शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

"अक्काची आमटी"

"अक्काची आमटी"

     आक्का, माझी आजी, आईची आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. 😊 एकदम शांत, सात्विक,सोज्वळ, हसरी अशी नऊवारीतील शिडशिडीत बांध्याची छोटीशी मूर्ती. तिच्या हातचे सर्वच पदार्थ म्हणजे साक्षात अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद.
     माझं आजोळ कोल्हापूर. मोठ्ठं घर. पुढे मोठ्ठालं अंगण तर मागेही मोठ्ठं परसदार. आजुबाजूला भरपूर फ़ुलं , फळं झाडं. घरामध्ये माजघरात कडीपाटाला टांगलेला मस्त मोठा सागवानी झोपाळा. आमचा गोतावळा तसा मोठाच. पाच मावश्या आणि एक मामा. आम्ही सर्व मिळून मावस मामे भावंडं वीस जणं.
     मे महिन्याची सुट्टी लागली रे लागली की मामाच्या घरी जायची ओढच लागायची. सर्व भावंडं सुट्टीत कोल्हापूरला जमायचोच. भरपूर खेळ, दंगा, मस्ती. मोठ्ठी भावंडं आम्हा लहान भावंडांना अगदी मस्त मायेने सांभाळायची.
     सकाळी सगळे लवकर उठून , आवरून आम्ही पहिला कट्ट्यावर म्हशीचे धारोष्ण दूध प्यायला जायचो. मोठया पितळी ग्लास मधून फेसळलेलं दूध पिऊन दिवसाची सुरुवात होत असे. मग समोरील बागेत , अंगणात, परसात खेळत अगदी धुडगूस घालत असू. थोडी उन्हं वर यायला लागली की अंगणातून आम्ही आत माजघरातल्या झोपळ्यावर झोके घेत बसायचो. एकीकडे दादांची (आजोबांची) देवपूजा चालू असायची. चंदन ,गंध,फुलांच्या, उदबत्तीच्या वासाने वातावरण अगदी सुगंधाने दरवळून जायचे. झोके घेत ती पूजा अगदी तल्लीन होऊन पाहत राहायचो. तर एकीकडे अक्काच्या हातचा स्वयंपाकाचा सुवास सगळीकडे दरवळत राहायचा.
अहाहा!! 😇
     त्यातून आक्काच्या आमटीचा वास तर अप्रतिमच. अगदी अंगणात जरी खेळत असू तरी तिथपर्यंत तो वास दरवाळायचा आणि नुसत्या त्या आमटीच्या वासानेच आम्ही घराकडे जेवण्यासाठी धाव घ्यायचो. 😊खेळून खेळून जाम भूकही लागलेली असायची.
     एकीकडे दादा देवांची आरती करत असत तर दुसरीकडे आक्का, आई,मावश्या,मामी सर्वांची पाने वाढायला सुरवात करीत असत. दादांनी दिलेलं देवाचं तीर्थ घेऊन आम्ही वाढलेल्या पानांवर जाऊन बसत असे.
     त्यात एक मोठया मण्या मण्याचं स्टीलचं नक्षी असलेलं ताट आम्हा सर्वांचच लाडकं होतं. त्या ताटात जेवण्यावरून आम्हा भावंडांची नेहमी भांडभांडी चाले. मग सरतेशेवटी रोज एकेकाला त्यात जेवायला मिळेल अशा समझोत्यावर समजूत निघे.
     आक्का मस्त मोठया पितळी तपेल्यात भात शिजवत असे . आणि मोठ्या पितळी पातेल्यात आमटी बनवत असे. पातेल्यात गोडतेल घालून ते चांगलं तापलं की त्यात मेथ्या,जीरे, मोहरी,हिंग,हळद, कढीपत्ता घालून फोडणी चांगली तडतडली की मगच त्यात शिजवून घोटून घेतलेली डाळ घालून मग क्रमाक्रमाने इतर जिन्नस पडत असत. तो खास फोडणीचा आवाज आणि सुवास मला स्वर्गसुख देणारेच वाटे.
     सर्वजण पंगतीत येऊन बसलो की एकसुरात "वदनी कवळ घेता" म्हणत असताना एकीकडे आक्का तो गरमगरम पहिल्या वाफेचा पांढरा शुभ्र भात तापेलीतून उकरून मोठ्या ताटात घेऊन एकेकाला वाढत असे.सोबत तिने केलेल्या लिंबाचे गोड लोणचे आणि नंतर पातेल्यात रटरट उकळत असलेली गरमागरम आमटी छोट्या पातेल्यात काढून घेऊन वाटीत वाढत असे.वरून मस्त लोणकढ तूप.
     शेवटचं एकदाचं "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" अशी प्रार्थना भरभर उरकून आम्ही त्या आमटी भातावर हल्ला करून यथेच्छ ताव मारायचो. तो आक्काच्या हातचा आवडीचा आमटी भात ओरपून खाऊन मन अगदी तृप्त होत असे. शेवटी ताजं ताजं बनवलेलं आणि वर पांढरा शुभ्र मऊ लोण्याचा गोळा असलेलं ताक पिऊन आमच्या यज्ञाकर्माची सांगता मोठी ढेकर देऊन होत असे.
     प्रत्येक नातवंडाच्या चेहऱ्यावर अक्कचा ममतेने भरलेला मायेचा मऊ हात फिरत असे. "भरले का बाळा पोट?" अशी मायेची विचारपूस.
     आता अक्का काही राहिली नाही.पण तिची मायेची आठवण मात्र सदैव मनाच्या कप्यात जपून जतन करून आहे.
     आता माझा मुलगाही माझ्या माहेरी गेल्यावर आईकडे म्हणजे त्याच्या आजीकडे आमटी भाताचीच फर्माईश करतो. आणि मलाही नेहमी आमटी करताना बजावतो,"आई ,आजीसारखीच आमटी कर अगदी." 😊
अक्काच्या आमटीचा वारसा आता आई चालवत आहे.
     मी आमटी करते पण अजून अक्काच्या "त्या" आमटीची सर काही येत नाही, घटक पदार्थ तेच असले तरी.
     अक्काच्या आमटीचा वारसा चालवायच्या प्रयत्नात ....
                      सौ.श्वेता साठये  😊
"अक्काची आमटी"
साहित्य:-
एक वाटी तुरीची डाळ
दोन चमच गोडे तेल
एक चमचा मेथ्या
दोन चमचे मोहरी
एक चमचा जीरे
अर्धा चमचा हिंग
एक चमचा हळद
थोडा कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेचा कोळ दोन चमचे
दोन लिंबाएवढा गूळ
मीठ चवीनुसार
दोन चमचे गोड मसाला
तीन/चार चमचे लाल तिखट (ब्याडगी)
भरपूर माया 😊
कृती:-
प्रथम तूरडाळ धुवून त्यात डाळीच्या वर दोन पेर पाणी घालून त्यात चिमूटभर हिंग, हळद ,एक चमचा तेल घालून कूकरमध्ये चार शिट्या देऊन शिजवून घ्यावी.
शिजलेली डाळ चांगली रवीने घोटून एकजीव करून घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात क्रमाने मेथ्या , जीरे,मोहरी,हिंग, हळद, घालून फोडणी चांगली तडतडली की लगेच कढीपत्ता, घालून  त्यावर घोटलेली डाळ ओतावी. त्यात  दोन ते तीन ग्लास पाणी घालून एकसारखी ढवळून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, तिखट,गोडा मसाला, गूळ घालून छान उकाळवी. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून एक उकळी आणून गॅस बंद करावा.
तयार मस्त " अक्काची आमटी"😊
सौ श्वेता अनुप साठये













२ टिप्पण्या: