गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

गुरुवायुर

गुरुवायुर
श्रीकृष्ण मंदिर
पन्नथुर कोटा

    
     गुरुवायुर म्हणजेच भूवैकुंठ. दक्षिण द्वारका या नावानेही प्रसिद्ध असलेलं हे तीर्थ क्षेत्र. केरळ मध्ये हे ठिकाण कोचीन पासून जवळ आहे. गोपाळ कृष्णा चे हे मंदिर आहे. असं म्हणतात , वसुदेव आणि देवकीला कृष्णजन्मा आधी ह्या बालरुपात भगवान विष्णूंनी दृष्टांत दिला होता. त्याच रुपातली ही मूर्ती आधी द्वारकेला गुजराथ मध्ये होती. कृष्णाच्या निर्वाणानंतर द्वारका समुद्रात बुडाली तेव्हा देव गुरू बृहस्पति नीं त्यांच्या शिष्य वायुदेवना ही मूर्ती सुरक्षित दक्षिणेला न्यायला सांगितली. ती जिथे केरळ मध्ये मिळाली तिथेच तिची पूनर्स्थापना केली गेली म्हणून त्या स्थानाला गुरुवायुर असे नाव पडले.  गुरुवायुर अप्पन म्हणजेच जगत् पिता श्रीकृष्ण, ऐयप्पा, भगवती , नाग देवता अशी इतरही मंदिरे ही तिथे आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील शेषशायी विष्णूची मूर्ती , तसेच कृष्ण लीलांची शिल्पं फार देखणी आहेत. मन खिळवून ठेवणारी शिल्पकला आहे.
     लहान बाळांचा अन्न प्राशन विधी तिथे केला जातो. इटुकली पिटुकली धोतर नेसलेली,आणि कृष्णा सारखा make up केलेली भरपूर बाळं तिथे पाहिली. प्रत्येकात लोभस असं कृष्णाचंच रूप दिसत होते. 
     मंदिराच्या बाजूला मोठा कुंड , प्रसाद गृह ही आहेत. तुला करून अन्नदान ही करतात लोक. भरपूर गर्दी होती. दर्शनासाठी दोनतीन तास तरी रांगेत उभे राहावे लागते. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, कणभर ही कचरा आम्हाला कुठेही दिसला नाही. खूप छान व्यवस्था होती. सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रसादाचा साध्या सर्व भाविकांसाठी असतो. दुपारी १२ ते ४ मंदिर बंद असते. अधिक महिन्यात अचानक काहीही न ठरवता घडलेली ही अविस्मरणीय यात्रा .

पुन्नाथुर कोट्टा.....
     मंदिरापासून दोनतीन km वर पुन्नथुर कोट्ट , मोठा हत्ती खाना आहे हा. साठ सत्तर हत्ती तरी होते.  अनाथ झालेले हत्ती ही असतात. त्यांना मंदिरांच्या उत्सवांसाठी शिकवले जाते. उत्सवांमध्ये मोठी मिरवणूक काढतात. चांगली वागणूक असलेल्या हत्तींना मंदिरांच्या मिरवणुकीत मानाचे स्थान देतात. जसं गाय दान करण्याचे महत्व आहे, तसेच इथे हत्ती दान करतात मंदिरासाठी, आणि हत्तींसाठी अन्नदान ही करण्याची प्रथा आहे. इंटरेस्टिंग आहे ना !! फार आवडले मला इतके हत्ती जवळून पाहताना. फारतर एकदोन हत्ती आपण zoo  मध्ये वगैरे पाहिलेले असतात. त्यांना ट्रेनिंग देत होते तेही पाहिले. माहूत देत असलेल्या सूचना बरोब्बर समजत होत्या त्यांना. निवांत बसून पाण्याची पाईप अंगावर घेऊन पाण्यात खेळणं चालू होतं...बरेच माणसाळलेले वाटले. तेही कुतूहलाने येणाऱ्या लोकांकडे बघत होते. बऱ्याचदा  फोटो काढताना कॅमेऱ्या कडे पाहायचे. Pose द्यायचे 😀...गंमत वाटली. माणसांची सवय व्हावी उत्सवासाठी म्हणून माहूत त्यांना tourists सोबत च फिरवत होते. 
     आम्ही लहान असताना, ३५/४० वर्षांपूर्वी circus यायची गावात. ते माहूत हत्तींना घेऊन कोयनेत आंघोळ घालयला यायचे. मग परत जाताना आम्हा सगळ्या लहान मुलांना त्याच्यावर बसवून colony तून एक round मारून परत घरी आणून सोडायचे. मग आम्ही फळं खायला द्यायचो त्याला. ते माहूत काका, ती हत्तीण आठवली. कुठे असतील??...असतील की नाही आता देव जाणे. कुपी अत्तरा सारख्या ह्या आठवणी. 💕
सौ. श्वेता अनुप साठये
फोटो गूगल साभार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा