#१६
🌺।।गणपती।।🌺
शाळेसमोरच मोठा कुंभारवाडा होता. नागपंचमी पासून कुंभारवाड्यात गणपतीच्या मूर्तींची तयारी चालू व्हायची. शाळा दुपारची. तासभर आधी तिथे जवळच राहणाऱ्या मैत्रिणीकडे दप्तरं ठेऊन आम्ही मैत्रिणी मूर्ती पाहण्यासाठी जात असू. हाताने मूर्ती बनवण्यावर जास्त भर होता त्यावेळी. साच्याने तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींचं प्रमाण अगदी हातांच्या बोटांवर मोजण्या इतपतच होतं. कुंभारांच्या हातून ती मूर्तिकला साकारत असतानाचं निरीक्षण करत तासभर कसा निघून जाई कळतच नसे. जरा नाखुषीनेच मग शाळेची वेळ झाली की आम्ही शाळेकडे परतत असू. गणेशोत्सव सुरू होईपर्यंत आमच्या अशाच नियमित खेपा होत असत कुंभारवाड्यात.
घराजवळही एक छोटा कुंभारवाडा होता. तिथे सणा नुसार बेंदूराला बैल, नागपंचमीला नाग, हरतालिका, दिवाळीत सैनिक,मावळे, शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्ती असं काय काय बनवलं जाई. त्याही छोट्या, रेखीव मूर्ती बनवताना बघायला भारी मजा येई.
मूर्तीकार आधी गणपतीच्या फोटोची पूजा करत. खाली आसनावर बसून समोर एक चक्राकार फिरणाऱ्या पाटावर मऊ मातीचा गोल गोळा ठेऊन त्या मातीची ही रीतसर दिवा, उदबत्ती ओवाळून पूजा करत. मगच मूर्ती बनवायला सुरवात करत. एकावेळी घरातले दोनतीन सदस्य वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यासाठी सुरवात करत. त्या मातीचे निरनिराळ्या आकारांचे गोळे बनवून त्यापासून हळूहळू गणेशाची निरनिराळी रूपं आकार घेत. आसनापासून सुरवात करून प्रथम पोट मग पाय, हात, सोंड, मोठे कान,चेहरा मधे मधे तो फिरता चक्राकार पाट फिरवून मूर्तीच्या पाठीकडच्या भागाला आकार दिला जाई. काही दोन हातांच्या तर काही चार...मुकुट असलेल्या, तर काही फेटे वाल्या....कमळा मधे बसलेला बाल गणेश, कृष्ण वेशात, तर कधी वारकरी वेशात. कधी शंकर पार्वती सोबत, तर कधी मोठ्या मूषकावर आरूढ. काही छोटे तर काही सार्वजनिक मंडळांसाठी पाच सात फूट उंच. रोज थोडा थोडा आकार घेणाऱ्या ह्या मूर्ती. मूर्तिकारांच्या मनांमधून साकारणारा निरनिराळ्या रूपात दिसणारा पण एकच असणारा तो गणराज. मलाही मनातून तेेंव्हा फार वाटे ,एकदातरी तो मऊ मातीचा गोळा हातात घेऊन मूर्ती बनवायला शिकावी.
मूर्तींना रंग कसा आणि कोणता देतात ते पाहायची ही भारी उत्सुकता असे. मूर्ती सुकल्या की आधी व्हाईट वॉश देत. मग spray ने painting होई. चेहरा, आभूषणं, वस्त्राच्या वरची जरीची नक्षी, बॉर्डर असं बारीक रंगकाम सगळं हाताने ब्रश चा वापर करून केले जाई. मातीच्या गोळ्या पासून त्या संपूर्ण साकार रुपातल्या अत्यंत रेखीव अशा मूर्ती बघून आम्ही भारावून जात असू.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बाबा दुकानातून लवकर येत असत. शुचिर्भूत होऊन बाबा नवीन कपडे, डोक्यावर टोपी, कपाळाला गंध लावून तयार होत. आम्हीही नवीन कपडे घालून त्यांच्याबरोबर जायला सज्ज होत असू. आई मोठ्या ताम्हणात गणपतीसाठी नवीन केशरी किंवा लाल वस्त्र ,हळदीकुंकू, पान सुपारी, अक्षदा, उदबत्ती, एक श्रीफळ, घंटी अशी सगळी तयारी करून देत असे. आम्ही सगळे, सोबत शेजारचे सगळे सवंगडी अशी वरात गणपती आणायला जात असू. बाबा दरवर्षी ठरल्या प्रमाणे एकाच कुंभराकडून मूर्ती बनवून घेत असत. मूर्तीला हळदीकुंकू वाहून,उदबत्ती ओवाळून वस्त्र घालून ती मूर्ती ताम्हणात ठेवत. कुंभार नेहमी त्याबरोबर एक गणोबाची छोटी मूर्तीही देत. बाबा सोबत नेलेली पान सुपारी, श्रीफळ आणि दक्षिणा त्या मूर्तिकारांना देत. मूर्तीचे मोल करण्याची प्रथा नव्हती...कुंभार कधीही ती सांगत नसत. मूर्ती घेणारे आपल्या मनानेच योग्य वाटेल ते मानधन म्हणून मूर्तिकारांना देत असत.
" गणपती बाप्पा मोरया।।, एक दोन तीन चार...गणपतीचा जयजयकार...।।" असं मोठमोठ्याने म्हणत...वाटेत भेटणाऱ्यांना "मोरया।।मोरया।।" अशी साद देत...वाजातगाजत जयघोषात श्रीगणेशाचे घरी आगमन होई. आई दारात निरांजन, आणि दूध पाणी घेऊन स्वागताला सज्ज च असे. पायावर गरम पाणी ,दूध घालून , तुकडा ओवाळून दोन्ही बाजूला टाकून, गणपतीचं औक्षण करून घरामध्ये स्वागत करी. दुसऱ्या दिवशी गुरुजी येऊन त्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत. गणपती बसला की घर एकदम प्रसन्न वाटे.
गणेशोत्सव सगळीकडे उत्साह, प्रसन्नता घेऊन येई...नवीन काहीतरी शिकण्याची , करून पाहण्याची मनात उर्मी येई..... संगीत, कला , पाककला, नाट्य कला, वक्तृत्व, गायन यांना वाव मिळे.... सकाळ संध्याकाळी म्हंटल्या जाणाऱ्या अरत्यांनी सभोवताल भक्तीनं भरून जाई...घरातली आरती झाली की एकमेकांकडे आरत्या म्हणायला सगळ्यांच्या घरी फिरत असू. सगळ्यांना वाटायला प्रसादाला मोदक, पंचखाद्य, अशा वेगवेगळ्या खिरापती केल्या जात.
एक दिवस आधी येणाऱ्या हरितालिकेच्या पूजेला लागणारी झाडांची पत्री आजूबाजूला फिरून गोळा केली जाई ...त्यादिवशी आईचा उपवास असे त्यामुळे आम्हाला आवडतात म्हणून उपवासाचे पदार्थ असत. गणेश चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक तर दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमीला, नैवेद्याला ऋषीच्या भाजीचा थाट असे. गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौरी, आम्ही मुली नटून थटून गप्पा मारत नदीवर जाऊन पूजा करून घेऊन येत असू. येताना मात्र मौन व्रत असे. आई दुधपाणी पायावर घालून तिचं औक्षण करून घरात स्वागत करी आमचं मौनव्रत इथे सोडून "आली का गौराई? ...कशाच्या पावलाने... सोन्या रुप्याच्या पावलांनी..., धन धान्यांच्या पावलांनी,...हिऱ्या माणक्यांच्या पावलांनी.....असं म्हणत घरात सगळीकडे फिरवून मग गणपती जवळ त्यांची प्रतिष्ठापना केली जाई.
सात खड्यांच्या गंगा गौरी, कलशात घालून आणलेले तेरड्याचे फुलोरे, मुखवट्यांच्या, साडी नेसवलेल्या उभ्या, तर काही बसलेल्या, तांब्यांवर लिहिलेल्या अशी गौरईंचीही निरनिराळी रूपं प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळत. त्यादिवशी गौरी आल्या आल्या दही पोहे आणि काकडी प्रसाद म्हणून दिली जात असे. नैवेद्याला शेपूची भाजी आणि भाकरी असा साधा बेत. आरास मांडून सगळे फराळाच्या पदार्थांचाही नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत पुरणा वरणाचा नैवेद्य असे. घरातल्या गृहिणींचा पाककलेचा कस लागे आणि घरातल्या सगळ्यांची खाण्याची चंगळ. आपल्या प्रत्येक भारतीय सणांमध्ये केले जाणारे पदार्थ हे त्या त्या ऋतूत सेवन करायला उपयोगी , भरपूर जीवनसत्व युक्त असतात. पूर्वजांनी अत्यंत विचार करून बनवलेली समृद्ध अशी ही आपली खाद्य संस्कृती.
सगळेजण एकमेकांच्या घरी गौरी गणपती आणि आरास बघायला जात असू. हळदीकुंकू सोहळे आणि मोठमोठ्या काढलेल्या रेखीव रांगोळ्यांचेही कौतुक असे.
सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती, निरनिराळे देखावे पाहण्यासाठी आम्ही सगळे एक दिवस ठरवून मिळूनच जात असू. अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात आमचा गणेशोत्सव साजरा होई.
.
.
.
इकडेही दरवर्षी आम्ही घरी आणि सोसायटी मध्ये सगळे मिळून गणेशोत्सव साजरा करतो. सकाळ संध्याकाळच्या आरत्या मित्रपरिवार मिळून म्हणतो... उत्साहाने सर्वांना वाटायला खिरापती बनवल्या जातात. मिरवणुका, लेझीम, झिम्मा, फुगड्या , मिळून काढलेल्या रांगोळ्या, बालगोपाळांचे नाटुकल्यांचे सादरीकरण अशी नेहमीच मौजमजा असते.
पण ह्यावर्षी कोरोना मुळे बरीच बंधनं आहेत आपल्याला. त्यामुळे घराजवळ मूर्ती ही मिळतील की नाही अशा चिंतेत होते. ऑनलाईन मूर्ती मागवली तर ती नीट येईल की नाही अशी साशंकता होती मनामधे. खूप वर्षांपासून मातीची मूर्ती बनवायची सूप्त इच्छा मनात होती. पण मनामधे भीतीही होती की जमेल की नाही?...मूर्ती बनवताना काही चुकेल तर...
म्हणून नागपंचमीला आधी घरातलीच झाडातली थोडी माती काढून नाग बनवून पाहिले...कसेबसे जमले...अगदी ओबडधोबड...ते बनवत असताना लक्षात आलं माती चाळून घेतली तर मधे मधे छोटे खडे येणार नाहीत आणि मूर्ती नीट बनू शकेल.
मग त्याप्रमाणे अजून एक प्रयत्न केला हरतालिका बनवण्याचा. माती चाळून घेतल्यामुळे आकार नीट यायला मदत झाली पण तरी हव्या तशा रेखीव जमेनात....
गणपती बनवायचा असेल तर तो नीट च बनला पाहिजे,...त्यासाठी मी अजून कुठे माहिती दिसतेय का पाहू लागले.
एकदिवस आमच्या एका फॅमिली फ्रेंड ने, त्याने बनवलेल्या मूर्ती चा फोटो whats up वर share केला होता. तो बघून माझा एकदम आत्मविश्वास वाढला. त्याने मातीची , आणि मूर्ती कशी बनवायची याची थोडी माहिती दिली. माझ्या अजून काही usa च्या मैत्रिणी बरेच वर्षांपासून घरीच मूर्ती बनवतात त्यांच्याकडूनही माहिती विचारली. आणि दहा मातीच्या गोळ्यांपासून तयार होणारा गणपतीचा विडिओ viral झाला होता तो पाहून आधी एक छोटी मूर्ती करून पहिली. ती एकदम मस्त जमली. मग ऑनलाईन माती मागवली. तरीपण प्रत्यक्ष मोठी मूर्ती बनवताना थोडं दडपण होतंच.
संकष्टी दिवशी आधी देवाची पूजा करून मग मातीचीही पूजा केली. गणपतीला नमस्कार केला आणि मनात म्हंटलं," बाप्पा, आता तुला हवी तशी तूच माझ्याकडून तुझी मूर्ती बनवून घे." एकीकडे शंकर महादेवनचं, " गणनायकाय, गणदैवताय, ...."गाणं लावलं...त्यादिवासापूरता tv चा आवाज घरामध्ये ban केला😀...आणि त्या मातीच्या मऊ गोळ्यापासून साकारली गेली गोड रुपातली गणेशाची मूर्ती. सोबत एक गणोबा आणि छोटा मूषक.
जगावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होवो आणि आणि निरामय पहाटेचा उदय होवो , हीच त्या बाप्पाला प्रार्थना.
एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्।
विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥
।।गणपतीबाप्पा मोरया।।🌺🙏
© सौ. श्वेता अनुप साठ्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा