स्वप्नपूर्ती
(वर्धा, आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ ,ताडोबा सफारी)
पुस्तक वाचन हा माझा आवडीचा छंद. पुस्तकं वाचत असताना मी नेहमी त्या पुस्तकाच्याच दुनियेत मनाने भ्रमण करत रमत असते. बऱ्याच वर्षांपूर्वी आलिबाबाच्या गुहेतून रत्नांचा खजिना सापडावा तसे पुस्तकांच्या दुकानात मला अतिशय मौल्यवान अशी दोन पुस्तकरत्नं सापडली.
नाव होते "नेगल"!!
श्री विलास मनोहर यांनी लिहिलेली ती दोन्हीही पुस्तकं अक्षरशः झपाटल्यासारखे मी एका बैठकीत वाचून काढली होती. अद्भुत पण अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा दुनियेची ओळख त्या पुस्तकांनी मला तेव्हा करून दिली होती. आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ ही नावं मी पहिल्यांदा तेव्हा ऐकली आणि आभाळा एवढी मनं असलेल्या अशा माणसांचा पुस्तकरूपातून परिचय झाला होता. आयुष्यात एकदातरी त्यांना तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटावे, त्यांनी राबवलेले सर्व प्रकल्प पाहून यावेत अशी तीव्र इच्छा माझ्या मनात तेव्हापासून होती. शुध्द हेतूने आपण जे चिंततो ते कधी ना कधी घडून येतेच. त्याप्रमाणेच ह्या महिन्यात माझी ती इच्छापूर्ती झाली. घरातल्या कुणालाही सुट्टिअभावी माझ्यासोबत येणं शक्य नव्हते त्यामुळे एका ग्रुप सोबत केलेली ही अविस्मरणीय सफर....
पहिल्या दिवशी पुण्याहून वर्ध्याला गेलो. तिथे सेवाश्रम, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार चा परमधाम आश्रम पाहिला. धाम नदीकिनारी असलेला ह्या आश्रमात शांतता, नीटनेटकेपणा, स्वच्छता, शुध्द हवा तिथल्या जुन्या वास्तूंमध्ये अनुभवली. तिथे खोदकामात सापडलेल्या पुरातन मूर्ती , राम भरत , गीताई ध्यान मंदिर सुंदर आहे. तिथल्या साधकांनी लावलेली आणि बहरलेली फुलबाग,भरपूर तुळशी, छोट्याशा वाफ्यात लावलेल्या हिरवागार भाजीपाला, शेजारीच असलेला गायींचा गोठा, नदीकिनारी दिसणारा उगवतीचा सूर्य... सहलीची सुरवात रामप्रहरी अशा सुंदर वातावरणाने झाली.
पारिजातकाच्या फुलांनी ओंजळ भरुन तिथून आम्ही आनंदवन ,वरोरा ला जायला निघालो.
क्रमशः
©सौ श्वेता अनुप साठये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा