रविवार, २ जुलै, २०२३

होरनाडू, श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर

होरनाडू, श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर

     चिकमंगळूर पासून शंभर किलोमीटर वर पश्चिम कर्नाटकात ,हिरव्यागार डोंगर दऱ्यांच्या कुशीत आणि भद्रा नदीच्या काठावर हे होरनाडू गाव वसलंय. वाट अतिशय घनदाट जंगलातून आणि नागमोडी घाटातून आहे. तिथले श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचं मंदिर खूप प्रसिध्द आहे. 
     महर्षी अगस्त्य यांनी अन्नपूर्णा रुपी पार्वतीची प्रतिष्ठापना इथे केली होती. नंतर आदी शंकराचार्यांनी ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगतात.
     पुराणांमध्ये एक कथा आहे. एकदा शंकर पार्वतीला सर्व जग हे मायारुपी आहे हे समजावून सांगत असतात. त्यावर पार्वती असहमती दाखवून 'अन्न' हे ' माया ' नाही हे सांगत असते. हे पटवून देण्याकरता ती स्वतः अदृश्य होते. परिणामी सगळी प्रकृती स्तब्ध होते. ऋतुचक्र थांबते त्यामुळे सर्व जगात दुष्काळ पडतो. अन्ना वाचून सर्व सजीव तडफडू लागतात. त्यांची दया येऊन  पार्वती अन्नपूर्णे चं रूप घेऊन प्रकट होते. आणि सर्वांना अन्न दान देऊन वाचवते. आशीर्वाद देते. या प्रसंगी अखेर साक्षात महादेव ही अन्नाचे महत्त्व पटल्याने देवीअन्नपूर्णे कडे भिक्षा मागण्यास येतात.
     हे मूळपीठ काशी मध्ये ही आहे. 
    मंदिरात जाण्यासाठी पस्तीस/ चाळीस पायऱ्या आहेत. मंदिर अतिशय स्वच्छ, सुंदर आहे. भरपूर गर्दी होती तरीही कुठेही गडबड नाही , गोंधळ जाणवला नाही. एकदम पध्दतशीर सगळी व्यवस्था आहे. देवीला अर्पण करण्याचे हार,ओटी, नारळ इ. साठी वेगवेगळ्या मोठ्या पेट्या ठेवल्या आहेत. शिवाय पायदळी काही पडू नये याची कटाक्षाने दक्षता घेतली जाते. सतत स्वच्छता चालू असते. दक्षिणेकडील सर्व देवस्थानांमध्ये हाच सुखद अनुभव येतो. उत्तरेकडील काही अपवाद वगळता बहुतेक सर्व देवळांमध्ये मात्र याचा अभाव जाणवला. ह्या देवस्थानां कडून शिकून त्यांनीही योग्य बदल करावेत असं वाटतं.
    गोपुरांवर, सभामंडपात, गर्भगृहात एकदम देखणी शिल्पकला, चित्रकला पाहायला मिळते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी महाआरती असते. त्यावेळी संपूर्ण सभामंडप तेलाच्या दिव्यांनी उजळतात. सुगंधी फुलांची आरास करतात. घंटा नादात मंत्रमुग्ध वातावरणात आरती संपन्न होते. अगदी शांतपणे कसलीही घाई गडबड न होता दर्शन झाले.
     मंदिराच्या च बाजूला  प्रसाद मंडपम् म्हणजे भोजन शाळा आहे. आलेल्या भक्तांसाठी प्रसादाच्या भोजनाची व्यवस्था आहे. सक्करे पोंगल, म्हणजे खीर , सांबार भात, रस्सम भात,  पुलिओगरे , शेवटी थंडगार मजगे म्हणजे ताक असा एकदम सौदिंडियन सात्विक बेत असतो. मला गोंदवल्याची आठवण आली. इथलीही व्यवस्था, स्वच्छता एकदमच परफेक्ट. काल आषाढी एकादशी दिवशी आमचा अन्नपूर्णा दर्शनाचा योग होता. 
     निसर्गाच्या कुशीत वसलेलं, एकदातरी भेट द्यावी असं हे तीर्थक्षेत्र श्री अन्नपूर्णेश्वरी.🙏

सौ. श्वेता अनुप साठये
१/७/२३
फोटो गुगल साभार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा