कारण नाही. थांब मी तुला दाखवतो झाड खरंच कसं उगवतं ते...
चिकू : हो हो ,बाबा लग्गेच दाखवा. मला बघायचंच आहे झाड कसं येतं ते.
बाबा : आपण पण आईची एक गंमत करूयात  का?
   हे ऐकून चिकू बाबांना टाळ्या देत हसू लागला. 
चिकू : हो हो बाबा ,तिची पण गम्मत करू आपण.
बाबा : ठीक आहे मग. ती रिकामी कुंडी आहे ना कोपऱ्यात त्यात आपण आता खरं खुरं संत्र्याचं झाड लावू. पण हे आपल्या दोघातलंच सिक्रेट बरका. ते झाड उगवलं की मगच आईला आपण दाखवायचं. तोपर्यंत रोज तुला त्याची काळजी घ्यावी लागेल. अगदी जशी आम्ही तुझी घेतो तशी. 
चिकू : हो चालेल ना बाबा . मी काळजी घेईन . पण काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे, बाबा?
बाबा : सांगतो... आधी ह्या रिकाम्या कुंडीत खाली छिद्र करून त्यावर थोडे विटांचे तुकडे घालू,म्हणजे जास्तीचं पाणी वाहून जाईल. मातीमध्ये खत मिसळून  ती माती त्या कुंडीत भरू. मग त्यात संत्र्याच्या बिया लावू. त्या बिया पेरल्यावर मात्र तुला रोज थोडं थोडं पाणी त्याला द्यावं लागेल. आणि ऊन मिळते की नाही त्याला तेही पाहावं लागेल. ठेवशील ना लक्ष? 
चिकू : हो बाबा, नक्की ठेवेन लक्ष. पण पाणी का वाहून द्यायचं? आणि उन्हात ठेवलं तर भाजेल ना त्याला? 
बाबा : अरे बाळा, झाडांना जास्त पाणी झालं तरी ती मरून जातात. त्यांची मुळं कुजून जातात अति पाण्यानं. योग्य प्रमाणात पाणी आणि सूर्यप्रकाश हेच त्यांचं जेवण असतं . त्यापासूनच ते त्यांचं अन्न बनवतात.
चिकू : ओह !असं असतं होय? मी तुम्ही सांगितलीत अगदी तशीच रोज काळजी घेईन. 
      चिकूने त्याच्या बाबांच्या मदतीने मिळून मग संत्र्याच्या बिया पेरल्या आणि रोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे  नियमित रोज थोडंसं पाणी आणि भरपूर ऊन मिळेल याची काळजी घेऊ लागला. रोज त्या कुंडीपाशी येऊन त्याच्या मित्रांशी मारतो तसा त्या पेरलेल्या बियांशी गप्पा मारू लागला. आता त्याचा हा दिनक्रमच होऊन गेला.  त्यातून रोप उगवण्याची तो आतुरतेने वाट पाहू लागला. 
     एके दिवशी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे चिकू बाल्कनीत गेला तर अचानक त्याला त्या कुंडीतल्या मातीतून इवली इवलीशी दोन हिरवीगार पानं डोकावताना दिसली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानं आईबाबांना  घरातून ओढतच बाल्कनीत आणलं आणि कुंडीतल्या संत्र्याचं इवलसं रोप दाखवून आनंदाने एकदम टाळ्या वाजवून नाचू लागला. आईला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. चिकूने बाबांचं आणि त्याचं हे गुपित आईला सांगितले. आईने त्याला जवळ घेत कौतुकाने त्याचे भरपूर पापे घेतले. चिकूने आईबाबांना सांगितले की ,"आता मी नेहमी अशाच वेगवेगळ्या बिया पेरून आजूबाजूला झाडं लावेन.'
आईबाबांनी ही कौतुकाने त्याची पाठ थोपटली.

बालमित्रांनो, आवडली ना तुम्हाला आमच्या चिकूच्या 'संत्र्याच्या झाडाची 'गोष्ट? लावणार ना मग तुम्हीही अशीच निरनिराळी झाडं? 

©सौ.श्वेता अनुप साठये
24/3/2021

फोटो गुगलच्या सौजन्याने.