गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

तीळाच्या वड्या

©सौ. श्वेता मोघे साठये
१५/०१/२०१९

"तीळाच्या वड्या"

      तीळाच्या वड्यांसारखाच गोड माझा हा आठवणीचा ठेवा.

     आपल्याला चांगले गुरू लाभणे म्हणजे भाग्याचेच लक्षण. त्याबाबतीत मी फार नशीबवान आहे.

     इयत्ता आठवीचा पहिला दिवस. वर्ग भरला. राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणून झाले. वर्गशिक्षिका बाईंनी हजेरी घेतली. प्रत्येकीने स्वतःची ओळख सांगून झाली. मग बाईंनी सूचना दिली," मुलींनो , तुम्हाला ह्या वर्षी खालील तीन पैकी एका विषयाची निवड करायची आहे. चित्रकला, गायन आणि होम सायन्स." कोण कोण कुठला विषय घेणार  यावरून वर्गात कुजबुज सुरू झाली. थोड्याच वेळात तिन्ही विषयांच्या तीन ही बाई वर्गात आल्या. "ज्यांना जो विषय घ्यायचा आहे त्यांनी त्या त्या संबंधित रांगेत जाऊन उभे राहावे. पुढे तोच विषय इतर शैक्षणिक विषयांसोबत तुम्हाला दहावी पर्यंत शिकायचा आहे. " अशी सूचना बाईंनी आम्हाला दिली. आणि गम्मत अशी झाली की काही अपवाद वगळता बहुतेक सर्व जणी आम्ही होम सायन्स च्या रांगेत जाऊन उभ्या राहिलो.
    त्याचं काय झालं ,आमच्या वर्गाच्याच वरच्या मजल्यावर जवळपास अमच्या वर्गावरच होम सायन्स चा वर्ग होता. आणि बाईंनी विद्यार्थिनींना शिकवण्या साठी केलेल्या निरनिराळ्या पदार्थांचे दरवळ अगदी आमच्या वर्गापर्यंत यायचे. तर उद्देश्य हा होता मनात की काय फक्त पदार्थ तर बनवायचेत(नंतर कळले खण्याइतकं सोप्पं काम नाही ते) आणि शिवाय बाईंनी बनवलेले छान पदार्थ ही खायला मिळतील हा एक आनंद आणि दुसरं म्हणजे दहावीला जरा जास्त मार्क्स मिळवायला हक्काचा स्कोअरिंग चा विषय. बरं पडेल जरा. तिन्ही बाई एकमेकींकडे बघून हसू लागल्या. त्यांना बहुतेक दरवर्षीचाच असा अनुभव असणार.
     मग आमच्या चित्रकलेच्या बाईंनी मलाही होम सायन्स च्या रांगेत बघून हसून हाक मारली, "मोघेss, तू तिकडे काय करतेस? चल बरं चित्रकलेच्या रांगेत. एवढी छान चित्रं काढतेस. "
मी :(मनातल्या मनात) "पण बाई, मला खायलाही खूप आवडतं आणि बाईंनी केलेल्या पदार्थांचे किती छान छान वासही येत असतात वर्गात. "
त्यावेळेस बाईंना 'का?' म्हणून विचारायची आमची प्राज्ञा नव्हती. मी निमूटपणे चित्रकलेच्या रांगेत जाऊन उभी राहिले. बाई पाचवीपासून माझी चित्रकला पाहत आल्या होत्या. आम्ही खरच इतके भाग्यवान की आम्हाला असे गुरुजन लाभले. आमच्याही पेक्षा त्यांना आमची शैक्षणिक गती कशात जास्त आहे हे न सांगताच समजायचं आणि त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. माझ्यासारख्याच मग बाकी काही विद्यार्थिनींचीही  विभागणी गायन आणि चित्रकलेत झाली आणि होम सायन्सच्या वर्गाचा भार थोडा हलका झाला.
     पहिल्यापासून मला चित्रकला तर आवडत होतीच त्यामुळे चित्रकलेच्या वर्गात मन रमून गेले. शाळेत सर्वात मोठा असलेला ऐसपैस वर्ग. बाईंनी भिंतीवर चिकटवलेली निरनिराळी रंगीबेरंगी चित्रं. प्रत्येकीला वेगवेगळा डेस्क. बाईंचं अप्रतिम शिकवणं.  चित्रकलेचे तास मजेत चालू झाले.
     सहा एक महिने लोटले असतील शाळा चालू होऊन, एक दिवस होम सायन्सच्या बाई वर्गात आल्या आणि  मला हाक मारली,
बाई:  "मोघेss"
मी : (उठून उभी राहत) काय बाई?
बाई: तुला पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तुझी निवड मी केली आहे. तीळाच्या वड्या बनवायच्या आहेत स्पर्धेत. चल लाग तयारीला आजपासून.
मी: पण बाई...
बाई: आता पण बीण काही नाही , छान तयारी कर आणि बनवून दाखव वडी स्पर्धेच्या दिवशी. आवडतं ना तुला होम सायन्स?
मी : बरं बाई. घेईन मी भाग ...(मनातल्या मनात) बाई, अहो पण तुमच्या हातचं मला खायला आवडतं. हे सगळं बनवायचं म्हणजे जरा..... आई गं... देवाss !

     पडत्या फळाची आज्ञा मानून मी आव्हान स्वीकारलं खरं पण चवीने आणि मजेने खायला येणारी वडी बनवायची कशी हा यक्षप्रश्न माझ्या मनात घर करून बसला. मनातल्या मनात थोडी भीतीही वाटायला लागली. शाळा सुटल्यावर त्याच विचारात भित्र्या सशासारखा चेहरा घेऊन मी घरी गेले. आईने मला बघता क्षणीच विचारले...
आई : का गं, काय झालं? काही झाले का आज शाळेत? कशाची भीती?
मी : आई, पाककलेच्या स्पर्धेत नाव दिलंय बाईंनी माझं. तिथे जाऊन तीळाची वडी बनवून दाखवाचीय.
आई : एवढंच ना! मी उद्याच तुला छान वडी शिकवते  बनवायला. एकदम सोप्या पद्धतीने.
मी : आई , पण जमेल का गं मला? येईल का नंबर माझा? मिळेल का गं बक्षिस?
आई : जमेल गं राणी, सगळं जमेल. कुठलीही गोष्ट आधी करून पहावी. आधीच जमेल की नाही असं म्हणून घाबरून जाऊ नये. प्रयत्नाने जमतेच. फक्त चिकाटी हवी. चित्रं कशी जसं हवं तसं येईपर्यंत परत परत काढतेस अगदी तसंच. कुठलाही पदार्थ करताना उगाच करायचाय म्हणून तो कसातरी करून उरकू नये तर अगदी मन लावून , एकाग्रतेने आणि प्रेमाने तो करावा. करणाऱ्याच्या भावना आणि हाताची चव त्या पदार्थांमध्ये उतरत असते. आपण बनवलेले पदार्थ खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तृप्तीची ढेकर हेच तर खरं बक्षिस. बाकी बक्षिसं मिळोत न मिळोत. स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना खायला करून घालण्यासारखं सुख , समाधान दुसऱ्या कशात नाही बघ. बरं , अजून कोणी कोणी भाग घेतला आहे स्पर्धेत?
मी : हं... आहेत अजून बऱ्याच जणी. त्यात नववी दहावीच्या होम सायन्सच्या मुली पण आहेत आणि काही आठवीच्या पण आहेत. त्यांना बाईंनी त्यांच्या होम सायन्सच्या तासाला आधीच वड्या करायला शिकवल्या आहेत.
आई : (मंद स्मित करत) बरं. वेडाबाई  प्रत्येकालाच सगळे विषय एकाचवेळी घ्यायला कसे जमणार? हो की नाई. पण खरंच शिकायची अगदी मनापासून इच्छा असेल तर ते ज्ञान आपण कधीही आणि कसंही मिळवू शकतो. त्यासाठी डिग्रीच असायला हवी असं काही नाही.  ती असेल तर उत्तमच. पण नसेल तरी जसं जमेल तसं आपलं ज्ञानार्जन चालूच ठेवावं. ज्ञान असणं महत्वाचं नुसती डिग्री असणं नाही.
बरं, आता दमून आली आहेस आता लवकर जेवून झोपून टाक आणि पहाटे लवकर उठून आवरून तयारीत रहा. सकाळी रामप्रहरीच तुला वड्या बनवायला शिकवते. म्हणजे नवीन दिवसाचा नवीन उत्साहही असतो आणि शांतताही. मग छान एकाग्र चित्ताने शिकता येते.
मी : हं . बरं ठीक आहे.

     खरंतर माझी आई पूर्वीची फक्त मॅट्रिक पास. फारशी शिक्षणाची संधीही न मिळालेली. लहान वयातच लग्न होऊन संसाराला लागलेली. पण सतत काहीतरी नवनवीन गोष्टी शिकत राहणारी. अजूनही ह्या वयात ती सत्तरी ओलांडली तरी उत्साहाने सगळ्यांना आवडीचे पदार्थ करून खायला घालण्यात मग्न असते. तीने सांगितलेला हा उपदेश मला माझ्यासाठी "आईने सांगितलेली गीता " च वाटली. सहजतेने तिनं मला सुखी संसाराची सूत्रच सांगितली.
     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून आम्ही तयारीला लागलो. एकीकडे रेडिओ वर तिने बारीक आवाजात अभंग लावले होते. उगवणाऱ्या सूर्याची सोनेरी कोवळी किरणं स्वयंपाकघराच्या खिडकीतून समोरून येऊन कट्ट्यावर पडत होती. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या जाईच्या शुभ्र पांढऱ्या फुलांनी बहरलेल्या वेलीवर चिवचिवणाऱ्या चिमण्या दिसत होत्या. त्या चिमण्यांसाठी मूठभर तांदूळ खिडकीतुन बाहेरच्या वाटीत आईने ठेवले आणि अशा प्रसन्न वातावरणात मला सांगायला सुरुवात केली....

*सर्वात आधी एक वाटी असोले तीळ चाळून, पाखडून , निवडून घ्यावेत. तीळ असोले असतील तर वडी खमंग होते. फार पॉलिश असलेले तीळ शक्यतो नसावेत. तीळात काहीवेळेस बारीक खर असते ते नीट निवडले नाही गेले तर वडी खाताना कचकच लागते.
*ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी छान पिवळा धमक बारीक चिरलेला गूळ घ्यावा. गुळातही एकदा नजर फिरवून बारीक खडे नाहीत ना ते तपासून पहावे.
हे झाले साहित्य.
* आता पोळपाट आणि लाटणे स्वच्छ पुसून एकदम कोरडे करून घ्यावे. दोन्हीला तुपाचा हात लावून घ्यावा.
*एका वाटीत थोडे पाणी घेऊन ती जवळ ठेवून द्यावी. पाकाची परीक्षा घेण्यासाठी.
*एक जाड बुडाची कढई आणि उलथने पुसून कोरडे करून घ्यावे.
*कढई गॅस वर ठेवून त्यात तीळ घालून मंद गॅस लावून तीळ भाजून घ्यावेत. तीळाचा चटचट असा आवाज यायला लागला की ते भाजले गेलेत असे समजावे. ते तीळ दुसऱ्या एका ताटात काढून ठेवावेत.
*आता त्याच गरम कढईत मोजून घेतलेला अर्धी वाटी गूळ घालून गॅस मंदच ठेवून सतत उलथन्याने हलवत राहावे. गुळाला बुडबुडे यायला लागले की जवळ ठेवलेल्या वाटीतल्या पाण्यात उलथन्यानेच गुळाचा एक थेंब टाकून पहावा. लगेचच गुळाची गोळी बनली तर पाक झाला आहे असे समजून भाजलेले तीळ त्यात घालून पटपट मिश्रण एकजीव करून घ्यावे. ही क्रिया एकदम भरभर जमली पाहिजे. तो नीट एकजीव झालेला गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर ओतून लाटण्याने अगदी भरभर पातळ लाटून घ्यावा. लगेचच सुरीने रेषा पाडून वड्या आखून घ्याव्यात.
*पूर्ण गार झाल्या की वड्या पाडून कोरड्या डब्यात भरून ठेवाव्यात.
* तयार तीळगुळाची  झटपट वडी/ चिक्की.
प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा आणि आधी दुसऱ्यांना चव घ्यायला द्यावी.
पदार्थ बनवणाऱ्यानीच उगाच चव घेत, चाखत स्वयंपाक करू नये. त्या पदार्थाची चव उतरते. नुसत्या वासावरूनच पदार्थातले जिन्नस ओळखता यायला हवेत. "
     नंतर आईने माझ्याकडून दोन तीनदा वड्या बनवण्याचा सराव करून घेतला. स्पर्धेच्या दिवशी शाळेत जाताना परत थोड्या टिप्स दिल्या....
*बाकीच्या मुली वेगवेगळ्या पद्धतीने वड्या बनवतील. घटक पदार्थही वेगवेगळे असतील. मन विचलित होऊ देऊ नकोस.
* ह्या वड्या जशा शिकवल्या आहेत अगदी तशाच मन लावून  बनवण्याचा प्रयत्न कर.
*दिलेल्या वेळेचं भान ठेवून कृती कर.
*स्वच्छता फार महत्वाची. वड्या करण्याआधी आणि नंतरही कट्टा आणि भांडी स्वच्छ करून ठेव.
*संपूर्ण आकारात कापल्या गेलेल्याच वड्या ताटलीमधे नीटनेटक्या मांडून ठेव. बाकी उरलेल्या तुटलेल्या दुसऱ्या डब्यात ठेव.

     अखेर स्पर्धा पार पडली. माझ्या ह्या प्रथमगुरुने शिकवलेल्या वड्यांचा स्पर्धेत दुसरा नंबर आला. बाईंना वड्या खूप आवडल्या. पाककलेच्या परीक्षेची पहिली पायरी मी सर केली. पाठीवर बाईंची कौतुकाने शाबासकीची थाप पडली.   मला आनंदीआनंद झाला. माझ्या प्रथमगुरु , आईला आणि बाकी सर्व गुरूंना मी मनोमन साष्टांग नमन केले. 🙏

तीळगुळ घ्या गोड बोला !!😊

©सौ. श्वेता अनुप साठये


1 टिप्पणी: