सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

बेल


🌿 बेल 🌿

       दर सोमवारी सकाळी दत्तूमामा बेल घेऊन यायचे. त्यांना यायला जरा जरी उशीर झाला की " आले का? आले का दत्तूमामा ? " शेजाऱ्यांच्या अशा हाका कानावर पडायच्या.  घरांच्या खिडक्यातून दोन चौक पुढेपर्यंतचा रस्ता दिसायचा तेव्हा.  पुढच्या चौकातून त्यांची सायकल कॉलनीकडे वळताना दिसली की सगळ्यांचे जीव एकदाचे भांड्यात पडायचे.  सदरा ,धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी अशा नेहमीच्या साध्या पांढऱ्या शुभ्र पोशाखात दुरुन सायकलवरून येणारी त्यांची आकृती स्पष्ट ओळखू यायची. 
     रस्त्याच्या चढावरून स्वारी धापा टाकत कॉलनीत येऊन दाखल व्हायची. सायकलला लावलेली एक नायलॉनची पट्यापट्या ची हिरवी पिशवी असायची. त्यात बेल ,दूर्वा, बेलफळं, पांढरी फुलं, अशी महादेवाच्या पूजेला लागणारी फुलं, पत्री ते विकायला घेऊन येत असत. नदीकाठच्या बेलांच्या झाडांवर चढून ते बेल काढत असावेत. त्यांच्या हातांवर पडलेले काट्यांचे पांढरट ओरखडेच सांगत. गल्लीतली छोटी पोरं गोंगाट करत खेळता खेळता त्यांची सायकल बघून त्यांच्या मागं मागं करत. सायकल रस्त्याच्या कडेला लावून , डोळे वटारून  मुलांना घाबरवून दम भरत ,"पोरांनु, हात लावायचा न्हाई सायकलला. नायतर आल्याव चांगलं रट्टे घालीन एकेकाच्या पाटीत, सांगून ठिवतुया."  
     "आलोच, वाईच बेल दिऊन सगळ्यास्नी.  च्या टाकता का वैनी? "  दारात रांगोळी काढत असलेल्या आमच्या आईला अशी हक्कानं चहाची ऑर्डर देत.  सगळ्यांना बेल देऊन आमच्यात आईच्या हातचा चहा पिऊन बेल फुलं देऊन निघत. त्यांनी दिलेला बेल महादेवाला वाहूनच सगळ्यांना पूजा केल्याचं समाधान होई. 
      जाता जाता रागवून पिटाळून लावलेल्या मुलांना परत हाका मारून गोळा करत.  कोणीकोणी त्यांच्या नातवंडांसाठी दिलेले खडीसाखर, एखादा लाडू, बिस्किटं त्या मुलांमध्ये प्रेमानं वाटत. उरलेलं घरी नेण्यासाठी पुडी पिशवीत टाकत. मगाशी घाबरवून मुलांना पिटाळून लावणारे हेच का ते दत्तूमामा असा प्रश्न पडे. मुलांना सायकल वरून एखादी चक्करही मग मिळे. मुलंही खुश... पुन्हा पुढचा सोमवार येईपर्यंत. 
     दोन कारणांसाठी त्यांचं महत्व पाटण कॉलनीत खासच होतं. एक म्हणजे बेल आणि दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचे सरपटणारे प्राणी  हाताने अगदी लीलया पकडण्याचे कसब असलेली व्यक्ती म्हणून. कोयनेकाठी वसलेली  कॉलनी. त्यात त्यावेळी प्रत्येकाच्या घराजवळ भरपूर झाडी होती. त्यामुळं बऱ्याच प्रकारचे सापांचे आणि अस्सल नागांचे दर्शन हे नेहमीचंच असायचं. बऱ्याचदा छोटे छोटे साप वाटेत दिसले तरी स्वतःच्या जीवाच्या भीतीने झाडीत सळसळत नाहीसे व्हायचे. क्वचित कधीतरी न्हाणीघरात, घरात छापरांच्या कडीपाटातही वेटोळी दिसायची. असे दर्शन झाले की काही लोकांची  मात्र जाम पाचावर धारण बसायची. पुढचे काही दिवस मग रामाचं नाव घेऊनच त्यांचा वावर व्हायचा. न्हाणीघरात जाताना आधी कुठे काही नाही ना, एक नजर टाकून तपास करूनच  जायचे. 😀

    अगदीच एखाद्याच्या घरात किंवा घरां जवळच्या एखाद्या बीळात त्यांचं वास्तव्य असलेले लक्षात आले तर दत्तूमामांना निरोप जायचा. ते आले की बिनधास्त झाडांच्या बुंध्यात असलेल्या बीळात हात घालून त्यांच्या शेपटीला धरून बाहेर ओढत . आजूबाजूला माणसांचा एकच गलका चालू होइ, "मामाss , मारून टाका, मारून टाका त्याला,  ठेचा त्याला." 
" हम्म्म, मारून टाका म्हनं, काय करतुया तवा?? गुमान बसलाया, सोताच्या जीवाच्या भीतीनं. पोटासाटनं आलया जवळ हितं. जगुन्द्याकी तेला बी. सोडून येतो नदीकडला." असं म्हणून ते 
त्याचं एका हाताने मुंडकं आणि दुसऱ्या हाताने शेपूट पकडून नदीकडं जाऊन सोडून येत.  सोमवारी मात्र ते  कितीही कुणीही सांगितले तरी बिलकुल त्यांना हात ही लावत नसत.
     आमच्यात एक छोटंसं पांढरं शुभ्र मांजराचं पिल्लू होतं. दिवसभर त्याचं घरात उड्या मारणं चालू असे. कुठं भिंतीवरच्या पालींवर डूख धर, तर कधी एखाद्या उंदरामागे उगाचच पळत पाठलाग कर , असे चाळे त्याचे सतत चालू असत. अगदीच कंटाळले की बाहेरच्या सोफ्यावर आळोखे पिळोखे देत पडून राही. 
     एक दिवस अचानकच ते घरात कुठेच दिसेना. सगळीकडे शोधलं तरी काही पत्ता नाही, की कुठूनही हलकासा आवाजही नाही. हाका मारत बराच वेळ शोधल्यावर हे पिटुकलं शेजारच्या सोनचाफ्याच्या आणि त्याला लागून असलेल्या रातराणीच्या झाडाच्या बुंध्यात एकदम स्तब्ध दबा धरून , अंग आणि  शेपटी फुगवून उभं असलेलं  आम्हाला दिसलं. दुरून फारसं झाडीतलं दिसेना म्हणून थोडंसं जवळ जाऊन पाहायला म्हणून गेलो न एकदम आमच्या छातीत धस्सच झालं. अगदी झाडाच्याच खोडाच्या रंगाचा , जवळपास आठ दहा फूट लांबीचा चांगला मोठा नाग  ह्या पिल्ला पुढे साधारण एकदीड फूट तोंडाचा भाग वर करून  मोठा फणा काढून फुत्कारत उभा होता.  ते बघून एकदम सगळे घाबरून  मागे झालो. पण पिल्लाला वाचवायचे प्रयत्न चालू झाले. ते पील्लू ही त्याच्या इवल्याश्या जीवाच्या मानाने तगडीच टक्कर द्यायला उभं होतं. मधूनच गुरगुरणं आणि पंजा मारणं चालू होतं त्याचं. अशात आजूबाजूच्या माणसांची  गर्दी जमायला लागली. तसं, कसं काय कोण जाणे पण ते मोठं जनावर कुठेतरी त्याच झाडीत नाहीसं झालं. पटकन कुठं गायब झालं काही कळलंच नाही.  पिल्लू ही पळत परत घरात परतलं. पण सगळ्यांना एकदम दहशत बसली.  भीतीने  मुलांचे खेळ थांबले, त्या जागेच्या जवळपास ही कुणी फिरकेना.  
      मांजराचं पिल्लु एकदम मलूल दिसायला लागलं. अधून मधून नुसतं कान टवकारायला लागलं. उड्या मारेना. काही खाईना. दुसऱ्या दिवशी सकाळी परत कुठे दिसेना म्हणून  मनी मनी म्हणून आम्ही हाका मारत बाहेर गेलो तर बाहेरच्या गटारीत ते निपचित मरून पडलेलं दिसलं. अंगावर दोन दात उठलेले दिसले. बहुधा रात्रीत परत त्या नागाशी जबरदस्त फाईट झालेली असावी. सगळे हळहळले. मेलेलं पिल्लू पाहायला गर्दी जमली. त्यातच कुणीतरी म्हंटलं , " जाss रे , बोलवून आणा त्या दत्तूमामा ना."
     थोड्याच वेळात दत्तूमामा हजर झाले. त्यांच्याबरोबर काठ्या बरचे घेऊन आजूबाजूची बाकीची माणसंही सामील झाली.
 "मामा, लै मोठ्ठं हाय जनावर. पोरं बाळं खेळत्यात हितं , लोकांचा बी बराच वावर हाय. एकांद्याला चावलं बिवलं नाsss ... तर पानी मागून द्याचं न्हाई.  ह्या टायमाला ठेचूनच काढू तेला.  आँ?? काय म्हणतासा?"  गर्दीतून कोणीतरी म्हटलं.
" आरं , न्हाय रं... आलं असंल पोटासाठी. धरून, दिऊ सोडून लांब." .... दत्तूमामा.
     माणसांची बरीच गर्दी जमली.  एकमेकात कुजबुज चालू झाली. 
     दत्तूमामांनी लांबूनच आधी त्या जागेची टेहळणी केली. रातराणीच्या बुंध्यात त्यांना एक मोठं बीळ दिसलं. रातराणीच्या थोड्या फांद्या छाटल्या. थोडा लांबूनच बीळातल्या हालचालींचा  अंदाज घेतला .  "हाय, हाय...", कोणीतरी हळूच कुजबुजलं. कोणीतरी पेट्रोलचा बोळा आणला. मामांनी तो त्या बीळापाशी धरला आणि आत हात घालून क्षणार्धात त्याच्या शेपटीला पकडून त्याला बाहेर काढला. त्यानं लगेच मोठा फणा उगारला. चिडून फुत्कारायला सुरवात केली. कोणीतरी गर्दीतून ओरडलं, " ते बघ,ते बघ, फण्यावर दहा चा आकडा दिसतोय. अस्सल नाग च आहे." बाकीच्या माणसांनी लगबगीनं बरच्यांनी त्याचं तोंड पकडायचा प्रयत्न केला. काहींनी काठीने मारायला सुरुवात केली. तसा तो अजूनच घाबरून, चिडून फुत्कारायला लागला. तोंड जमिनीवर अपटायला लागला. ताब्यातून सुटण्याचा वृथा प्रयत्न करायला लागला. बऱ्याच प्रयत्नांनी दोघातिघांनी शेवटी त्याचं तोंड बरच्याने  जमिनीवर दाबून धरलं. तसं दुसऱ्या एकाने घाईघाईने त्याच्या तोंडावर काठीने मारायला ,  ठेचायला सुरुवात केली.
  "आरं, आरं....मारू नगं रंss... मारू नगं " ....मामा हळहळले.
     पण त्यावेळी ते ऐकण्याच्या कोणीही मनस्थितीत नव्हतं . मनातली भीती, पुढे दिसणारे धोके याचा त्या गर्दीला नायनाट करायचा होता. नागाचं तोंड पार ठेचलं गेलं होतं. सगळ्यांच्या अंगावर अगदी शहारे आले. विषारी असला तरी तोही एक जीवच होता. त्यालाही जगण्याचा अधिकार होता. नदीकाठच्या जंगलाच्या सीमारेषा ओलांडून माणसांच्या वस्तीत वास्तव्याला आला होता हीच त्याची त्याला न उमजलेली चूक(??? ) होती बहुधा.  मनातून सगळेच हळहळले.  एक विषणण शांतता पसरली. त्याला तसाच झाडीतून बाहेर ओढत रस्त्याच्या बाजूला आणला गेला. तोंड पूर्ण ठेचलं गेलं असलं तरी शेपटीत जीव शिल्लक होता अजून. जवळजवळ अर्धा तास तरी पुढे ती वळवळत , तडफडत अखेर शांत झाली. माणसांची गर्दीही ते सगळं सुन्न होऊन चुकचुकत बघत उभी राहिली.

     दत्तूमामांनी आजूबाजूच्या झाडाच्या वाळलेल्या काटक्या गोळा केल्या . 
"असाच न्हाय टाकायचा, अग्नी दिऊ तेला",....दत्तूमामा  म्हणाले. 
गोळा केलेल्या काटक्यांवर दोघांनी त्याचा देह ठेवला. बाजूच्या झाडांची फुलं काढून वाहिली. कोणीतरी हळदकुंकू घेऊन आलं ते वाहिलं. काहीतरी आठवत दत्तूमामानी त्यांच्या खिशात हात घातला. बेलाची दोन पानं आणि खडीसाखरेची पुडी  हाताला लागली ती ही त्यावर वाहिली. पुन्हा थोड्या काटक्या त्याच्यावर पसरून त्याला नमस्कार करून त्याला अग्नीला सुपूर्द केले. 
"शंभोsss , मुक्ती देss रं, तेला. ....माप कर आमाला." ....दत्तूमामा. 
मारणाऱ्यांचे आणि गर्दीचे डोळेही आपसूकच पाणावले. सरतेशेवटी मनातलं भय त्याच्यासोबत सोडून सगळे आपापल्या वाटेला परतले.  
.
.
.
    मागच्या वर्षी आमच्या इथे जवळच्या बिल्डिंग मध्ये अजगराचे एक पिल्लू  सापडले होते. आधी हा एरिया ही त्यांच्या जंगलाचाच भाग होता , आता ते आपलं सिमेंट चं जंगल झालंय एवढाच काय तो फरक. तो फरक त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे आपलंच जंगल समजून, येतात कधीतरी वाट चुकून. 
     कोणीतरी लगेच सर्पमित्रांना कॉल केला...पंधरा मिनिटात ते सगळ्या तयारी निशी हजर झाले. चार पाच जणांची टीम होती. त्याला इजा होऊ न देता पकडलं आणि कुठेतरी लांब जंगलात सोडून आले म्हणे. आजकाल हे एक बरं झालंय नै , एका कॉल वर सर्पमित्र लगेच  हजर होतात. त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचाच ते आटोकाट प्रयत्न करतात.  विषारी असले तरीही.

©सौ.श्वेता अनुप साठये
30/07/2020
(लेख नावासकट share करण्यास हरकत नाही.)
(फोटो गुगल वरून साभार.)  
    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा