रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी - मसाला दूध

कोजागिरी


     शरदपौर्णिमेची रात्र ...घराच्या गच्चीवरून समोरच दिसणारी संथ वाहणारी कोयनामाई... तीरावर असलेली वनराई... कडुनिंब ,आंबा, नारळी, जांभूळ, बकुळ, गुलमोहोर, अशोक, रातराणी आणि सोनचाफ्याची हिरवाई... नदीकडून येणारा अल्हाद वारा... त्यावर स्वार होऊन येणारे निशीगंध, रातराणी अन चाफ्याचे मंद धुंद सुगंध... धरेने नेसलेला निरभ्र आकाशाचा भरजरी शालू... त्या काळ्याभोर रेशमी शालूवर चंदेरी चांदण्यांच्या विणलेल्या सुरेख बुट्ट्यांची नक्षी...गच्चीवर पसरलेले जाई, जुई, मोगऱ्याचे बहरलेले वेल... तिथेच निरभ्र आकाशाखाली पूर्णचंद्र ,चांदण्यांच्या शीतल छायेत सर्वांचं भरलेलं स्नेहसंमेलन... सान थोरांनी घातलेली शुभ्र नवीन वसनं...सवाष्णींनी ल्यालेल्या भरजरी रेशमी साड्या आणि वेणीवर माळलेले सुवासिक , शुभ्र पांढरे गजरे... रिंगण करून खाली बसलेली सर्व मंडळी... अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात रंगलेल्या  गप्पांच्या मैफिली आणि गोड  गळ्यांतून गायल्या  जाणाऱ्या गाण्यांचे मधुर सूर... मध्यभागी स्थापन केलेली महालक्ष्मीची ती प्रसन्न मूर्ती ... मध्यरात्री तिची मनोभावे केली जाणारी पूजा आणि भक्तिभावाने सर्वांनी मिळून केली जाणारी आरती...धूप दीपाचा हवेत दरवळणारा तो पवित्र  गंध... महालक्ष्मीच्या नैवेद्याला ठेवलेलं मोठ्या पातेल्यातलं सुका मेवा, केशराचा साज असलेलं मसाल्याचं दूध... त्यावर पडलेले पूर्णचंद्राचे शीतल कवडसे... अहाहा!! अमृताहून ही गोड असलेल्या प्रसादाच्या दुधाची ती गोडी...श्री महालक्ष्मीचा सर्वांना मिळालेला असा हा समृद्धी आणि आरोग्याचा भरभरून आशीर्वाद...

 ||को जागर्ति || को जागर्ति||

||नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते | शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ||🙏🌺

©सौ.श्वेता अनुप साठये
१३/१०/२०१९

मसाला दूध

साहित्य :-
दूध एक लिटर
बदाम ५/७ (कोमट पाण्यात भिजवून वरील साल काढून टाकावे)
काजू  १०
पिस्ते  ५
चारोळे २/३ चमचे (अर्धातास आधी पाण्यात भिजवून ठेवावी)
खजूर ५ ( बी काढून  कोमट दुधात तासभर भिजवून मिक्सरवर वाटून पेस्ट करून घेणे)
साखर आवडीनुसार (ऐच्छिक)
वेलदोड्याची पूड १ १/२ चमचा
जायफळ पूड १ चमचा
केशर काड्या १ चमचा (कोमट दुधात भिजवून ठेवणे म्हणजे छान रंग उतरतो)

कृती:-
* एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला चमचाभर पाणी घालून दूध घालून बारीक गॅस करून उकळत ठेवावे.
*दूध पळीने सतत हलवत रहावे. दूध लागू नये यासाठी छोटी बशी पातेल्यात तळाशी घालून ठेवावी.
* काजू ,पिस्ते, वेलदोड्याची पूड,जायफळ पूड, चिमूटभर केशर काड्या, दोन चमचे साखर हे साहित्य    मिक्सर वर अर्धबोबडे असे बारीक करून घ्यावे.
*साल काढलेल्या बदामाचे बारीक काप करून घ्यावेत.
*दूध थोडे अाटले की गॅस बंद करून त्यात खजुराची पेस्ट घालून दूध एकसारखे हलवून घावे.
* शेवटी दुधात सुक्या मेव्याची  पूड घालून त्यात दुधात आधी भिजत घातलेले केशर आणि चारोळ्या घालून ढवळून दुधाला परत एक उकळी आणून गॅस बंद करावा.
*जास्त गोड हवे असल्यास आवडीनुसार थोडी साखर घालून ढवळावे.

गरमगरम मसाला दुधाचा  सर्वांसमवेत आस्वाद घ्यावा.

©सौ.श्वेता अनुप साठये
१३/१०/२०१९









1 टिप्पणी: