गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

रावेर खेडी, ओंकारेश्वर

नर्मदे हर! 🙏🏻😇
जय श्री महाकाल 🙏🏻😇

रावेरखेडी 

     महेश्वरहून एक दीड तासाच्या अंतरावर वसलेलं रावेरखेडी हे छोटंसं गाव. माझ्यालेखी तीर्थ क्षेत्राचंच महत्त्व असलेलं. आपल्या शूरवीर प्रतापी  बाजीराव पेशव्यांची समाधी स्थळ असलेलं. महेश्वरहून निघून बाजूला पसरलेल्या हिरव्यागार शेतांमधून वाट काढत, गल्ली बोळातून आपली गाडी वळणं घेत जाऊन  पोहचते ते थेट नर्मदा किनारी असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या पारा पाशी. पिंपळा खाली शेंदूर फासलेला वीर हनुमंत उभा ठाकलेला दिसतो. जणू तो ही आपल्याला सांगू पाहतो..'जा, बघा, समजून घ्या या वीराचा प्रेरणादायी इतिहास. त्याच्या पुढेही क्षणभर नतमस्तक व्हा.'
      बाजूला नर्मदेचा शांत प्रवाह... इथे ती एकदम धीर गंभीर ध्यानस्थ झालेली वाटते. भारत भूमीच्या वीर पुत्राला अंत समयी स्वतःच्या कुशीत स्थान देऊन मुक्तीप्रदायीनी.
      बाजूच्या चौकोनी तटबंदीच्या आत उजवीकडे गेल्यावर एका बाजूला बाजीरावांची समाधी दिसते. तिथल्या भिंती ,खांब, प्रत्येक वीट न् वीट आपल्याला त्यांच्या शौर्यगाथा ऐकवू पाहतात....
        स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारी अगदी लहान वयात स्वतःच्या कर्तुत्वाने पेशवे पद प्राप्त झालेला हा योध्दा. लहानपणापासूनच वडिलांबरोबर मोहिमांवर जाणारे, युद्ध कौशल्य, नेतृत्व कौशल्यात एकदम निपूण असलेले बाजीराव वाऱ्याच्या वेगाने आणि अत्यंत चपळाईने, चातुर्याने त्याकाळच्या निजाम,मुघल,ब्रिटिश,पोर्तुगीज , सत्तेला कुचलत उत्तरेकडे अगदी काबूल,कंदाहार, बलुचिस्तानपर्यंत विजय पताका फडकविणारे. दिल्लीच्या तख्ताला भीतीची गाळण उडवणारे..परकीय सत्तेचा कर्दनकाळ बनून अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात चाळीसहून अधिक लढाया लढलेले आणि एकही लढाई न हरलेले असा हा शंभर टक्के यश मिळवणारा धुरंधर अपराजित योध्दा. चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले, परशुरामासारखेच शौर्य असलेले हे बाजीराव. त्यांच्या कार्याला, शौर्याला शतशः नमन🙏🏻 अशा योध्यांमुळे च आपल्या देशात आपण मोकळा श्वास घेण्याचे भाग्य आपण अनुभवू शकतो. 
        मध्यप्रदेश सरकारने योग्य तो सन्मान देऊन बांधलेली, राखलेली समाधी. महाराष्ट्रात मात्र थोडा दुर्लक्षिला गेलेला हा शूरवीर. निंदा, अफवां मध्ये प्रतिमा मलीन करण्याचे घातलेले घाट, बॉलिवूड वाल्यांनी तर अत्यंत विचित्र पध्दतीने सादरीकरण केलेले त्यांचे चरित्र पाहून मात्र मनात रागराग झाल्यावाचून राहत नाही. मूळ इतिहासाला वाटेल तसं तोडूनमोडून दाखवण्याचा जणू त्यांनी विडाच उचललेला असतो. 
      त्यांचं मोठं स्मारक आणि म्युझियम बांधण्याचा सरकारचा प्लॅन आहे असं ऐकलं. तसं लवकरात लवकर होवो हीच प्रार्थना. असा हा अडवाटेवरचा खजिना पाहून आम्ही निघालो पुढे ओंकारेश्वरला. 
     
ओंकारेश्वर
       संध्याकाळी ओंकारेश्वर ला पोहचलो. नाताळच्या सुट्ट्यांमुळे आता सगळीकडे भरपूर गर्दी झाली होती. त्यामुळे गावाच्या बाहेरच गाडी थांबवली आणि रिक्षाने आम्ही हॉटेल वर गेलो. आवरून ओंकारेश्वर च्या दर्शनाला जायला निघालो...पण इतकी प्रचंड गर्दी होती की रांगेत चार ते पाच तास उभं राहून दर्शन घ्यावे लागणार होते. त्यामुळे त्यावेळी दर्शनाचा प्लॅन रद्द करून घाटावर नर्मदा किनारी जाऊन बसलो. बोटिंग चालू होते. बोटीचं नाव होतं  "रामभरोसे". धरण, कावेरी नर्मदा संगम, शंकराचार्यांचा मोठा पुतळा, ओंकारेश्वर , ममलेश्वरचे शिखर दर्शन असं सगळ लांबून बोटीतून च पाहून सूर्यास्त पाहून काठावर पोहचलो. बोटीचं नाव मात्र सार्थ होतं. कुठल्याही प्रकारची सेफ्टी जॅकेट वगैरे काही नसतं. बोटींच्या मोटारींचा डिझेल चा धूर सर्व परिसरातील हवा एकदम प्रदूषित करून टाकतो. यात थोडी सुधारणा करायला हवी.
      तिथेच थोडावेळ थांबून  घाटावर नर्मदा आरतीमध्ये सहभागी झालो. इथे नर्मदेची आरती कुमारिका करतात. छान नटून थटून, शुभ्र पांढरा ड्रेस परिधान करून आलेल्या कुमरिकांनी छान आरती म्हटली. छोटे साथीदार त्यांना हवं ती सर्व तयारी करून देत होते. त्याचं टीम वर्क पाहून खूप छान वाटले. 
     तिथून आम्ही गजानन महाराजांच्या आश्रमात गेलो. खूप सुंदर, स्वच्छ ,शांत परिसर असलेला आश्रम आहे. परिक्रमा वासींसाठी आणि इतर भाविकांसाठी ही इथे राहण्याची जेवण्याची सोय आहे. आधी बुकिंग करून घेत नाहीत. गेल्यावर असेल शिल्लक जागा तर देतात. मंदिर खूप छान होते. 
      दुसऱ्या दिवशी पहाटे चारलाच उठून आवरून आम्ही ओंकारेश्वर दर्शनाला गेलो. शंकराची छान गाणी ऐकू येत होती. तरी दीड तास रांगेत उभं राहिल्यावर कसं बसं दहा पंधरा सेकंदच दर्शन मिळाले. प्रचंड गर्दीतून धक्काबुक्कीतून बाहेर आलो. देवळातून बाहेर पडल्यावर डावीकडे एक जिना दिसला कोणी फारसं तिकडे जाताना दिसत नव्हते. सगळे लोक घाईने बाहेरच निघून जात होते. पण माझ्या मनातली उत्सुकता मला गप्प बसू देईना. मी काही न बोलता पटपट जीना चढून वर गेले. मूळ ओंकारेश्वरच्याच मंदिरावर अजून एक मंदिर आहे, समोर मोठा त्रिशूळ आहे. तिथले दर्शन घेतले. थोडावेळ बसुन ध्यान केले. तिथून ही बाजूला मला अजून एक जीना दिसला.  त्या जिन्याने वर गेले तर ओंकारेश्वराचे शिखर तिथे होते, त्यात ही वर एक हनुमान मंदिर , शिव मंदिर आहे, शिखर दर्शन करून नमस्कार केला. तिथून सबंध धरणाचा, सगळ्या मंदिरांची शिखरे, नर्मदा नदी , ममलेश्वराकडे जाणारा पूल, सगळा व्ह्यू एकदम अप्रतिम दिसत होता. धरणावर आकाशात सुंदर चंद्रकोर दिसत होती. थोडावेळ तिथे थांबून ती सुंदर पहाट अनुभवली. अप्रतिम अनुभव होता. दिवसाची सुरवात अशी एकदम प्रसन्न वातावरणाने झाली. 
      तिथून निघून मग पलीकडे बेटावर असलेल्या ममलेश्वरचे दर्शन घेतले. खूप जुनं, पुरातन मंदिर आहे, त्यावरची  शिल्पकला फारच सुंदर आहे. गोमुख दर्शन, इंद्रेश्वर महादेव, ब्रह्मेश्वर महादेव असं सगळे दर्शन घेऊन साडेसात आठला तिथून बाहेर पडलो. आमच्याकडे थोडा वेळ होता. त्या ओंकार पर्वताची परिक्रमा करतात. तो मार्ग साधारण दहा km चा आहे... तीनचार तासात पूर्ण पर्वताची परिक्रमा होऊ शकते असे समजले. पण एवढं चालण्याचे त्राण आणि तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. दहा वाजेपर्यंत ड्रायव्हर येणार होता म्हणून परिक्रमा मार्गावरील काही मंदिरं पाहून यायचं आम्ही ठरवलं. 
     एक रिक्षा केली. रिक्षावाला फार चांगला मिळाला. त्याने आम्हाला मार्कंडेय ऋषींचे मंदिर दाखवले. तिथेच दुर्गा, काली, सरस्वती असेही मंदिर आहे, दशमहविद्यांची आराधना इथे होते. सर्वात पहिली नर्मदा परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली होती. 
     गौरी शंकर हे फार पुरातन मंदिर आहे, तीन मजली मंदिर, प्रत्येक मजल्यावर एक एक शिवलिंग आहे. पूर्वी त्याचं दर्शन घेतल्या वर पुढच्या जन्माचे ज्ञान मिळत असे अशी माहिती मिळाली... औरंगजेबाने तिथे दर्शन घेतल्यावर त्याचा पुढचा जन्म त्याला डुकराचा दिसला त्यामुळे त्याने मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला , त्यामुळे शिवलिंगावर वार दिसतो. पण संपूर्ण मंदिर , शिवलिंग उद्ध्वस्त होऊ शकले नाही. पाच हजार वर्षांपूर्वीपासून चे हे मंदिर आहे म्हणतात. राजराजेश्वरी मंदिर, बालाजी मंदिर ,  
     पाताळेश्वर हनुमान...फार पुरातन मंदिर आहे .. पाताळात जाऊन अहिरावण महिरावण यांच्या सोबत युद्ध करून त्यांना हरवून श्रीराम लक्ष्मणांची सुटका करून आणून दमल्यावर पहुडलेल्या, आणि विश्रांती घेणाऱ्या अवस्थेतला हा हनुमंत आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ही मूर्ती ही तेवढीच जुनी आहे असं तिथले गुरुजी सांगतात. सरते शेवटी आदी गुरु शंकराचार्यांचा भव्य पुतळा त्याने आम्हाला दाखवला.
      गाईंना, माकडांना तिथे खाऊ घालण्याची प्रथा आहे. आम्हीही त्यांना केळी खाऊ घातली. रोज संध्याकाळी धरणाचं पाणी पुलावरून जाते त्यामुळे त्याआधी किंवा सकाळी पाणी ओसरल्यावर च या मार्गावर जाता येते. 
     ओंकारेश्वर चा निरोप घेऊन मिळालेल्या अनुभवांसाठी कृतज्ञता व्यक्त करून आणि  मनोमन नमस्कार करून आम्ही पुढे निघालो महाकाल ची नगरी उज्जैन ला.
नर्मदे sss हर! 🙏🏻😇

सौ. श्वेता अनुप साठये ✍🏻
८/१/२०२५
बुधवार
पौष शु ९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा