नर्मदे हर!🙏🏻😇
जय श्री महाकाल 🙏🏻😇
उज्जैन
ओंकारेश्वरहून सकाळी उज्जैनला जायला निघालो. वाटेत शनी मंदिर लागते . वास्तू शास्त्रा प्रमाणे नवग्रहांच्या रचना इथे दिसतात. मंदिर छान आहे. दर्शन घेऊन पुढे उज्जैन ला पोहचायला संध्याकाळ झाली. महाकाल कॉरिडॉर बघायला गेलो. पण तिथे गेल्यावर खूप जोरदार पाऊस आला त्यामुळे तिथेच असलेले त्रिवेणी म्युझियम पाहायला गेलो. दारातच मोठे शिवलिंग दिसते. उज्जैन नगर तीन देवतांचे महत्त्व असलेले. तशी सर्वच मंदिरं इथे आहेत पण मुख्य तीन देवता...महाकाल म्हणजेच महादेव, कृष्णाचे गुरुकुल असलेले ठिकाण म्हणून कृष्ण, आणि दोन शक्ती पीठं इथे आहेत, एक गढ कालिका आणि दुसरी हरसिध्दी माता म्हणजेच देवी ची ही उपासना इथे होते. ह्याचं तीन थीम वर हे सुंदर संग्रहालय बनवले आहे म्हणून नाव दिले त्रिवेणी संग्रहालय. त्रिवेणी म्युझियम.
हे संग्रहालय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवले गेले आहे. भारत भरातून कलाकारांची निवड करून इथे काम केले जात आहे. ओरिसाच्या कलाकारांनी केलेली मूर्ती,शिल्पकला खूपच जीवंत वाटते. दुर्मिळ शिल्पं, नाणी, वस्तू केवळ अप्रतिम. लाईट इफेक्ट फार सुंदर पद्धतीने वापर करून सर्व बनवले आहे. आज पर्यंत भारतात पाहिलेल्या अनेक म्युझियम पैकी सर्वात सुंदर सादरीकरण असलेले हे म्युझियम आम्हाला वाटले. आमची माहिती जाणून घेण्याची आवड बघून तिथले कलाकार आणि काही स्टाफ आम्हाला सविस्तर माहिती देण्यासाठी आले. फारच छान माहिती ते ऐकवत होते. उत्खननात मिळालेलं सर्वात जुने नंदी शिल्प इथे आहे.
संग्रहालयाचा प्रत्येक भाग त्या त्या थीम च्या पौराणिक काळात आपल्याला घेऊन जातो. छतावर शंकराच्या भरतनाट्यम् च्या प्रत्येक मुद्राभिनयातले पेंटिंग्ज त्यांनी केले आहेत. महादेव / शिव परिवार विभागात मध्यभागी वडाचे झाड जे महादेवाचे प्रतीक म्हणून बनवले आहे. ज्याच्या मूळाचा ठाव लागत नाही आदी नाही अंत ही नाही असेच वडाच्या झाडाचे ही असते जमिनीखाली ही सर्वदूर पर्यंत खोल पसरत जाणारी मुळे तर जमिनीवर फांद्यांवरूनही उगवणारी मुळे म्हणजेच पारंब्या ज्यातूनच अनंत कालावधी पर्यंत वाढत राहू शकणारा हा वृक्ष. पारंब्या हे जटांचे ही प्रतीक. आणि त्यापासून उत्पन्न होणारे भैरव. म्हणूनच महादेवाचं प्रतीक बनण्यास सार्थ. शिवलीलामृतातील अनेक प्रसंग इथे चित्र, मूर्तिकला, हस्तकला स्वरूपात पाहायला मिळतात.
कृष्णाची थीम आहे तिथे त्यांनी मध्यभागी कदंब वृक्षाची प्रतिकृती बनवली आहे. कदंब कृष्णाचा अतिशय आवडता वृक्ष. गोपींकडून चोरलेले लोणी याच वृक्षाच्या पानांतून सवंगड्याना वाटणारा, याच झाडाखाली बसून बासरी वादन करणारा, रास लीला रचणारा असे हे हरिप्रिया नाव असलेला वृक्ष. बंगलोर च्या लालबागेत द्रोणाच्या आकाराची पानं असलेला (बटर कप ) खूप जुना कदंब वृक्ष पाहायला मिळतो. आंध्र च्या कलाकारांनी सर्व कृष्णलीला असलेले पेंटिंग्ज बघण्यासारखे आहे. पुण्याच्या कलाकारांनी बनवलेली कृष्णाची ऑईल पेंटिंग्ज तर आपणच समोर उभं राहून अर्जूनाबरोबर गीतेचा उपदेश ऐकत असल्यासारखा फिल देतात. मध्यभागी कृष्ण सुदामा भेटीचा सीन आपल्याला पाहायला मिळतो. इथे त्यांनी खूप सुंदर कृष्ण सुदाम्याच्या कथा ऐकवल्या. आधी फारशा न ऐकलेल्या .अख्खी भिंत व्यापलेलं श्रीनाथ हवेली mural तर वेळ काढून पाहण्यासारखे आहे.
आदिशक्ती , दुर्गा, काली, सरस्वती अशी अनेक शक्ती रूपं आपण पुढच्या थीम मध्ये पाहतो. दशमहाविद्यांची , नवदुर्गा यांच्या यंत्रांच्या प्रतिकृती कलात्मक पद्धतीने त्यांनी बनवली आहेत. मध्य भागी श्रीयंत्र पाहायला मिळते. कडुनिंब वृक्षाची प्रतिकृती अगदी हुबेहूब त्यांनी साकारली आहे. शक्ती पूजनाचा महत्व असलेला वृक्ष म्हणून कडुनिंब वृक्षाची प्रतीकात्मक निवड त्यांनी केली. बंगाली स्टाईल ची नावदुर्गा पेंटिंग्ज अप्रतिम .
हे सर्व दाखवत असताना अनेक कथा पौराणिक संदर्भ देऊन आम्हाला त्यांनी ऐकवल्या. आमच्या व्यतिरिक्त एक दोन माणसं सोडली तर कोणीही म्युझियम पाहायला आले नव्हते. त्यामुळे कुठल्याही व्यत्यया शिवाय जवळ जवळ साडेतीन चार तास आम्ही त्यांच्यासोबत डिटेल मध्ये माहिती ऐकत संग्रहालय फिरत होतो. सरकारने बनवलेले, काम चालू असलेले नवीन प्लॅन्स वगैरे विषयांवर ही चर्चा झाली. ऑफिस hours संपले तरी तिथले हेड सोलंकी यांनी खूपच छान माहिती वेळात वेळ काढून आम्हाला दिली. त्यांना शुभेच्छा देऊन आणि आमचा अभिप्राय नोंदवून आम्ही तिथून निघालो.
ओंकारेश्वर चा प्रचंड गर्दीचा अनुभव घेतल्यामुळे आम्ही महाकाल दर्शनासाठी शीघ्र दर्शन तिकीट घेतले. सकाळी नऊ ला महाकालाचे खूप छान दर्शन झाले. भाविकांचे सतत मोठ्या आवाजात चालेलेले जयघोष " हर हर महादेव". त्या क्षेत्राची प्रचंड ऊर्जा जाणवते. प्रसाद घेऊन बाकीही त्या आवारातली मंदिरं , भारत माता मंदिर, जुने शिलालेख असं सर्व बघून आम्ही उज्जैन ची इतर मंदिरे पाहायला गेलो.
राम घाटावर अतिप्राचीन यम धर्मराज मंदिर आहे. मंदिर अगदी छोटंसं पण खूप पौराणिक महत्व असलेलं आहे. भावाने सांगीतल्यामुळे त्याची माहिती आम्हाला मिळाली. यम म्हणजेच धर्मराज, चित्रगुप्त, चौऱ्याऐंशी लक्ष योनींची प्रतीकात्मक चौऱ्याऐंशी शिवलिंगे, बारा ज्योतिर्लिंग, चोवीस विष्णु रुपं या सर्वांचं दर्शन आपल्याला इथे घेता येतं. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रभु श्रीराम जेव्हा राजा दशरथ यांच्या निधना नंतर त्यांचे पिंड दान करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यावेळेस रामाने वरील सर्व मूर्ती, शिवलिंग, ज्योतिर्लिंग , चोवीस विष्णु मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची इथे क्षिप्रा नदी जलाने अभिषेक करून पूजा केली होती. तेच हे मंदिर. समोरच पिषाच्य मुक्तेश्वर मंदिर आहे. ते ही रामाने स्थापन केलेले आहे एवढे प्राचीन मंदिर आहे.
या सर्व ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे काळभैरव मंदिर पाहायला गेलो. अतिप्रचंड गर्दी . कमीतकमी चार तासांची रांग बघून आम्ही फक्त मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले . हे मंदिर खाजगी आहे. सरकारने ट्रस्ट बनवण्याचा प्रस्ताव बहुतेक त्यांना मान्य नाही. त्यामुळे मंदिरचे ट्रस्ट नाही . त्यामुळे त्याभागात सुधारणा ही दिसली नाही. आजूबाजूला अत्यंत घाणी चे साम्राज्य दिसले. फार वाईट वाटले बघून. सुधारणा, रस्ते, स्वच्छता, व्हायला हवी असं प्रकर्षानं जाणवलं. फार प्राचीन , जागृत मंदिर आहे. दारूचा नैवेद्य इथे दिला जातो काळभैरव याला. हे ऐकून आम्हाला जरा आश्चर्य च वाटले. गाईड ने त्यासंदर्भातील एक रोचक कथा ऐकवली ... ब्रह्माच्या पाचव्या मुखाला ज्ञानाचा अहंकार झाला , त्यामुळे शंकराने त्याच्यापासून भैरव उत्पन्न केला आणि त्याला आदेश दिला की ब्रह्माचे पाचवे मस्तक उडव. पण भैरव ब्रह्म हत्येचे पातक लागेल म्हणून चिंताग्रस्त झाला तेव्हा त्याने मदिरपान करून शून्यावस्था प्राप्त करून ( नशेत मेंदूचा ताबा नष्ट होतो आणि हातून काय कृती होते समजत नाही ) नखाने ब्रह्माचे पाचवे मस्तक छाटले. पण ते मस्तक तसेच हाताला चिकटून राहीले. म्हणून शंकराकडे जाऊन सोडवण्याची त्याने विनंती केली असता शंकराने त्याला सगळीकडे भ्रमण कर ज्या तीर्थ क्षेत्री हे मस्तक गळून पडेल तिथे जाऊन तप कर आणि प्रायश्चित्त घे असे सांगितले. वाराणसी/ काशी मधे गेल्यावर गंगास्नान झाल्यावर ते मस्तक आपोआप गळून पडले आणि काळभैरव तिथेच स्थानापन्न झाला.
गढ कालिका मंदिर, हरसिद्धी मंदिर, सांदिपनी आश्रम, ... कृष्णलीला चित्ररुपात पाहायला मिळतात... भर्तरिनाथ गुहा, गोशाळा राम मंदिर, मंगळनाथ मंदिर (कर्कवृत्त रेषा) पृथ्वी पासून मंगळाची उत्पत्ती म्हणून पृथ्वी मंदिर इथे बघायला मिळते...तिला घातलेली प्रदक्षिणा संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा मानतात.
सर्वात शेवटी हरसिद्धी माता मंदिर, गणेश मंदिर पाहिले. सतत आठ दिवस प्रचंड चालणं झाल्यामुळे खूप दमणूक झाली होती. त्यामुळे इच्छा असून ही पुढे अजून फिरण्याचे आवरतं घेऊन आम्ही हॉटेल वर परतलो.
महाकाल मंदिर , कॉरिडॉर परिसर well managed , स्वच्छ, वाटला. पण बाकी जवळपास सर्व ठिकाणी अतिशय या बाबतीत दूरावस्था जाणवली. स्वच्छतेचा संपूर्ण अभाव जाणवला. या बाबतीत गोव्याची मंदिरं ,दक्षिणेकडची कुठलीही तीर्थक्षेत्रे, तसेच कुठलीही गावागावातली छोटी मंदिरं सुध्दा अतिशय स्वच्छ , सुंदर नियोजनबध्द पद्धतीने व्यवस्था असलेली आहेत. त्यांच्या कडून शिकून या देवस्थानांनी अवश्य सुधारणा करावी असं मला फार वाटते. तर पावित्र्य ही टिकून राहील. कोणत्याही प्रकारे कुठल्याही देवस्थानांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही पण ती योग्य पद्धतीने राखली जावीत ही कळकळ मला मनापासून वाटते. त्यामुळे गैरसमज नसावा. शासनाने जरी सुधारणा केल्या तरी भक्त, नागरिक म्हणून भेट देणाऱ्या आपल्या सर्वांची ही देश स्वच्छ ठेवण्याची तेवढीच जबाबदारी आहे हे प्रत्येक व्यक्तीने समजून आचरण करायला हवे. आणि तीच सद्बुद्धी महाकाळ सर्वांना देवो .
जय श्री महाकाल! 🙏🏻😇
भेटूया पुढच्या आणि शेवटच्या भागात इंदोर ला.😊
सौ. श्वेता अनुप साठये
९/१/२०२५
गुरुवार
पौष शु.१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा