रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

वाराणसी

#वाराणसी
भाग २
अयोध्या ,प्रयागराज

     दोन दिवस काशी मधील बरीचशी पुरातन मंदिरं पाहून आम्ही तिसऱ्या दिवशी पहाटे अयोध्येला गेलो. तिथे पोहचेपर्यंत अकरा वाजून गेले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा त्यातून हायवे पासूनच वाहनांना गावात जायला बंदी घातली होती. कावडी यात्रेकरूंची इकडेही खूप गर्दी होती. त्यामुळे सर्व पायी पाहायला लागणार होते . त्यात दुपारी बरीचशी मंदिरं बंद असतात हे कळले. थोडा मूड ऑफ झाला. राममंदिर बांधकाम ची site, सीता रसोई आणि एकदोन मंदिरं कशीबशी पाहता आली. नंतर सगळी बंदच झाली. 
तिथून निदान शरयू नदीचे दर्शन घ्यावे म्हणून भर उन्हात चालत शरयू नदी पाहायला गेलो. तीर्थ बाटली मध्ये भरून  घेतले, मस्तकाला, डोळ्यांना लावून मार्जन केले. उन्हाच्या तडाख्यात फिरणं मुश्किल होऊ लागलं. त्यामुळे तिथून लगेच निघून प्रयागराज गाठायचे ठरवले. कदाचित राम मंदिर पूर्ण झाल्यावर परत सगळं पाहायला यायचा योग असेल अशी आशा करून अयोध्येचा निरोप घेतला.
      संध्याकाळ पर्यंत प्रयागराज ला पोहचलो. शहर मोठं,सुंदर आहे. खूप डेव्हलपमेंट दिसली. त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरून त्रिवेणी संगमावर गेलो. पहाटे रस्त्यात चौका चौकात  बासरी, सतार, वीणा वादना चे, संगीत speaker वर लावले होते ते सुमधुर सूर ऐकू येत होते. गंगा यमुना सरस्वती असा हा त्रिवेणी संगम. कुंभमेळा याच क्षेत्री भरतो.
      तिथून एका नावेत बसून आम्ही संगमाच्या मध्यभागी गेलो. सूर्योदय होत आला होता. पहाटेचं अतिशय आल्हाददायक असं वातावरण होतं. त्रिवेणी संगम तिर्थाने मार्जन केले. सोबत रामेश्वरम् तीर्थ, रामसेतू नेले होते त्याचे शिवलिंग बनवून दोघांनी यथासांग पूजा केली. रामेश्वरम तिर्थाचे आणि संगमतील तीर्थाचे अर्घ्य उगवत्या सूर्याला दिले. नद्यांना श्रीफळ अर्पण केले. डोळे मिटून थोडावेळ ध्यानस्थ बसून राहिलो. पवित्र त्रिवेणी संगमाचे तीर्थ मस्तकाला, डोळ्यांना लावून, थोडे बाटली मध्ये ही भरून घेतले. आणि  सूर्योदय झाला. नदीपात्रात सूर्याची कोवळी किरणं लाटांवर आरूढ होऊन चमचमु लागली. त्यांच्या तेजाने संगामातील पाण्याच्या लाटाही उजळून निघाल्या. असीम शांतता, प्रसन्नता याचा प्रत्यय त्या प्रत्येक क्षणात अनुभवत होतो. त्यावेळच्या आमच्या मनातील भावना इथे शब्दात मांडणे कठीण आहे. नावेनी थोडावेळ संगमात त्या सूर्य किरणांनी तेजाळलेल्या लाटांसोबत विहार करत काठावर आलो. नद्यांना आणि त्या दोन नावाड्यांनी ही आम्हाला यात्रा घडवली म्हणून त्यांनाही नमस्कार करून  तिथली बाकीची मंदिरं पाहायला निघालो. 
* बडे हनुमान मंदिर (लेटे हनुमान)
*आदि शंकराचार्य स्थापित महादेव, मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर
* आलोपी माता मंदिर( शक्ती पीठ आहे. निर्गुण रुपात पूजा होते. एक पाळणा आहे त्याखाली मोठे कूप/विहीर आहे...बंदिस्त आहे... त्यामध्ये माता सतीचे अवशेष पडले होते अशी अख्यायिका...त्याची पूजा केली जाते.
वेळे अभावी दिव्य वड आणि किल्ला लांबूनच पाहिला. 
तिथून परत वाराणासीला परत जाताना विंध्यवासिनी आणि सीतामढी पाहायचे ठरवले .
       विंध्याचलावर गंगा किनारी विंध्यवासिनी देवीचे मंदिर आहे. 
विंध्यवासिनी/ योगमया /महामाया
अशा इतर नावांनी देखील प्रसिध्द असलेली पराशक्ती रुपी देवी, दुर्गेचे रूप. ही यशोदा आणि नंदा ची मुलगी. वसुदेवाने नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला मित्र नंद यशोदेकडे सुरक्षित सुपूर्द केले आणि नंदाने आपली नुकतीच जन्मलेली मुलगी वसुदेवाला दिली. 
कंसाने वसुदेव देवकीच्या इतर मुलांप्रमाणेच हिला ही मारायला उचलले तशी ही त्याच्या हातून निसटून महामाया रुपात प्रगट झाली . ही पराशक्ती कंसाला त्याच्या वधाची आकाशवाणी ऐकवून विंध्याचलावर गेली विंध्यवासिनी रुपात भक्तांसाठी तिथेच वसली. शक्तीपीठ... कृष्ण बलराम यांची ही बहीण. 
जागृत देवस्थान आहे. देवी ची मूर्ती खूप सुंदर आहे. 
इथेही गंगेपासून मंदिरा पर्यंत कॉरिडॉर बनवण्याचा प्लॅन आहे असे ऐकले. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि गावातील रस्त्यांची दुरावस्था आणि अस्वच्छता दूर होईल अशी आशा करू. सीता मढी वेळेत होऊ शकले नाही. त्यामुळे ते skip करून तिथून संध्याकाळ पर्यंत वाराणसीला परत येऊन पुढच्या दोन दिवसांच्या planning मध्ये आम्ही गढून गेलो.

||जय श्रीराम||🙏🚩
©सौ.श्वेता अनुप साठये✍️

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

वाराणसी

वाराणसी 
भाग १

     श्रावण महिना चालू झाला आणि अचानक अहो ना office ला आठ दिवस सुट्टी मिळाली. कुठेतरी फिरून येऊ असं मनात आलं. वाराणसीलाच जायचं ही अनुपची तीव्र इच्छा होती. खरंतर नुकतीच गावाला जाऊन मी परत आले होते त्यामुळे जरा निवांत राहण्याचा मूड होता पण वाराणसी चा प्रस्ताव आल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता तयारीला लागले. जे आधी जाऊन आलेत त्यांच्याकडून होईल तेवढी माहिती गोळा केली. माझ्या भावाने P.S. वेंकटरमणन (Mission Man of Kashi ) यांच्या बद्दल माहिती दिली. काशीच्या पुरातन मंदिरांचे हे अभ्यासक आहेत. काशीच्या देवालयांवर अभ्यासपूर्ण बरीच पुस्तकं त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लिहिली आहेत. आम्हालाही पुरातन मंदिरांबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडते. आणि त्यातून ही तर काशी यात्रा. त्यांना भेटायचे ठरवून आमची यात्रा आरंभ झाली. 

संध्याकाळच्या flight ने आम्ही वाराणसीत दाखल झालो. 

वाराणसी!! काशी!!बनारस!! 
साक्षात महादेवाची, शिवाची नगरी. तिकडच्या श्रावण महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता. आपला महिना आमावास्येपासून सुरू होतो तर उत्तरेकडे पौर्णिमे पासून. त्यामुळे आपल्या आधी तिथीनुसार भारतीय महिना तिकडे सुरू होतो. कावड यात्रा सुरू होती. त्यामुळे प्रचंड गर्दी. अक्षरशः मुंग्यांसारखी... हजारोंनी देवदर्शनाला आलेले भाविक. अनवाणी... कुठूनकुठून तिर्थांच्या कावडींचे ओझे खांद्यांवर घेऊन वागवत काशीत दाखल होत होते.  केशरी वस्त्र परिधान केलेले भाविक. स्त्रिया, पुरुष, लहानग्यांचाही तेवढाच सहभाग होता. कोणी आईवडिलांसोबत पावलांवर पाऊल टाकून धावणारे तर काही चिल्लीपिल्ली त्यांच्या खांद्यावर बसून , काही कडेवर. प्रत्येकाचे कपाळ अष्टगंधाच्या मळवटाने भरलेले, त्यावर कुंकवाचा छाप शंकरा सारखा तिसरा नेत्र / त्रिशूळ,/ओम अशी प्रतिकं. भोलेनाथाचा सतत जयजयकार करत चालत राहिलेले. दोन दिवसांनी येणाऱ्या श्रावणी सोमवार ची तिथी त्यांना पूजेसाठी गाठायची होती. मला आपल्या पंढरपुरच्या वारकऱ्यांची आठवण आली. 
     स्वतःच्याच तेजाने प्रकाशित असलेली, प्रकाशमान झालेली अशी ही काशी. साहजिकच भक्त आकर्षित होणारच. एक वेगळ्याच प्रचंड ऊर्जेची अनुभूती आपल्याला ही जाणवते. एरवी शरीराच्या अनंत कुरबुरी असणारे लोक, लहान, तरुण, वृद्ध, अपंग, अंध एक ना अनेक प्रकारचे भाविक या यात्रेसाठी मनात सामर्थ्य एकवटून नुसते धावत राहतात... सगळं काही विसरून...भक्तिरसाने न्हाऊन...गंगा स्नानासाठी, आणि त्या भोलेनाथाच्या दर्शनासाठी. त्याला श्रध्देने तीर्थ स्नान, अभिषेक घालण्यासाठी. 
     कावड यात्रेकरूंना नीट चालता यावे यासाठी काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून साधारण तीन ते चार km पर्यंत वाहनांना बंदी घातली होती. आम्ही आमच्या गाईड ना भेटायला त्या गर्दीतून वाट काढत, एकमेकांचे हात घट्ट धरून कसेबसे त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या दुकानात पोहचलो. साड्यांचे व्यापारी असलेले हे गृहस्थ आणि त्यांची टीम काशीमधल्या पुराण काळापासून महत्व असलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार, त्याचा प्रचार, प्रसार याचं काम ते आपला व्यवसाय सांभाळून करतात. दुसऱ्या दिवशी पासून ते आम्हाला होतील तेवढी पुरातन मंदिरं दाखवायला येणार होते. मी विचारले, " भैय्या, कितने मंदिर है काशी में?" भैया,"दीदी, वैसे तो कण कण में बसे है शिव जी यहाँ काशी में| पुराणो में लिखा है हमारे शरीर में जितनी नाडि हैं यानी खून की बहती धमनियाँ है, मानो कम से कम  उतने मंदिर तो है ही...याने समझो कम से कम७२,०००. उससे भी कई ज्यादा ही होंगे. ऐसा कहते हैं काशी नगरी भगवान शिव के त्रिशूल पर बसी है| और हर एक देवी देवता का देवालय भी यहाँ है ही| कहते है शिव आके यहाँ बस गये थे तभी स्वर्ग से सभी देव, देवता, आदित्य,रुद्र, वसू सभी आ के यही बसे ,शिव जी की आराधना में लीन| उनके भी कई मंदिर यहाँ स्थापित है| जितना दिखा सकते हैं दिखा देंगे आपको|" 
     एवढ्या माणसांच्या प्रचंड समुद्रात चुकायची भीती होतीच. त्यातून वाहनही बंद. ते सगळे instructions, landmarks यांची माहिती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचे ठरवले.
     तशी प्रथा प्रथम गंगा स्नान करून काळभैरवाचे दर्शन घेऊन बाकी यात्रेला दर्शनाला सुरवात करतात. पण त्यादिवशी च्या प्रचंड गर्दीमुळे गंगा स्नान आणि काळभैरवाचे दर्शन घेणं शक्य होणार नाही असं गाईड ने सांगितले. जवळ जवळ तीनचार km एवढी गंगास्नान आणि विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी रांग होती. पुरा मुळे नावा ही बंद होत्या.  त्यामुळे प्रथम दोनतीन तास रांगेत उभे राहून काशी विश्वेश्वराचे दर्शनाने आमच्या यात्रेला सुरुवात झाली. कॉरिडॉर एकदम भव्य, आणि सुंदर बांधला आहे. मागे आम्ही रामेश्वरम् यात्रा केली होती. एवढी गर्दी असूनही मंदिरात अगदी जवळ जाऊन पिंडीवर रामेश्वरम् तीर्थ अर्पण करता आले. खूप समाधान वाटले.  तिथेच जवळ असलेलं अन्नपूर्णा देवीचे ही दर्शन घेतले. तिथून गल्ल्यांमधून  चालत एकामागोमाग एक अशी अठरा ते वीस मंदिरं पाहिली. जवळ जवळ दहा km परिसर , गल्ली बोळ, घाट ,चढ, उतार. उन्हाच्या प्रचंड तडाख्यात, जवळ जवळ ४०°c मध्ये फिरून ही मंदिरं पाहिली. गाईड म्हणाले," हम कौन होते है देखने या दिखाने वाले... वोही शक्ती देगा... वही यात्रा भी करायेगा...भोलेनाथ का ही बुलावा आया है आपको, जितना भाग में लिखा होगा देखेंगे"...

काशी विश्वनाथ
अन्नपूर्णा 
शनेश्वर 
शुक्लेश्वर
गवास्तेश्वर
मंगला गौरी (अशा अष्ट गौरी आहेत.)

बिंदू माधव ( अत्यंत प्राचीन मंदिर होते. आक्रमणामुळे मूळ मंदिर नष्ट झाले ...हे  विष्णु मंदिर समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना आज्ञा देऊन प्रतिष्ठापना केलेले. औंध चे सांस्थानिक पटवर्धन ,त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ह्याचे व्यवस्थापन , पौरोहित्य आहे. १०८ नर्मदेश्वर तिथेच प्रतिष्ठापित आहेत. अत्यंत सुंदर मंदिर गंगे काठी आणि सुंदर व्यवस्थापन असलेलं.)

तेलंग स्वामी( हे श्री रामकृष्ण परमहंसस्वामी यांचे गुरू, समाधी, यांनी स्थापन केलेले मोठे शिवलिंग, काली माता ,गणपती अशी मंदिरे एके ठिकाणी या आश्रमात आहेत. याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी स्थापन केलेली श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातली अतिशय विलोभनीय अशी मूर्ती आहे. )

चंद्रेश्वर आत्मलिंग (प्रजापतीच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्राने या ठिकाणी भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकर पार्वती प्रसन्न होऊन प्रकट होऊन त्याला पापमुक्ती मिळाली. अशी अख्यायिका..सिध्देश्वर, सिध्देश्वरी रुपात शंकर पार्वती तिथे विराजमान झाले. तिथेच एक कुंड आहे... चंद्रकूप...आपले प्रतिबिंब त्यात पाहतात...काही बाधा असेल तर प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही असे गाईड ने माहिती दिली.)

विश्वेश्वर
मांगलेश्वर
बुध्देश्वर
बृहस्पतिश्वर
बासुकिनाथ

रत्नेश्वर(मणीकर्णिका घाटावर गंगेच्या पात्रात थोडे झुकलेले हे प्रसिध्द मंदिर रत्नेश्वर ...पाण्याखाली असते पाणी ओसरले तर दर्शन घेता येते.)

मणीकर्णीका कुंड (इथे मार्जन केले. तिथून समोर असलेल्या घाटावर गंगामार्जन ,पूजा इत्यादी केले.)
मनोकामना ईश्वर (मणीकर्णिका घाटावर असलेले हे मंदिर...जागृत देवस्थान...मनातील इच्छा इथे बोलून दाखवतात, त्या पूर्ण होतात अशी श्रध्दा आहे.)
सिध्दीविनायक
राम दरबार
बडी काली माता
मदिकेश्वर
       एवढं करून मातीच्या वाड्ग्यातून(कुल्हड वाली)लस्सी घेतली. Blue lassi दुकानाचे नाव...अप्रतिम चव, भरपूर variety ... मलई वाली लस्सी, फ्रूट लस्सी.वाह!!

     दुसऱ्या दिवशी पहाटे ४ ला उठून दशाश्वमेध घाटावर गेलो. वाटलं गर्दी थोडी कमी असेल तर गंगा स्नान करता येईल. पण आमचा अंदाज साफ चुकला. 😀 पाय ठेवायलाही जागा नाही एवढी प्रचंड गर्दी दुसऱ्या दिवशीही होतीच. वाटेत कावडी लोक रस्त्यातच दमून झोपलेले, काही गंगा स्नान करून रांगेत उभे ठाकलेले. आम्ही पण बाहेर पडलो होतोच म्हणून एकमेकांचा हात घट्ट पकडुन त्या गर्दीतून वाट काढत कसेबसे गंगेच्या पात्रात दाखल झालो. पण मुंगीला ही पाय ठेवायला जागा नाही अशी अवस्था. पोलिसांनी दटावलेच... "आदत नही है आपको लागता है, कही बह जाओगे, बाहर निकलो, ज्यादा पानी में मत जाना, बाहर निकलना मुश्किल हो जायेगा"....नुसतं डोक्याला पाणी लावून घेतलं आणि तिथून परत तीनेक km चालून गर्दीतून सहिसलामत बाहेर पडलो.
वाटेत वेगवेगळे चण्यांचे चाट चे ठेले, कुल्हड मधून चहा,पूजेची साहित्य  अशा बऱ्याच टपऱ्या दिसत होत्या. तिथून जंगमवाडी मठ पहिला. गाईड आल्यावर पुढची मंदिरं पाहायला सुरवात केली. 

      दुसऱ्या दिवशी पाहिलेली मंदिरे...
महालक्ष्मी गौरी (या काली माता, लक्ष्मी, शारदा अशा एकत्रित मूर्ती आहेत.)
जीवपत्रिका माता (जिला आपण सट्वाई म्हणतो)
संकटामाता (संकट हरणारी)
लक्ष्मिकुंड

आदिकेशव (भगवान विष्णु चे सर्वात प्रथम पृथ्वीवर वाराणसी क्षेत्रात प्रथम प्रकट झाले ते स्थान...म्हणून नाव आदि केशव...विष्णूने आदिकेशव रुपात वरुणा गंगा संगमावर संगमेश्वराची स्थापन करून काशी क्षेत्री राहून शंकराची आराधना केली.)

ज्ञानकेशव
संघानेश्वर आदित्य
विधायक ओंकार
मकर ओंकार
कामेश्वर
दुर्वासेश्वर 
त्रिलोचन महादेव आदित्य
राम दरबार
वाराणसी देवी
काली देवी
नर्मदेश्वर
कृतीवासेश्वर
महाकालेश्वर
ब्रिजकालेश्वर
मृत्युंजय महादेव(अकाल मृत्यू हरणारा असे महत्व)
भैरव
धन्वंतरी महादेव 
धन्वंतरी कुंड(इथलं तीर्थ सर्व व्याधी दूर करते असं पवित्र तीर्थ)
जागेश्वर महादेव

जिकडे बघू तिकडे मंदिरं च मंदिरं. बघू तेवढी कमीच....प्रत्येकाची वेगळी अख्यायिका, महत्व....खरंच शिवाचा कणा कणात वास असलेली शिवनगरी.

     वारिणी आणि अस्सी नद्यांच्या संगमावर वसलेली ही वाराणसी. गंगा, सर्व पापांपासून मुक्ती देणारी. सर्व दोषमुक्त करणारी. वाराणसी, काशी...अविमुक्त नगरी. ना भक्त कधी हिचा त्याग करू शकत , नाही भोलेनाथ शिव कधी तिचा त्याग करत. शंकराची अत्यंत प्रिय अशी अनंत काल पासून असलेली आणि अनंतकाला पर्यंत असणारी अशी ही अविमुक्त काशी. 
||शंभो हर हर महादेव||🙏

©सौ.श्वेता अनुप साठये ✍️

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

गोंदवले,औंध,चाफळ

गोंदवले,औंध,चाफळ एक दिवस आईसोबत ❤️

बऱ्याच वर्षांनी ही यात्रा घडली. जवळ जवळ ३५वर्षांनी.  फक्त मी आणि आई...दोघीच...सध्या कुठेही गर्दी नाही. गोंदवले आहे तसेच...स्वच्छता,शांतता,सात्विकता ,शिस्त याचा पावलोपावली प्रत्यय. सुंदर, प्रसन्न वातावरणात ऊन पावसाच्या खेळात विलोभनीय सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत केलेला प्रवास...गोशाळा भेट...गाई वासरां च्या सान्निध्यात मस्त थोडा वेळ घालवला.
सात्विक  प्रसादग्रहण...आज एकादशीच्या फराळाचा बेत...भक्तिमय वातावरण.

औंध च्या यमाईचे ही दर्शन घेतले. यमाईच्या डोंगरावरून दिसणारे सृष्टीसौंदर्य , ऊनपावसाच्या खेळात रंगलेला निसर्ग पाहत नुसते दोघी शांत बसून राहिलो, वाऱ्याबरोबर येणारा मातीचा गंध अनुभवत.

चाफळ राममंदिर निसर्गाच्या कुशीत, शांत वातावरणात ...मंदिर आवारात असलेली सोनचाफ्याची आठदहा झाडं पाहून मिळालेला आनंद . श्रीराम लक्ष्मण सीते च्या सुबक सुंदर मूर्तींचे दर्शन घेऊन आईने आपणहून आर्त स्वरात म्हंटलेले भजन ...पूर्वी खूप गायची...आता क्वचित...तिच्या नकळत व्हिडिओ काढला ...सोबत शेअर करते. 
एकंदरीत यात्रा छान झाली...दिवस सार्थकी लागला.
||श्रीराम जय राम जय जय राम||🙏

नरसिंहपूर, बहे, वाडी,खिद्रापूर

सध्या यात्रेचे योग आहेत. आईची आणि माझी अचानक घडलेली ही अजून एक छोटीशी यात्रा. पहाटे लवकर निघालो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण अल्हाददायक होतं.  सगळीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गाचा  हिरवगार गालिचा तयार झालाय. उगवतीच्या सूर्याची किरणं कृष्णा कोयनेच्या पाण्यावर हिऱ्यासारखी चमचमत होती.  गाई गुरांचा रवंथ करतानाचा येणारा एक विशिष्ट वास, वासरांचं हंबरणं, पक्षांचा किलबिलाट , मधूनच  येणारा चुलीचा वास...अहाहा!! दिवसाची सुरवात अशी एकदम प्रसन्नतेने झाली.

नरसिंहपुर...
     सुरवात नरसिंहपूर पासून केली. मंदिर परिसरात पोहचताच पारिजातकाच्या फुलांचा स्वर्गीय सुगंध दरवळला. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे ओली झालेली जमीन, तिच्या मातीचा गंध  त्यावर सडा पडलेली चांदण्यांसारखी  केशरी देठाची ती नाजूक फुलं. दोन्हींच्या संमिश्र अशा सात्विक,दैवी सुगंधाने परिसर भरून गेलेला.
     नरसिंह मंदिरात सकाळची आरती मिळाली.  अखंड शाळिग्रामात कोरलेली पुरातन मूर्ती अप्रतिम आहे. गर्दी नव्हती ,अगदी चारच जण आरतीला होतो त्यामुळे खूप छान दर्शन झाले. आरती, घंटानाद झाल्यावर तिथेच बसून ध्यान करता आले. गुरुजींनी दिलेला तीर्थ प्रसाद घेऊन कृष्णा नदीकाठी असलेल्या महादेव मंदिराकडे गेलो. मंदिर छोटंसं पण एकदम देखणं ,सुंदर रंगवलेलं आहे. त्याच्या मागून वाहती कृष्णा नदी . कृष्णेच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहकडे पाहत राहणे हा निखळ आनंद. एकदम meditative. थोडा वेळ परिसर फिरून पुढे औदुंबर ला निघालो.

औदुंबर, भिलवडी...
     औदुंबर ला पोहचता पोहचता पाऊस लागला. पायऱ्या उतरून खाली आईला घेऊन जाणं थोडं धोक्याचं वाटत होतं...दगडी पायऱ्या चिखल, शेवाळ्या मुळे  खूपच निसरड्या झाल्या होत्या ...त्यामुळे पडायची भीती वाटत होती...ह्या वयात तिच्यासाठी जरा हे जिकिरीचं होतं...पण आईची इच्छाशक्ती दांडगी आहे... एखादी गोष्ट करायची  तिने मनाने ठरवली की काहीही करून ती ती पार पाडतेच.... नेहमीच प्रेरणा मिळते तिच्याकडून मला. हळूहळू एकेक करत पायरी उतरून ती देवळात पोहचली. दत्तगुरुंची च कृपा... तिथे दर्शन घेऊन क्षणभर विसावलो. समोर नदी पलिकडे एक सुंदर मंदिर दिसले. खरंतर बऱ्याचदा औदुंबर ला जाणं होऊन त्या मंदिरात जायचा कधी योग आला नव्हता की तिकडे फारसं लक्ष ही गेलं नव्हतं. योग असतात एकेक... भावाने हट्टाने सांगितले काहीही झालं तरी त्या मंदिराला भेट द्याच म्हणून. तिथून निघालो ते त्या भिलवडीत असलेल्या मंदिराकडे. 
     पंधरा मिनीटात पोहचलो ...बाहेरून मोठी दगडी compound भिंत आहे...वळसा घालून गेलो आणि समोर भव्य असं स्वच्छ, सुंदर, रंगवलेले पुरातन मंदिराचे प्रथम दर्शन. एकदम ऐसपैस आणि शांत आवार...श्री देवी भुवनेश्वरी चे हे मंदिर.  संपूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचे. दगडी खांब, कोरीवकाम आहे. कळसावर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 
     गर्दी नव्हतीच. त्यामुळे अगदी गर्भगृहा पर्यंत जाऊन गुरुजींनी दर्शन घ्यायला सांगितले.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली, एका हाता मध्ये शंख तर दुसऱ्या हातात चक्र धारण केलेली अत्यंत विलोभनीय अशी आहे. पूजा साधारण कोल्हापूरच्या आंबाबाई सारखी आहे. 
     त्याच परिसरात महादेव, विठ्ठल रुक्मिणी, गणपती अशी ही मंदिरे आहेत. समोरच काळभैरवाचे ही छोटेसे मंदिर आहे.  दीपमाळ आहे. भक्तांची साद ऐकायला कृष्णेच्या एका तटावर श्रीदत्तप्रभु तर दुसऱ्या तटावर श्री भुवनेश्वरी विराजमान. अवश्य भेट द्यावी असे हे स्थान.

रामलिंग बहे...
      भिलवडी चे भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहून नरसोबाच्या वाडीला जायला निघालो. आमचे ड्रायव्हर,कृष्णा म्हणाले काकू चालू शकत असतील तीन चार किलोमीटर तर रामलिंग बहे पाहायला जाऊ. देवाला जायला आईची कधीच ना नसते...काहीही झालं तरी चालेनच म्हणाली, पण एवढं म्हणतायत ते, योग आलाय चांगला तर जाऊनच येऊ. प्रबळ इच्छाशक्ती.
     रामलिंग मंदिर कृष्णानदी मधे एका बेटावर आहे. नदीवरच्या बांधाच्या भिंतीवरून पायी जावे लागते...तीच वाट पुढे मंदिरापर्यंत जोडली आहे.  आम्ही नदीकाठी पार्किंग area मध्ये कार पार्क करून निघालो.
      तेवढ्यात अचानक एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू कुठूनतरी पळत येऊन अगदी माझ्याशी जुनी ओळख असल्यासारखे माझ्या अंगावर उड्या मारून पाय चाटू लागलं. एकदम उचलून घ्यावं असं वाटलं. भुक्याजलेलं दिसत होतं. पण त्याला खायला देण्यासारखे जवळ काहीच नव्हते. आजुबाजूला पाहिलं खरं दुकानं ही नव्हती. दोन पाच मिनिट थांबून आम्ही शेवटी नाईलाजाने पुढे चालायला लागलो. ते पिल्लुही आमच्यासोबत च चालत निघाले. 
     नदीच्या बांधावरून चालताना बरेच पक्षी दिसले. बदकं , बगळे, खंड्या,  सुगरणी, ग्रीन bee eater, stork, भारद्वाज,मैना, sunbirds, कबुतरं, अजून बरेच. माकडं ही भरपूर होती वाटेत. मला आमची शृंगेरी ची ट्रीप आठवली त्यामुळे जरा जपूनच निघाले. पण ह्या माकडांनी काही त्रास नाही दिला. कुत्र्याचे ते पिल्लु ही सोबतच होतं. भरपूर झाडी, दोन्ही बाजूंनी खडकांमधून  वाहणारी नदी आणि आम्हीच तिघे वाट चालत मंदिराजवळ पोहचलो. बाकी माणसं कोणीच नव्हती आजुबाजूला. मजबूत भिंत, दगडी पायऱ्या, वडा पिंपळाचे मोठाले वृक्ष, बराच मोठा आवार आहे. पायऱ्या चढून वर गेलो, दगडी बांधकाम असलेलं सुंदर मंदिर दिसले. काळ्या पाषाणात कोरलेला मोठा नंदी आहे. महादेवाची पिंडी त्यामागे राम लक्ष्मण सीतेच्या सुबक मूर्ती असं मुख्य मंदिर आहे. त्याच मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमान , गणपती अशीही बाकीची मंदिरे आहेत. बाजूने खळाळत वाहणारी नदी, एकदम शांत परिसर खूप आवडला. 
     थोडावेळ तिथे उभे राहून परिसर, पक्षी, नदी पाहत उभ्या होतो दोघी तर ते बिचारं कुत्र्याचं पिल्लु ही दमून विश्रांती घ्यायला अगदी आमच्या पायाजवळच येऊन झोपले. तिथेही त्याला काही खायला द्यायला मिळालं नाही त्यामुळं आम्हाला मनातून फार वाईट वाटायला लागले. 
     तिथून परत जायला निघालो तर परत पिल्लाची स्वारी आमच्या मागे. पार्किंग area मध्ये येऊन कार मध्ये बसणार एवढ्यात मला आठवलं एका डब्यात चारपाच बेसनाचे लाडू घेतले होते. त्यातला एक लाडू काढून आधी थोडासा त्या पिल्लाला भरवला. खातंय असं दिसल्यावर एकदोन लाडू त्याला भरवले. त्यानं ही अगदी मिटक्या मारत खाल्ले. कुठले काय ऋणानुबंध असतात आपल्या आकलना पलीकडचे आहे. त्याचा आमच्यासोबतच कार मधून येण्याचाच मानस होता😀....माझ्याही मनातून त्याला सोबत आणावं असंच वाटत होतं पण मनाला आवर घालून पण त्याला थोडंसं कुरवाळून त्याचा निरोप घेऊन पुढच्या वाडीच्या यात्रेला निघालो.

नरसोबाचीवाडी , खिद्रापूर, कोल्हापूर
    
     रामलिंग बहेहून निघालो  नरसोबाच्या वाडीला  पोहचे पर्यंत चांगलाच पाऊस लागला. मंदिराच्या वाटेवर दुकानांमध्ये ठेवलेल्या पेढे, खवा, बासुंदी, कवठाच्या बर्फीचा संमिश्र असा मस्त खमंग वास आला. नरसोबा वाडीची खासियत. बाळ लोकरीची कांबळी, घोंगडी बाजारात दिसू लागली. मन एकदम बालपणात झेपावलं. त्या बाळ लोकरीच्या जेन ची सर आत्ताच्या लाखाच्या घरातल्या सोफ्यांना ही नाहीच. थंडीत ऊब देणारी आणि गरमी मध्ये थंडावा, म्हटलं तर सोफा, बैठक, तर घटकेत अंथरूण. त्यात पुन्हा हळदीकुंकवा सारखे छोटे मोठे समारंभ असोत किंवा आम्ही मांडलेले भातुकलीचे, कॅरम चे खेळ असोत, माहेरची मायेची ऊब ठासून भरलेलं असं सगळ्यांना सामावून घेणारं  जादुई जेन.
    पाऊस कमी झाल्यावर दर्शनाला गेलो. पाण्याच्या मोठ्या पाईप ने मंदिर परिसर धुवून काढायचं काम चालू होतं. सूचक होतं... आपल्या मनातली ही क्लिमिषं, संदेह, काळज्या, चिंता धुवून काढून दत्तप्रभुंच्या चरणांशी नतमस्तक व्हा. प्रदक्षिणा मार्गावर पूजेच्या अभिषेका च्या घागरी लख्ख धुवून ठेवल्या होत्या. दर्शनाने आमची मनं ही तशीच झाली. 
    श्री दत्त प्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे १२ वर्षे वास्तव्य करून तपश्चर्या केली. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंह स्वामींचा जन्म झाला. १३८८ मध्ये संन्यास दीक्षा घेऊन ते तिर्थटनाला निघाले. १४२२ ला औदुंबर क्षेत्री त्यांनी मुक्काम केला. कृष्णा पंचगंगा किनारी १२ वर्षे तपश्चर्या करून तेथे पवित्र संगमस्थळी औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवी ची स्थापना केली. आणि आपण येथे वास करू अशी भक्तांना ग्वाही देऊन गाणगापुरी प्रस्थान केले. तेच हे नृसिंहवाडी/नृसिंह वाटिका/नरसोबाची वाडी क्षेत्र. 

(माहिती गूगल वरून साभार.)

खिद्रापूर ...
     पुढे वाडीहून खिद्रापूर ला आलो. तेथे कोपेश्वर आणि जैन मंदिर प्रसिध्द आहेत. महादेवाचे हे प्राचीन मंदिर शिलाहार  शिल्प स्थापत्य शैलीचे आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

   मंदिराची फार पडझड झाली आहे. एक खुला मंडप ,आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा तलविन्यास आहे. बऱ्याच भग्न केलेल्या मूर्ती दिसून येतात. वाईट वाटते फार असे पाहून. जवळच जैन मंदिर आहे. त्याचीही शिल्पकला फार सुंदर, पाहण्यासारखी आहे. सुस्थितीत आहे ते मंदिर. 

     तिथून थेट आम्ही कोल्हापूर ला गेलो. खूप गर्दी असूनही शांत निवांत दर्शन घेता आले. कुठेही गडबड गोंधळ न होता. फार प्रसन्न वाटले. मंदिर परिसरातील बाकीच्या मंदिरांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला आम्ही दोघी जायला निघालो, आईची एक बालपणीची मैत्रीण अचानक देवळात भेटली... आणि तेवढ्यात पुन्हा एकदा ढग दाटून आभाळ भरून आले... आणि आमची मनंही.

सौ. श्वेता अनुप साठये✍️