वेणुगोपाळ स्वामी मंदिर
म्हैसूरच्या वृंदावन गार्डन जवळ होसा कन्नमबडी गावामध्ये होयसळा शैलीत बाराव्या शतकात हे वेणु गोपाळ मंदिर बांधलेलं होतं.
कृष्ण राज सागर धरण जेव्हा बांधलं गेलं, तेव्हा मूळ मंदिर आणि आख्खं गाव पूर्ण पाण्याखाली बुडले गेले.
जवळ जवळ सत्तर वर्षं ते तसेच पाण्याखाली राहिले. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला धरणातले पाणी आटले तेव्हा ते पुन्हा दिसू लागले. साधारण २००० साली पाणी आटून ते पूर्ण दिसू लागले. तेव्हा धरण क्षेत्रातून मंदिराचा बराचसा भाग बाहेर काढून तिथल्या जवळच्या गावात पुनर्स्थापित करून जीर्णोध्दार केला गेला.
नवीन मंदिर फार सुरेख बांधले आहे. मूळ वेणुगोपाळ मंदिर आहे. तसेच भोवतीने गणपती, सप्त नद्या, सप्त ऋषी, अष्टलक्ष्मी, गरुड, हनुमंत, दशावतार, नवग्रह,अशी सर्व मंदिरे बांधली आहेत. सर्व मूर्ती काळ्या पाषाणात बनवल्या आहेत. अत्यंत देखण्या अशा ह्या मूर्ती आहेत.
म्हैसूर चे वृंदावन गार्डन बघायला जाताना थोडीशी वाकडी वाट करून हे मंदिर बघायला जायलाच हवे असे हे अप्रतिम मंदिर. बाजूचा परिसर एकदम शांत आणि प्रशस्त आहे. तिथेच दोन हत्ती असलेल्या दगडी रथाचे शिल्पकाम बघण्यासारखे आहे. संपूर्ण परिसरात पारिजातक आणि अनेक प्रकारच्या तुळशी लावल्या आहेत. समोर धरणाचे बॅकवॉटर आणि त्यात मूळच्या मंदिराचे काही अवशेष पहायला मिळतात.
परतीच्या वाटेवर 'अन्नपूर्णा आहार ' मध्ये एकदम पारंपरिक, मस्त कर्नाटकी जेवण (हब्बदा उटा) केले.
सौ. श्वेता अनुप साठये
०१/१०/२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा