हेमलकसा
लोकबिरादरी प्रकल्प
सोमनाथाचे दर्शन घेऊन आम्ही दुपारी हेमलकसाला जायला निघालो. सगळा रस्ता जंगलातून आहे. साधारण पाच एक तासाचा प्रवास आहे. वाटेत बरेच मिल्ट्री चे ट्रक, पोलिस गाड्या दिसत होत्या. हा भाग तसा नक्सली भाग म्हणून प्रसिध्द आहेच. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे, प्रवासात त्याची सतत जाणीव होत राहते. जंगलात अडीच तीन च्या दरम्यान एक टपरीवजा रेस्टॉरंट दिसले तिथे चहासाठी थांबलो.
आधे मधे तुरळक छोटी छोटी गावं, वस्त्या दिसतात तेवढीच काय ती माणसांची चाहूल बाकी सगळं निर्जन. मूल, मरोडा, हरणघाट, श्रीनिवासपूर, गौरीपूर,घोट, एटापल्ली, आलापल्ली, दुडेपल्ली, भामरागड, तिरकामेटा अशा गावांच्या नावातही वेगळेपण जाणवते. महाराष्ट्र , छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमा जिथे जोडल्या जातात तिथला हा सगळा घनदाट अरण्याचा भाग. तिन्ही राज्यांच्या भाषांचा प्रभाव इथल्या भाषेत जाणवतो. माडिया, गोंड , हलबी, हिलमाडीया, वतनकार अशा अनेक आदिवासी जातींचे लोक ह्या जंगलांमधे राहतात. अजूनही त्या भागाला बाहेरच्या जगाचा फारसा स्पर्श झालेला जाणवत नाही. इतका हा दुर्गम आणि दुर्लक्षित भाग. वाड्या वस्त्यांना, गुरांच्या गोठ्याना जंगली श्वापदांपासून संरक्षणासाठी बांबूची, लाकडांच्या खोडांची कुंपणं घातलेली दिसतात. गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांनी हा प्रदेश वेढला आहे. वाटेत बऱ्याच लहानमोठ्या नद्या लागल्या. ह्या दिवसात पाणी कमी असलं तरी काहींची पात्रं इतकी मोठी होती की ती पाहून पावसाळ्यात त्या किती रौद्र रूप धारण करत असतील हा अंदाज येत होता. काही नद्यांवर पुल बांधणीची कामं चालू आहेत. मैलांच्या दगडांवरून अंतरांचा अंदाज येत होता. बऱ्याच अंतरानंतर एक सिमेंट ची कमान आणि काही बिल्डिंग दिसल्या. तोच लोकबिरादरी प्रकल्प.
सूर्यास्त व्हायची वेळ आली होती म्हणून तिथून पुढे आम्ही आधी त्रिवेणी संगम पाहायला गेलो. पर्लकोटा, पामुलगौतमी, इंद्रावती या तीन नद्यांचा हा संगम. खडकांमधून खळाळत वाहत येणाऱ्या आणि प्रचंड विशाल पात्रं असलेल्या ह्या नद्या. अतिशय सुंदर , चारी बाजूंनी संपूर्ण घनदाट जंगलांनी वेढलेल्या, रम्य पण तेवढ्याच गूढ आणि रौद्र जाणवल्या. पावसाळ्यात केवढ्या दुथडी भरून वाहत असतील!! आपसूक माझ्या मनात आमच्या कऱ्हाडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाशी तुलना झाली. दोघी समोरासमोर येऊन एकमेकींना भेटतात आणि पुढे मिळून संथ वाहत राहतात.
इथले सगळे ऋतू ही अत्यंत रौद्र असतात. भरपूर पाऊस त्यामुळे नद्यांना प्रचंड पूर येतो आणि बाकी जगाशी थोडाफार असलेला ही संपर्कच तुटतो , उन्हाळ्यात ही पारा ५०° पर्यंत पोहचतो तर थंडीही तितकीच गोठवणारी. रौद्र निसर्ग, चारी बाजूंनी जंगल आणि श्वापदांच्या, रोगराईच्या रुपातून तर कधी उपासमारीतून नेहमीच समोर उभा ठाकणारा मृत्यू ...अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथले आदिवासी वर्षानुवर्षं जीवन जगत राहिले आहेत. त्यांच्या या जीवन संघर्षात गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांना आपुलकीचा आणि मायेचा हात देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत ते डॉ श्री प्रकाश भाऊ आणि डॉ. सौ. मंदाताई आमटे आणि त्यांचे सहकारी. आदिवासींवर उपचार करून त्यांना जगवण्याचं आणि त्यांना सजग करून त्यांचा विकास घडवून जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अविरत इथे चालू आहे.
अजूनही हा भाग तसा दुर्गम च आहे , घनदाट जंगलांनी वेढलेला तर पन्नास वर्षांपूर्वी तर कसा असेल?? बापरे !! कल्पनाही करवत नाही. तशाही अवस्थेत या भागात येऊन काम करणं किती आव्हानात्मक असेल!! ते आले तेव्हा पहिले वीस वर्षं तर वीज ही नव्हती इथे म्हणतात. रामायणातल्याच गोष्टी आठवायला लागल्या मला तर हा भाग पाहून. खरंतर त्यावेळच्या दंडकारण्यातलाच भाग की हा...अजूनही तसाच गूढ... फक्त राम सीते नी नावं बदलून प्रकाश भाऊ आणि मंदाताई या नावांनी वेगळ्या रूपात येऊन ह्या युगात काम चालू ठेवलंय त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन.
त्रिवेणी संगम पाहून आम्ही प्रकल्पात मुक्कामाला गेलो. पोहचलो तेव्हा तिन्ही सांज उलटून गेली होती. वसतिगृहातल्या मुली अंगणात बसून एका तालासूरात छान गाणी म्हणत होत्या. एमपीएससी, युपीएससी पास झालेले विद्यार्थी आले होते. सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्याआधी 'प्रकल्पाला भेट' , त्यांच्या अभ्यासाचा एक भाग होता. कॅन्टीन मध्ये जेवताना त्यांच्याशी थोडावेळ गप्पा मारल्या.
आनंदवन , सोमनाथ सारखीच आमची इथेही राहण्याची खूप छान व्यवस्था केली होती. कुठून तरी प्राण्यांचा वास ही येत होता. आता फार उत्सुकता होती ती प्रकल्प आणि प्राण्यांचे अनाथालय पाहण्याची.
पहाटे उठून खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापेक्षा एक गोंडस सुंदर हरणं तिथे होती. इतकं भारी वाटलं पाहून, पण कुठेतरी मन चुकचुकलं ही अनाथ म्हणून!! आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. शाळेतली, वसतिगृहातली युनिफॉर्म घातलेली लहानमोठी सगळी मुलं परिसराच्या स्वच्छतेत दंग होती. आपापल्या कुवतीनुसार एकदम उत्साहात त्यांची कामं चालू होती. काही छोट्या मुली फुलं गोळा करताना दिसल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या, काही लाजून पळून गेल्या. त्यांच्यासोबत गाणं म्हटलं. वाटेत श्री विलास मनोहर भेटले." नेगल " त्यांनीच लिहिले आहे. माझ्या सासऱ्यांचे ते वर्गमित्र. त्यांना ओळख सांगितली तर हसून म्हणाले, " सांग त्यांना, आहे अजून"😀....त्यांच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची आणि इतर विचारपूस केली त्यांनी. फार छान वाटले भेटून त्यांना.
त्यानंतर सर्वजण एका हॉल मध्ये जमलो. तिथे प्रकल्पा संदर्भातली एक डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली. १९७३ साली अती मागास आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ह्या प्रकल्पाची सुरवात स्व. बाबा आमटे यांनी केली. १९७४ साली एका झोपडीत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाताई आमटे यांनी दवाखाना सुरू केला गेला आणि दुसऱ्या झोपडीत त्यांचा संसार. उपासमार, कावीळ, tb, cancer , विषबाधा, जंगली जनावरांनी केलेल्या हल्ल्यामुळे जखमी लोक असे बऱ्याच patients ना मोफत उपचार हे तिथे देत आलेले आहेत. आता मोठा दवाखाना तिथे बांधला आहे. आधुनिक उपकरणं, सोयी सुविधा दवाखान्यात विनामूल्य उपलब्ध आहेत. आजूबाजूच्या तिन्ही राज्यांतून साधारण हजारेक गावांमधून लोक उपचार घेण्याकरता इथे येतात. अजूनही सरकारी अनुदान ह्या दवाखान्याला नाही असं समजलं, दरवर्षी साधारण दहा लाख रुपये खर्च औषधोपचारांसाठी येतो.
बरेच वर्षे अगदी जनावरांसारखं जीवन जगणाऱ्या गरीब ,अशिक्षित आदिवासी लोकांना व्यापारी, ठेकेदार, वनविभागाचे अधिकारी फार फसवणूक करून त्यांना त्रास देत असत. त्यांच्या जनजागृती साठी प्रकाश भाऊंनी सहकाऱ्यांसह तिथे १९७६ साली शाळा सुरू केली. सुरवातीला गावागावातून फिरून शाळेसाठी मुलं गोळा केली गेली. डॉ.आमटे त्यांची मुलं ही याच शाळेत शिकली. आता मात्र बालवाडीपासून बारावी पर्यंत तिथे शाळा आहे. बांबू क्राफ्ट, शिवणकाम, मेटल art , computer training अशी निरनिराळी प्रशिक्षणं विद्यार्थ्यांना तिथे दिली जातात. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. बरीच मुलं त्या शाळेतून शिकून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलिस, शिक्षक वनविभाग अशा बऱ्याच क्षेत्रात कामं करतात. शाळेला महाराष्ट्र शासना कडून ७५% अनुदान मिळते.
आदिवासी मुलं अत्यंत काटक असतात त्यामुळे खेळात, athletics मध्ये स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हल ला खेळत असतात. आत्ता सध्या ऑलिम्पिक्स कॉम्पीटिशन्स साठी तयारीला लागली आहेत. मोठं ground , व्यायामशाळा बांधल्या आहेत तिथे. प्रकल्पाला मिळणाऱ्या देणग्यांमधून हे सर्व खर्च भागवले जातात.
या आदिवासींचे पूर्वी जंगली जनावरं आणि कंदमुळं हेच चरीतार्थाचं साधन होतं...त्यामुळं ते शिकारी करून भाजून जनावरं खायचे. एकदा माकड मारून नेताना त्या माकडीणीला छोटं पिल्लू बिलगलेलं पाहून प्रकाश भाऊनी ते पिल्लू तरी वाचेल या हेतूने ते घेऊन त्याच्या बदल्यात त्यांना खाण्याचे पदार्थ त्यांनी दिले. हळूहळू अशी बरीच अनाथ झालेली पिल्लं त्यांच्याकडे आदिवासी घेऊन येऊ लागले त्याबदल्यात अन्न घेऊन जाऊ लागले. प्राण्यांच्या प्रेमापोटी अशा तऱ्हेने ' प्राण्यांचे अनाथालय ' तिथे निर्माण झाले. त्या प्राण्यांची आई च मरून गेल्यामुळे जंगलात राहून जे धडे त्यांची आई देऊ शकते ते माणूस त्यांना देऊ शकत नाही. शिकार करणं वगैरे...त्यामुळे त्यांचं संगोपन करून सोडून दिले तर जंगलात ते तग धरू शकणार नाहीत. पण प्रकाश भाऊंनी त्यांना आईची माया लावून पोटच्या मुलांसारखंच वाढवले आहे. जीवापाड जपून त्यांची काळजी घेतली आहे. त्या प्राण्यांचे किस्से, त्यांना जगवण्यासाठी त्यातून आलेली नवनवीन आव्हानं त्यावर केलेली मात असा सगळा प्रवास "नेगल" या पुस्तकात, श्री विलास मनोहर यांनी फार सुंदर तऱ्हेने लिहिला आहे.
डॉ. प्रकाश भाऊ आणि डॉ. मंदाताई आम्हाला सर्वांना भेटायला वेळ काढून आले होते. एवढं मोठं व्यक्तिमत्त्व पण किती साधे आहेत दोघे!! इतर सेलिब्रिटींसारखा मागेपुढे लवाजमा, बॉडी गार्ड काही नाही...कुठेही प्रसिद्धीची हाव नाही. मंदाताईना पाहून तर मला माझ्या आत्याची फार आठवण आली. अगदी तशाच दिसतात. साधी सुती साडी नेसलेल्या आणि एकदम सात्विक, शांत मूर्ती. त्यांनी आमची ओळख करून घेतली. प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रकाश भाऊ म्हणाले " आदिवासींना जगवण्याची गरज आपली आहे, ते तसेही जगतच होते " हीच काम करत राहण्याची प्रेरणा आहे. इतकं प्रचंड कार्य केलेय त्यांनी पण तरी कुठेही गर्वाचा लवलेश ही त्यांच्याकडे नाही..."Dr प्रकाश बाबा आमटे" movie बद्दल, अनाथालयातल्या प्राण्यांविषयी गप्पा मारल्या. आम्हीही त्यांना नदी पात्रात करत असलेल्या शिर्षासनाचे रहस्य विचारले. ते सांगत होते दोन मिनिट ते पाण्यात श्वास रोखून शीर्षासन करू शकतात. सरावानेच त्यांना ते साध्य झाले. आमच्या ग्रुप मध्ये नर्सिंग क्षेत्रात असलेल्या मैत्रिणीने तिथे जाऊन सेवा देण्याचा मानस बोलून दाखवला. वैद्यकीय विषयावर, नवीन योजनांवर ते भरभरून बोलत होते. त्यांची मुलं Dr दिगंत आणि सून Dr अनघा हे दवाखान्यात सेवा देतात आणि श्री अनिकेत administration सांभाळतात. तर सून समीक्षा शाळेची व्यवस्था पाहतात. नवीन पिढी करत असलेल्या कार्याबद्दल ते सांगत होते. आता आजूबाजूच्या गावांना सेवा देण्याबरोबरच व्यसनमुक्त करण्याचे ही काम मुलं करतात.
त्यांच्यासोबत फोटो काढून झाले. मग प्रकाश भाऊ प्राण्यांचे अनाथालय दाखवायला आमच्यासोबत आले. हरीण, मगर, बिबटे, अस्वलं, अजगर, नाग, साळिंदर, कोल्हे, नीलगाई अशा बऱ्याच प्राण्यांना आसरा देऊन त्यांना जीवनदान मिळवून दिले आहे. फार प्रेमाने त्यांनी त्यांना सांभाळले आहे.
प्राणी पाहून झाल्यावर यंपलवार काकांनी सर्व प्रकल्प दाखवून तिथली सगळी माहिती सांगितली.
भगवद्गीतेतील कर्मयोगाचा खरा अर्थ या तिन्ही प्रकल्पांना भेट दिल्यावर समजायला लागतो.
शाळा, मैदान , gym , त्यांना मिळालेली बक्षिसं, असं सगळं पाहून ह्या अनुभवांचा अमूल्य ठेवा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
मनामध्ये फक्त एकच भावना त्यावेळी होती....
तू बुध्दी दे तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे !!
©सौ श्वेता अनुप साठये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा