"महापूर"
आई कशी ना अगदी जन्मापासूनच आपल्या लेकरांची काळजी घेत असते. हवं नको ते पाहते. जेवणखाण, कपडेलत्ते ,सर्व सर्व काही तैनात ठेवते. मायेनं आंजारते गोंजारते. अगदी त्यांचे भरपूर लाड पुरवते . सर्वतोपरी चांगली शिस्त लावायचाही आटोकाट प्रयत्न करते. कधी प्रेमाने समजावून तर वेळप्रसंगी नाहीच बधली तर पाठीत दोन रपाटे घालूनही.
काही मुलं कशी अगदी शांत, तिचं सर्वकाही ऐकणारी, तिला घर आवरण्यात मदत करणारी , तिच्याकडून बरंच काही शिकणारी तिचा आदर करणारी असतात . पण काही जणं मात्र तिनं कितीही प्रेमानं सांगितलं ,शिस्त लावायचा प्रयत्न केला तरी तिला अज्जिबात न जुमानणारी असतात. त्यांना हवं तेच आणि हवं तशीच मनमानी करणारी असतात. काही केल्या ती बधत नाहीत. कितीही समजावले तरी त्यांची ऐशारामी ,आयदी वृत्ती काही जात नाही. घरभर वस्तूंचा पसारा, कपड्यांचे ढीग, वस्तूंची मोडतोड, बेशिस्तीचा कारभार नुसता. त्यामुळे आईला त्रास होतोय, ती दुःखी होतीय , बऱ्याचदा स्वतःच्या इच्छा आकांक्षाही बाजूला ठेवून आपल्यासाठी झटतीय हे गावीच नसते त्यांच्या. एवढं तिला गृहीतच धरून चालतात. कधीतरी मग तिच्याही भावना अनावर होतात आणि ती मग दुर्गेचं रूप धारण करते. नाठाळ मुलांना ओरडते, रागोभरते. भरपूर धपाटे घालते पाठीत. चांगली बडवून काढते आणि मग मारल्यावर वाईट वाटलं म्हणून मनाचा बांध फुटून स्वतः च रडरड रडते. आसवांचा अगदी पूर येतो. चिंता एकच असते तिला की ह्या मुलांना मी कशी सुधारू?
आईच ती! , तिच्या रागाने घाबरून कोपऱ्यात उभ्या असलेल्या मुलांना पुन्हा काळजाशी घेऊन कवटाळते. मुलं ही मग कावरी बावरी होऊन तिचे डोळे पुसायला जातात. "आम्ही आता छान नीट वागू "अशी हमी देतात. तिचा आलेला राग कुठल्याकुठे पळून जातो. तिही लेकरांना प्रेमाने समजावते आणि पुन्हा 'शहण्यासारखं वागा आता ',असं म्हणून परत पसरलेलं घर हसतमुखाने सावरायला जाते.
तसंच असेल का हो आपल्या आई, वसुंधरेचं?
कित्ती कित्ती करते नै ती आपल्यासाठी. आजपर्यंत काही म्हणून कमी पडून दिलं नाही तिनं आपल्याला खरं तर. भाजीपाला, फळफळावळ, गुरं ढोरं , दूध दुभतं, बाग बगीचे ,शुद्ध ,पवित्र पाण्याच्या नद्या विहिरी, तळी डोंगर दऱ्या, जंगलं ,अथांग समुद्र सर्व सर्व काही. यादी अगणित आहे. पण आपल्या सारख्या तिच्या हट्टी लेकरांनी मात्र तिला फारच गृहीत धरलं. मन मानेल तसं वागत राहिलो. आपल्याला हवं तेच करत राहिलो. तिनं बनवलेल्या सुंदर सृष्टीत... जगभरात प्लास्टिकचा पसारा मांडून बसलो. नद्या नाल्यांमध्ये विषारी पाणी बिनदिक्कत सोडत राहिलो . प्रदूषणाने ती अगदी गुदमरून गेली तरी आपल्या लक्षात आलं नाही. तिनं नेसलेल्या तिच्या आवडीच्या हिरव्याकंच शालूची तर आपण फाडून फाडून पार अगदी लक्तरं करून टाकली. वाहत्या नद्या नाले मिटवून त्यावरही इमारती बांधून रिकामे झालो. तिच्या मनाचा थोडाही विचार केला नाही. की तिला समजून घेतले नाही. किती सहन करेल बिचारी?
परवा मग ती फारच चिडली. दुर्गेचंच रूप तिने जणू धारण केलं. विजेच्या कडकडाटाने सर्वांवर रागावली. "काय केलं म्हणजे ही लेकरं सुधारतील ?", मनामधे तिच्या काहूर उठलं. विचारांनी तिचं मन फार उद्विग्न झालं. आभाळ दाटून आलं. तिची सहनशक्ती पार संपून गेली. भावनोद्रेकाने तिच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धाराच्या धारा वाहू लागल्या. सर्वदूर त्या अश्रूंच्या पाण्याने महापूर आला. कृष्णा कोयना पंचगंगा अगदी दुथडीभरून वाहू लागल्या. आजूबाजूचं सगळं कवेत घेत निघाल्या. सर्वांची घरं दारं, गुरं ढोरं, शेतीवाडी सर्वच्यासर्व आसवांच्या पाण्यामधे वाहून जाऊ लागलं. सर्वजण घाबरून सैरावैरा धावू लागले. सर्वांचे हाल बघवेना झाले. प्रलयच आला . रडून रडून डोळ्यातली आसवंही संपली तिच्या. पूर तर ओसरला पण दुःखी मनाने आहे तशीच अजून बसून.
काढुयात का हो समजूत तिची? आवरूयात का आपण सर्व जगभरचा प्लास्टिकचा पसारा? सांगूयात तिला ,'आता खरंच नाही करणार प्रदूषण आणि नद्यांनाले दूषित.' तिचा आवडीचा आपण फाडलेला हिरवा शालूही देऊयात की परत शिवून...वर त्याच्या भरजरी फुलांचे रंगबिरंगे बुट्टेही विणून.
सरतेशेवटी आईच आहे की आपली ती . घेईल हृदयाशी कवटाळून . करेल आपल्याला माफ. हसेल पुन्हा एकदा छान आणि करेल परत मायेचा वर्षाव . बघुयात प्रयत्न करून.
©®सौ.श्वेता अनुप साठये
२१/०८/२०१९
फोटो गुगलवरून

Chhan Leah...sadya paristhitiwar bhashya karnara
उत्तर द्याहटवा