जर्सेश्वर... पुण्याजवळ खडकवासला धरणापासून दहा km अंतरावर एका सुंदर टेकडीवर जर्शेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. मंदिराच्या जवळ दहा मिनिटं अंतरावर एक पाण्याचा कुंड आहे. थोडं पुढे टेकडीवर वाल्मिकी आश्रम आहे. काहीकाळ या ठिकाणी सीतेचे वास्तव्य लवकुष सहित इथे होते असे म्हणतात.
शिवकाळात, लाल महालात छापा टाकून शाहिस्ते खानाची बोटं छाटल्यानंतर याच मंदिरात शिवाजी महाराजांनी मावळयां सहित आसरा घेतला होता असे म्हणतात. त्यावेळी सिंहगडाला आणि तोरण्याला मुघलांचा वेढा होता त्यामुळे त्यांच्या सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज च्या घाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून सोडून दिले आणि सिंहगड, तोरण्याकडे न वळता इकडे थेट जर्सेश्वर कडे धाव घेतली, जिकडे कुठलेही गड किल्ले आजूबाजूला नाहीत. त्यामुळे कुणा सैन्याला संशय यायला जागा राहिली नाही. किती दूरदृष्टी होती . बखरींमध्ये याचे दाखले आहेत .
नीळकंठेश्वर....पानशेत जवळ डावजे गावात डोंगरावर वसलेलं स्वयंभू देवस्थान. डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. तिथून डोंगर पायी चढून जावा लागतो. संपूर्ण रस्ता दगडधोंडे ,खडी असलेला आहे. डोंगर चढ चढताना कस लागतो. वर महादेवाचे स्वयंभू मंदिर आहे. सर्जे मामा म्हणून आहेत त्यांना या स्थानाचा दृष्टांत झाला. त्यांनी त्याठिकाणी खणून पाहिल्यावर स्वयंभू महादेव मंदिर आणि नंदी सापडले. त्यांनी तिथे मग भव्य मंदिर बांधले. परिसर फार सुंदर, निसर्गरम्य आहे. मंदिर परिसरात पौराणिक गोष्टींचे दर्शन घडवणारी मूर्ती कला आहे. तिथेच व्यसन मुक्ती केंद्र आहे.
मढे घाट...सिंहगड जिंकून धारातीर्थी पडलेल्या तानाजी मालुसरें ना विसाव्यासाठी या घाटात ठेवले गेले होते ते हे स्थान. समोर तोरणा (प्रचंडगड),राजगड,रायगड उभे ठाकलेले दिसतात. तिथल्या चहाच्या टपरीवरच्या एका छोट्या मुलाने आम्हाला जंगलातून दहा मिनिट चालत नेऊन डोंगरातच बनलेल्या एका पुढे आलेल्या पठारावर नेऊन समोरून दिसणारे गड आणि धबधबे दाखवले. अप्रतिम दृश्य होते. समोर भव्य सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यातून कोसळणारे धबधबे ,समोर दिसणारे ढग आणि डोंगरांच्या पाठी जाणारा सूर्य. नुसते तासनतास शांत पाहत बसावे असे निसर्ग सौंदर्य. 💕
श्वेता अनुप साठये ✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा