सोमनाथ
आनंदवनहून हेमलकसाला जाणार होतो आयत्यावेळी थोडा प्लॅन बदलला त्यामुळे जेवून सोमनाथला जायला निघालो. मनुष्य वस्ती हळूहळू विरळ होत जंगलातून प्रवास चालू होता. चंद्रपूर, मूल मार्गे संध्याकाळी सोमनाथ प्रकल्पावर पोहचलो. ताडोबा जंगलाला लागूनच हा प्रकल्प आहे. बरीच थंडी होती, अंधार पडतच आला होता. शेकोटी भोवती बसून सगळ्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या. काही जणींनी सुरेल आवाजात गाणी, भजनं गाईली. जेवायला मस्त खिचडी कढी, पिठलं , पोळी, पापड, तिकडची खासियत.. वरून लसणाच्या फोडणीचे तेल असा मस्त बेत झाला. जेवणानंतर फेरफटका मारायला निघालो तर तिथल्या लोकांनी सांगितले, 'ताडोबाच्या जंगलाच्या शेजारीच असल्याने जनावरांचा तसा मुक्त वावर असतो त्यामुळे प्रकल्पाच्या हद्दीत gate च्या आत मधे च फिरा'.
पहाटे उठून सूर्योदय पाहायला गेलो. आजूबाजूला हिरवंगार जंगल , शेती पाहत फिरत फिरत तळ्याकाठी सूर्योदय पाहायला गेलो. उगवणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब, तळ्यातल्या नितळ पाण्यात पडले होते. फोटो सेशन, सूर्याला हातात पकडण्याचा वृथा प्रयत्न करून झाला😀...बरेच निरनिराळे सुंदर पक्षी इथे पाहायला मिळाले. इथल्या माणसांप्रमाणेच पक्षीही मोकळा श्वास घेऊन आनंदाने मुक्तविहार करत होते.
ब्रेकफास्ट करून आम्ही प्रकल्प पाहायला निघालो. तिथे पाटील काका प्रकल्पाची माहिती सांगत होते. बाबांनी स्थापन केलेल्या अनेक प्रकल्पांपैकी "सोमनाथ" हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. १९५१ साली ' महारोगी सेवा समिती वरोरा ' ही संस्था स्थापन केली आणि "आनंदवन" सुरू केले. अपंग कुष्ठरोगी बांधवांना त्यांचे दुःख विसरून स्वाभिमानाने जगता यावे यासाठी स्वावलंबी बनवले. विविध कॉलेजेस, वेगवेगळी प्रशिक्षणे देऊन पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले. अपंगांचे आदर्श गाव "आनंदवन " खऱ्या अर्थाने नंदनवन आहे. शेती आणि शेतीविषयक औद्योगिक क्षेत्रात त्यांना प्रशिक्षण मिळावे, गोपालन, मशीन reparing इत्यादी गोष्टींचे ज्ञान मिळवून त्यांना त्यांच्या गावी परतून काम करता यावे आणि इतरांना ही शिकवता यावे याहेतूने "workers University " स्थापन करण्यासाठी (श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ) बाबांनी शासनाकडे योजना सादर केली त्यामुळे शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात मुल मारोडा गावाजवळ सोमनाथ येथे जंगल असलेली दोन हजार एकर जमीन दिली. सोमनाथाचे पुरातन मंदिर इथे आहे. त्यामुळे प्रकल्पाला नाव मिळाले "सोमनाथ प्रकल्प". १९६७ मध्ये हा प्रकल्प त्यांनी येथे चालू केला.
काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन बाबांनी मिळालेल्या जागेत राहायला सुरवात केली. जंगलातील प्राण्यांच्या भीतीमुळे सुरवातीला लोक तिथे राहायला फार घाबरत असत. पाटील काका सांगत होते, बाबा रात्री स्वतःचे अंथरूण जंगलाच्या हद्दिजवळ च टाकून झोपत असत. त्यांना पाहून इतर सहकारी हळू हळू भीती सोडून त्यांच्या सोबत राहायला तयार होत. कालावधीने हळूहळू बांबूच्या तट्ट्या पासून झोपड्या बनवून सर्व जण राहू लागले. मिळालेली जंगलाची जमीन साफ करून, विहिरी खणून जमीन शेतीयोग्य करून घेतली गेली. श्रमदान शिबीरे आयोजित करून 'श्रमसंस्कार छावणी ' उभारली गेली.
सेंद्रिय पद्धतीने शेती ची लागवड केली जाते. रोपवाटिका ही तयार केल्या आहेत लागवडीसाठी. लोकांमध्ये ग्रुप ग्रुप मध्ये शेती चे तुकडे वाटप करून ती कसायला दिली जाते. सर्वांसाठी जेवणाचे डबे कॅन्टीन मधूनच पोस्त केले जातात. सर्वांना सारखं जेवण. शेतावर पाणपोई आहे. दवाखाना आहे. कुणालाही घरी चूल मांडायची permission नाही. सकाळी उठल्यापासून भरपूर काम मिळाल्यामुळे बाकी चे काही वेदनेचे, दुःखाचे विचार करायला वेळच न मिळाल्यामुळे लवकर व्याधिमुक्त व्हायला लोकांना मदत होते.
भात शेती , कापूस , हरभरा इत्यादी अशी शेती होते. इतर ठिकाणी भात शेती करताना संपूर्ण भात कापणी करून जाळून पुन्हा खतं घालून केली जाते परंतु इथे भाताची रोपं अर्धी च कापून ती रोपं त्याच शेतात कुजवून तिथे खत तयार केलं जातं आणि त्यामुळे पुढचं पीक जोमाने येते आणि भाताचं पीक ही भरघोस येतं. जंगलात औषधी वृक्षांची लागवड केली जाते. अर्जुन, पळस, मोह , बिजा , वड ,पिंपळ, बाभळी अशा अनेक झाडांची माहिती काकांनी तिथे दिली. मधुमेहावर गुणकारी, बीजाचा झाडाच्या लाकडाचा ग्लास मधून पाणी पिणे , रुईचं पान गरम करून तळपायाला बांधून झोपणे, पेरू,बेल यांची पानं चघळून रस प्यायचा आणि चोथा फेकून द्यायचा, रुईचा चिक काटा काढायला उपयोगी, इंद्रजव, ...टाकळा याच्या बियांचा कॉफी सारखा उपयोग, बहावा च्या शेंगांच्या बियांचा खोकल्यावर उपयोग, आघाड्याची काडी दातदुखी साठी, पळसाची फुले मूळव्याध, कोड (आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करणे), दगडीपाला रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. अर्जुनाच्या खोडाच्या अंतरसालीचे उपयोग इत्यादी अनेक उपयोग काका ती ती झाडं दाखवून सांगत होते. (कुठलाही प्रयोग आपापल्या वैद्यांना विचारून करा.) बऱ्याच पक्षांचीही मस्त माहिती काका सांगत होते. सुगरणीचा खोपा आधी नर बांधतो, तो मजबूत नीट बांधला असेल तरच मादी सुगरण संसार थाटते आणि उरलेल्या खोप्याचे बांधकाम विणकाम, दोघे मिळून पूर्ण करतात. अशी बरीच रंजक माहिती ते जाताजाता सांगत होते.
श्री विकास भाऊंनी बांधलेल्या युनिक बंधारा पाहायला गेलो. त्या बंधाऱ्याची माहितीही त्यांनी दिली. टाकाऊतून टिकाऊ गोष्टी उपयोगात आणून तळ्यावर बांध घातला गेला आहे. गाड्यांच्या टायर चा उपयोग करून त्यात प्लास्टिक पिशव्या ,सिमेंट दगड, असं सगळं भरून त्याचा उपयोग बंधारा घालण्यासाठी केला गेला आहे. बांधाच्या पलीकडेच बांधाला लागून च एक मोठा हौद बांधला आहे तो कायम भरलेला राहतो आणि तो भरून त्यावरून पडणारं पाणी पाटाने सबंध शेतीला वळवले आहे. पाण्याची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे भरपूर पाण्याची सोय शेतीला झाली आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी शेतांजवळ वसाहतींची बांधकामं केली आहेत. अजुन सुट्ट्यांमध्ये श्रमदान शिबिरे तिथं असतात. शेतात पिकलेले धान्य विक्रीसाठी ठेवलेले आहे. भाजीपाला बाजारात नेऊन विकला जातो. काका आठवण सांगत होते, बाबा सुरवातीला तिथल्या लोकांनी पिकवलेला भाजीपाला घेऊन बाजारात विकायला जायचे, लोक खूप अवहेलना करायचे, सगळा भाजीपाला घेऊन गटारात फेकून द्यायचे, असे बरेच वर्षं चालू राहिलं, हळू हळू लोकांमध्ये acceptance यायला लागला , मालाची विक्री होऊ लागली. सातत्य, चिकाटी ने या अवघड गोष्टी साध्य करता आल्या. या सगळ्या प्रवासात त्या लोकांसोबत खंबीरपणे बाबा पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आज हे सुंदर विश्व पाहायला मिळते.
संपूर्ण प्रकल्प पाहून, जेवून आम्ही सोमनाथाचे मंदिर पाहायला गेलो. एका छोट्या टेकडीवर छोटासा धबधबा आणि बाजूला सोमनाथाचे छोटंसं सुंदर मंदिर आहे. दर्शन घेऊन निघालो आदिवासी बांधवांची आणि "नेगलची" अद्भुत दुनिया पहायला.
चला मग हेमलकसाला 😊
©सौ.श्वेता अनुप साठये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा