वाराणसी
भाग १
श्रावण महिना चालू झाला आणि अचानक अहो ना office ला आठ दिवस सुट्टी मिळाली. कुठेतरी फिरून येऊ असं मनात आलं. वाराणसीलाच जायचं ही अनुपची तीव्र इच्छा होती. खरंतर नुकतीच गावाला जाऊन मी परत आले होते त्यामुळे जरा निवांत राहण्याचा मूड होता पण वाराणसी चा प्रस्ताव आल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता तयारीला लागले. जे आधी जाऊन आलेत त्यांच्याकडून होईल तेवढी माहिती गोळा केली. माझ्या भावाने P.S. वेंकटरमणन (Mission Man of Kashi ) यांच्या बद्दल माहिती दिली. काशीच्या पुरातन मंदिरांचे हे अभ्यासक आहेत. काशीच्या देवालयांवर अभ्यासपूर्ण बरीच पुस्तकं त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लिहिली आहेत. आम्हालाही पुरातन मंदिरांबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडते. आणि त्यातून ही तर काशी यात्रा. त्यांना भेटायचे ठरवून आमची यात्रा आरंभ झाली.
संध्याकाळच्या flight ने आम्ही वाराणसीत दाखल झालो.
वाराणसी!! काशी!!बनारस!!
साक्षात महादेवाची, शिवाची नगरी. तिकडच्या श्रावण महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता. आपला महिना आमावास्येपासून सुरू होतो तर उत्तरेकडे पौर्णिमे पासून. त्यामुळे आपल्या आधी तिथीनुसार भारतीय महिना तिकडे सुरू होतो. कावड यात्रा सुरू होती. त्यामुळे प्रचंड गर्दी. अक्षरशः मुंग्यांसारखी... हजारोंनी देवदर्शनाला आलेले भाविक. अनवाणी... कुठूनकुठून तिर्थांच्या कावडींचे ओझे खांद्यांवर घेऊन वागवत काशीत दाखल होत होते. केशरी वस्त्र परिधान केलेले भाविक. स्त्रिया, पुरुष, लहानग्यांचाही तेवढाच सहभाग होता. कोणी आईवडिलांसोबत पावलांवर पाऊल टाकून धावणारे तर काही चिल्लीपिल्ली त्यांच्या खांद्यावर बसून , काही कडेवर. प्रत्येकाचे कपाळ अष्टगंधाच्या मळवटाने भरलेले, त्यावर कुंकवाचा छाप शंकरा सारखा तिसरा नेत्र / त्रिशूळ,/ओम अशी प्रतिकं. भोलेनाथाचा सतत जयजयकार करत चालत राहिलेले. दोन दिवसांनी येणाऱ्या श्रावणी सोमवार ची तिथी त्यांना पूजेसाठी गाठायची होती. मला आपल्या पंढरपुरच्या वारकऱ्यांची आठवण आली.
स्वतःच्याच तेजाने प्रकाशित असलेली, प्रकाशमान झालेली अशी ही काशी. साहजिकच भक्त आकर्षित होणारच. एक वेगळ्याच प्रचंड ऊर्जेची अनुभूती आपल्याला ही जाणवते. एरवी शरीराच्या अनंत कुरबुरी असणारे लोक, लहान, तरुण, वृद्ध, अपंग, अंध एक ना अनेक प्रकारचे भाविक या यात्रेसाठी मनात सामर्थ्य एकवटून नुसते धावत राहतात... सगळं काही विसरून...भक्तिरसाने न्हाऊन...गंगा स्नानासाठी, आणि त्या भोलेनाथाच्या दर्शनासाठी. त्याला श्रध्देने तीर्थ स्नान, अभिषेक घालण्यासाठी.
कावड यात्रेकरूंना नीट चालता यावे यासाठी काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून साधारण तीन ते चार km पर्यंत वाहनांना बंदी घातली होती. आम्ही आमच्या गाईड ना भेटायला त्या गर्दीतून वाट काढत, एकमेकांचे हात घट्ट धरून कसेबसे त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या दुकानात पोहचलो. साड्यांचे व्यापारी असलेले हे गृहस्थ आणि त्यांची टीम काशीमधल्या पुराण काळापासून महत्व असलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार, त्याचा प्रचार, प्रसार याचं काम ते आपला व्यवसाय सांभाळून करतात. दुसऱ्या दिवशी पासून ते आम्हाला होतील तेवढी पुरातन मंदिरं दाखवायला येणार होते. मी विचारले, " भैय्या, कितने मंदिर है काशी में?" भैया,"दीदी, वैसे तो कण कण में बसे है शिव जी यहाँ काशी में| पुराणो में लिखा है हमारे शरीर में जितनी नाडि हैं यानी खून की बहती धमनियाँ है, मानो कम से कम उतने मंदिर तो है ही...याने समझो कम से कम७२,०००. उससे भी कई ज्यादा ही होंगे. ऐसा कहते हैं काशी नगरी भगवान शिव के त्रिशूल पर बसी है| और हर एक देवी देवता का देवालय भी यहाँ है ही| कहते है शिव आके यहाँ बस गये थे तभी स्वर्ग से सभी देव, देवता, आदित्य,रुद्र, वसू सभी आ के यही बसे ,शिव जी की आराधना में लीन| उनके भी कई मंदिर यहाँ स्थापित है| जितना दिखा सकते हैं दिखा देंगे आपको|"
एवढ्या माणसांच्या प्रचंड समुद्रात चुकायची भीती होतीच. त्यातून वाहनही बंद. ते सगळे instructions, landmarks यांची माहिती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचे ठरवले.
तशी प्रथा प्रथम गंगा स्नान करून काळभैरवाचे दर्शन घेऊन बाकी यात्रेला दर्शनाला सुरवात करतात. पण त्यादिवशी च्या प्रचंड गर्दीमुळे गंगा स्नान आणि काळभैरवाचे दर्शन घेणं शक्य होणार नाही असं गाईड ने सांगितले. जवळ जवळ तीनचार km एवढी गंगास्नान आणि विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी रांग होती. पुरा मुळे नावा ही बंद होत्या. त्यामुळे प्रथम दोनतीन तास रांगेत उभे राहून काशी विश्वेश्वराचे दर्शनाने आमच्या यात्रेला सुरुवात झाली. कॉरिडॉर एकदम भव्य, आणि सुंदर बांधला आहे. मागे आम्ही रामेश्वरम् यात्रा केली होती. एवढी गर्दी असूनही मंदिरात अगदी जवळ जाऊन पिंडीवर रामेश्वरम् तीर्थ अर्पण करता आले. खूप समाधान वाटले. तिथेच जवळ असलेलं अन्नपूर्णा देवीचे ही दर्शन घेतले. तिथून गल्ल्यांमधून चालत एकामागोमाग एक अशी अठरा ते वीस मंदिरं पाहिली. जवळ जवळ दहा km परिसर , गल्ली बोळ, घाट ,चढ, उतार. उन्हाच्या प्रचंड तडाख्यात, जवळ जवळ ४०°c मध्ये फिरून ही मंदिरं पाहिली. गाईड म्हणाले," हम कौन होते है देखने या दिखाने वाले... वोही शक्ती देगा... वही यात्रा भी करायेगा...भोलेनाथ का ही बुलावा आया है आपको, जितना भाग में लिखा होगा देखेंगे"...
काशी विश्वनाथ
अन्नपूर्णा
शनेश्वर
शुक्लेश्वर
गवास्तेश्वर
मंगला गौरी (अशा अष्ट गौरी आहेत.)
बिंदू माधव ( अत्यंत प्राचीन मंदिर होते. आक्रमणामुळे मूळ मंदिर नष्ट झाले ...हे विष्णु मंदिर समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना आज्ञा देऊन प्रतिष्ठापना केलेले. औंध चे सांस्थानिक पटवर्धन ,त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ह्याचे व्यवस्थापन , पौरोहित्य आहे. १०८ नर्मदेश्वर तिथेच प्रतिष्ठापित आहेत. अत्यंत सुंदर मंदिर गंगे काठी आणि सुंदर व्यवस्थापन असलेलं.)
तेलंग स्वामी( हे श्री रामकृष्ण परमहंसस्वामी यांचे गुरू, समाधी, यांनी स्थापन केलेले मोठे शिवलिंग, काली माता ,गणपती अशी मंदिरे एके ठिकाणी या आश्रमात आहेत. याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी स्थापन केलेली श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातली अतिशय विलोभनीय अशी मूर्ती आहे. )
चंद्रेश्वर आत्मलिंग (प्रजापतीच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्राने या ठिकाणी भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकर पार्वती प्रसन्न होऊन प्रकट होऊन त्याला पापमुक्ती मिळाली. अशी अख्यायिका..सिध्देश्वर, सिध्देश्वरी रुपात शंकर पार्वती तिथे विराजमान झाले. तिथेच एक कुंड आहे... चंद्रकूप...आपले प्रतिबिंब त्यात पाहतात...काही बाधा असेल तर प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही असे गाईड ने माहिती दिली.)
विश्वेश्वर
मांगलेश्वर
बुध्देश्वर
बृहस्पतिश्वर
बासुकिनाथ
रत्नेश्वर(मणीकर्णिका घाटावर गंगेच्या पात्रात थोडे झुकलेले हे प्रसिध्द मंदिर रत्नेश्वर ...पाण्याखाली असते पाणी ओसरले तर दर्शन घेता येते.)
मणीकर्णीका कुंड (इथे मार्जन केले. तिथून समोर असलेल्या घाटावर गंगामार्जन ,पूजा इत्यादी केले.)
मनोकामना ईश्वर (मणीकर्णिका घाटावर असलेले हे मंदिर...जागृत देवस्थान...मनातील इच्छा इथे बोलून दाखवतात, त्या पूर्ण होतात अशी श्रध्दा आहे.)
सिध्दीविनायक
राम दरबार
बडी काली माता
मदिकेश्वर
एवढं करून मातीच्या वाड्ग्यातून(कुल्हड वाली)लस्सी घेतली. Blue lassi दुकानाचे नाव...अप्रतिम चव, भरपूर variety ... मलई वाली लस्सी, फ्रूट लस्सी.वाह!!
दुसऱ्या दिवशी पहाटे ४ ला उठून दशाश्वमेध घाटावर गेलो. वाटलं गर्दी थोडी कमी असेल तर गंगा स्नान करता येईल. पण आमचा अंदाज साफ चुकला. 😀 पाय ठेवायलाही जागा नाही एवढी प्रचंड गर्दी दुसऱ्या दिवशीही होतीच. वाटेत कावडी लोक रस्त्यातच दमून झोपलेले, काही गंगा स्नान करून रांगेत उभे ठाकलेले. आम्ही पण बाहेर पडलो होतोच म्हणून एकमेकांचा हात घट्ट पकडुन त्या गर्दीतून वाट काढत कसेबसे गंगेच्या पात्रात दाखल झालो. पण मुंगीला ही पाय ठेवायला जागा नाही अशी अवस्था. पोलिसांनी दटावलेच... "आदत नही है आपको लागता है, कही बह जाओगे, बाहर निकलो, ज्यादा पानी में मत जाना, बाहर निकलना मुश्किल हो जायेगा"....नुसतं डोक्याला पाणी लावून घेतलं आणि तिथून परत तीनेक km चालून गर्दीतून सहिसलामत बाहेर पडलो.
वाटेत वेगवेगळे चण्यांचे चाट चे ठेले, कुल्हड मधून चहा,पूजेची साहित्य अशा बऱ्याच टपऱ्या दिसत होत्या. तिथून जंगमवाडी मठ पहिला. गाईड आल्यावर पुढची मंदिरं पाहायला सुरवात केली.
दुसऱ्या दिवशी पाहिलेली मंदिरे...
महालक्ष्मी गौरी (या काली माता, लक्ष्मी, शारदा अशा एकत्रित मूर्ती आहेत.)
जीवपत्रिका माता (जिला आपण सट्वाई म्हणतो)
संकटामाता (संकट हरणारी)
लक्ष्मिकुंड
आदिकेशव (भगवान विष्णु चे सर्वात प्रथम पृथ्वीवर वाराणसी क्षेत्रात प्रथम प्रकट झाले ते स्थान...म्हणून नाव आदि केशव...विष्णूने आदिकेशव रुपात वरुणा गंगा संगमावर संगमेश्वराची स्थापन करून काशी क्षेत्री राहून शंकराची आराधना केली.)
ज्ञानकेशव
संघानेश्वर आदित्य
विधायक ओंकार
मकर ओंकार
कामेश्वर
दुर्वासेश्वर
त्रिलोचन महादेव आदित्य
राम दरबार
वाराणसी देवी
काली देवी
नर्मदेश्वर
कृतीवासेश्वर
महाकालेश्वर
ब्रिजकालेश्वर
मृत्युंजय महादेव(अकाल मृत्यू हरणारा असे महत्व)
भैरव
धन्वंतरी महादेव
धन्वंतरी कुंड(इथलं तीर्थ सर्व व्याधी दूर करते असं पवित्र तीर्थ)
जागेश्वर महादेव
जिकडे बघू तिकडे मंदिरं च मंदिरं. बघू तेवढी कमीच....प्रत्येकाची वेगळी अख्यायिका, महत्व....खरंच शिवाचा कणा कणात वास असलेली शिवनगरी.
वारिणी आणि अस्सी नद्यांच्या संगमावर वसलेली ही वाराणसी. गंगा, सर्व पापांपासून मुक्ती देणारी. सर्व दोषमुक्त करणारी. वाराणसी, काशी...अविमुक्त नगरी. ना भक्त कधी हिचा त्याग करू शकत , नाही भोलेनाथ शिव कधी तिचा त्याग करत. शंकराची अत्यंत प्रिय अशी अनंत काल पासून असलेली आणि अनंतकाला पर्यंत असणारी अशी ही अविमुक्त काशी.
||शंभो हर हर महादेव||🙏
©सौ.श्वेता अनुप साठये ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा