नर्मदे हर!🙏🏻
जय श्री महाकाल🙏🏻
धार
"नर्मदे हर", "कालिंदी", "धूनी" अशी बरीच जगन्नाथ कुंटे यांची पुस्तकं बऱ्याच वर्षांपासून वाचनात आली होती. "नर्मदे हर" तर तीनचार दा तरी वाचले. यम नियम पाळून पायी नर्मदा परिक्रमा करण्याचे धारिष्ट्य काही अजून तरी माझ्यात नाही पण त्यातील वर्णनावरून नर्मदा नदी पाहण्याची , नर्मदे काठी काही दिवस तरी राहण्याची माझी फार इच्छा होती. निसर्ग/ वैश्विक ऊर्जा ही सादाला प्रतिसाद हे देतातच. फक्त कधी, केव्हा, कसं हे आपण ठरवून काही होत नाही. योग्य वेळ आली की आणि आपल्यासाठी योग्य असलेले आपले प्रवास ठरतात, होतात किंवा ते अदृश्य अशा कुठल्याशा शक्तीने करवून घेतले जातात. असं म्हणण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत असेही काही ठरवलेले प्रवासाचे/यात्रांचे प्लॅन्स सर्व तयारी, बुकिंग वगैरे होऊन सुद्धा शेवटच्या क्षणी काही ना काही कारणांनी आम्हाला रद्द ही करावे लागले आहेत.
हिंदीत म्हणतात ना ,"बुलावा आया है! " तसं च काहीसं झालं वेगळीकडे जाण्याचं ठरत असताना कशी कोण जाणे पण आम्हा दोघांची मनं मध्यप्रदेशाकडे वळली आणि ही यात्रा घडली.
पहिल्यांदा इथून इंदोरला गेलो, पहाटे लगेच धार ला जायला निघालो. धार! राजा भोजाची नगरी. बरेच ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर. अगदी मौर्य , गुप्त काळापासून पोलादी तलवारी बनवण्याचे कारखाने इथे होते. त्यामुळेच गावाला नाव पडले धार. कुठल्याही वातावरणात गंज न धरणाऱ्या तोफा, तलवारी, स्तंभ बनवण्याचे कौशल्य इथल्या लोकांकडे होते. त्यामुळे त्याकाळी इथल्या पोलादी शस्त्रास्त्रांची मागणी भारतभर असायची. त्यातली काही शस्त्रे, तोफा अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळतात. बऱ्याच राजांच्या राजवटी इथे झाल्या. त्यापैकी सर्वात जास्त वर्षं, म्हणजे जवळजवळ चारशे साडेचारशे वर्षं परमार वंशाच्या राजांनी इथे राज्यकारभार केला. राजा भोज ही याच परमार वंशातला. तो मोठा लेखक, कवी होता, व्याकरण, खगोल शास्त्र, वास्तू शास्त्र, शिल्प शास्त्राचा जाणकार होता. अनेक पुस्तकं त्याने लिहिली आहेत.
धारवर अनेक परकीय आक्रमणं ही झाली. खिलजी, मुघल यांची राज्यं माळवा प्रातांत बरीच शतकं राहिली. पुढे १८३२ साली, श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी पुन्हा हा प्रांत जिंकून होळकर,शिंदे आणि पवार/परमार सरदारांमधे राज्यकारभार पाहण्यास वाटून दिला. बराच मोठा इतिहास आहे इथला खरं तर. गाईड ने जेवढा सांगितला त्यातला थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आम्ही पाहिलेली ठिकाणे....
*गढ कालिका मंदिर , छोट्या टेकडीवर आहे. तिच्या समोरच्या टेकडीवर काळभैरव मंदिर आहे. बऱ्याच महाराष्ट्रातील ही लोकांची कुलदेवता आहे. अत्यंत सुंदर,निसर्गरम्य ठिकाण आहे.
*धार किल्ला , भोजशाला
*धारेश्वर मंदिर ,
*रत्नेश्वर, काळभैरव मंदिर
*फडके स्टुडिओ ( इथले फोटो काढायला परवानगी नव्हती ) मा. श्री. रघुनाथ कृष्ण फडके यांनी बनवलेली मूर्ती कला इथे पाहता येते. या कलेसाठी ब्रिटिशांच्या काळात त्यांना वेंबली पुरस्कार आणि सुवर्ण पदक मिळाले होते. या studio मध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती बनवतात भारतात अनेक ठिकाणी त्यांनी तयार केलेले पुतळे पाहायला मिळतात.
* आफ्रिकन बाओबाब त्यालाच गोरख चिंच ही म्हणतात , ती झाडे या प्रांतात खूप दिसतात. आकाशाकडे मुळे असल्यासारखी आणि जाड खोड असलेली अशी दिसतात. आफ्रिकन, मुघल सुलतानांनी तिकडून आणून इकडे त्याकाळी लावलेली असे म्हणतात.
*स्वामी नित्यानंद आश्रम...
एकदम शांत , स्वच्छ , मस्त आहे. अवरात बरेच मोर आरामात इकडेतिकडे फिरत , दाणे टिपत होते. आत स्वामींचे, महादेवाचे मंदिर, गौशाळा, राहण्यासाठी व्यवस्था आहे.
क्रमशः
©सौ.श्वेता अनुप साठये ✍🏻
२/१/२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा