गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

मांडवगढ



नर्मदे हर! 🙏🏻
जय श्री महाकाल! 🙏🏻

मांडू/ मांडव/ मांडवगड

     धार जिल्ह्यात मांडू आहे. माळवा क्षेत्रातच हे येते. भारताच्या पश्चिमेला विंध्य पर्वत रांगांमध्ये असल्यामुळे राज्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठिकाण ठरलं. आजूबाजूचा प्रदेश दऱ्या खोऱ्यानी वेढलेला आहे.  मुख्य परमार वंशाच्या राजांनी इथे राज्य केले. अनेक आक्रमणं  झाली, युध्दाचे प्रसंग या भूमीने वारंवार झेलले. त्यामुळे पोलादी तलवारीना, शस्त्रांना स्वकियांच्या संरक्षणासाठी सतत धार लागत राहिली. त्यामुळेच जिल्ह्याचे नाव ही धार च पडले. खूप मोठा इतिहास आहे ह्या भूमीचा. संबंधित पुस्तकं वाचून समजून घेण्याजोगा. त्यामुळे बरीच पुरातन स्थापत्य कला ही इथे पाहायला मिळते. परकीय आक्रमण कर्त्यानी जुन्या वास्तूंवरच केलेली बांधकामे. काही उद्ध्वस्त झालेली, काहींवर नवीन बांधकामे चढवलेली , मूळ इतिहासाच्या खाणाखुणा नष्ट करू पाहणारी ,तरीसुद्धा  त्यातूनही काही जुनी , पाय घट्ट रोवून टिकून राहिलेली , येणाऱ्यांना इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा देणारी. आवड असेल तर निवांत चारपाच दिवस राहून सगळी ऐतिहासिक स्थळं पाहता येऊ शकतील इतकी ठिकाणं आहेत. 
     आम्ही दोन दिवस राहिलो MPT resort मध्ये. रिसॉर्ट खूप सुंदर आहे.  रिसॉर्ट समोर च मोठं तळे आहे, त्याच्याच बाजूला छोटंसं दुर्गेचे मंदिर आहे. पहाटेच आम्ही तिथे तळ्याकाठी गेलो. पहाटेची एकदम शुध्द हवा.  तळ्यातल्या नितळ, संथ  पाण्यात निळ्या आकाशाचे, आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांचे प्रतिबिंब पडले होते. हळूहळू पक्षांची सुंदर किलबिल ऐकू येऊ लागली होती. जशी सूर्योदयाची वेळ झाली तसे निरनिराळे पक्षी तळ्यावर, झाडांवर इकडून तिकडे घिरट्या घालू लागले. एकीकडे तळ्यावरील पाण्यावर धुक्याचे ढग भुरभुरावे तसे उतरत होते तर दुसरीकडे लालबुंद सूर्य  संथ गतीने क्षितिजावर येत होता. त्याची किरणे झाडांवरून तळ्यावर पडत होती. तळ्यावरचं पाणी सूर्यकिरणांमुळे सोन्यासारखं चमचमायला लागले होते. कोवळी उन्हं खायला खडकांवर उडत उडत दोन खंड्या पक्षी, दहाबारा बगळे , पारवे , पोपट येऊन बसले. मधेच तळ्यातल्या पाण्यात डुबकी मारून ,पाणी पीऊन पुन्हा बाजूला येऊन उन्हात पंख फडफडवत, जलबिंदू उडवत बसत होते. हवेत उडणारे जलबिंदु कोवळ्या उन्हात हिऱ्या सारखे चमचमत होते. निसर्गातले हे स्वर्गसुख मी मनसोक्त अनुभवत होते. 
     ह्या भागात बरेच पोपट दिसतात. झाडं च्या झाडं पोपटांनी भरलेली दिसतात. पानांच्या रंगात इतके बेमालूम मिसळून जातात की झाडाची पानं आहेत की पोपट पटकन कळून येत नाही. आवाजा वरून निरखून पाहिल्यावर लक्षात येते. सूर्य झाडांवर येई पर्यंत थोडावेळ निःशब्द होऊन असा समृध्द निसर्गाचा खेळ डोळे भरून पाहून,  आम्ही दुर्गेचे दर्शन घेऊन जायला निघालो. अशा कडकडीत थंडीत, दूरवरून सफेद वस्त्रांमध्ये, अनवाणी , पाठीवर ओझं, घेऊन  नर्मदे हर! चा जयघोष करत शीघ्र  गतीने चालत निघालेले परिक्रमा वासी पाहिले. काहींशी थोडं थांबून थोड्या गप्पा झाल्या. त्यांच्या सोबत रस्त्या कडेच्या छोट्याशा टपरीवर, चुलीवरचा मस्त फक्कड  चहा घेतला. नंतर ते त्यांच्या मार्गाने झपझप चालत पुढे निघून गेले आणि आम्ही आमच्या मार्गाने मांडू दर्शन करायला सुरवात केली.

*चतुर्भुज श्रीराम मंदिर 
     ह्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे  एकमेव चतुर्भुज श्रीरामाचे खूप सुंदर मंदिर इथे पाहायला मिळते. त्याची फार आश्चर्यकारक सत्यकथा आहे. परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे , मंदिरातल्या विग्रहांची विटंबना होऊ नये या उद्येश्याने मूर्ती गुप्त ठिकाणी कुठे कुठे लपवल्या जायच्या. तसेच ह्या मूर्ती ही हजार दीड हजार वर्षांपूर्वी लपवल्या गेल्या असाव्यात. बऱ्याच वर्षांचा कालावधी मधे गेला. इसवी सन १८२३ साली पुण्याचे महंत श्री  रघुनाथदासजी महाराजांना श्रीरामांनी स्वप्नामध्ये याच चतुर्भुज रुपात दर्शन देऊन त्यांना मांडव मध्ये पूर्व दिशेच्या जंगलातील एका औदुंबराच्या झाडाखाली भैरवमूर्ती दिसेल त्याखाली तळघरात या मूर्ती असतील त्या बाहेर काढून जनकल्याणा करिता ,  पुन्हा प्रतिष्ठापना करावी अशी आज्ञा केली. 
      स्वप्नात मिळालेल्या दृष्टांता नुसार , मिळालेली माहिती, दिशा चिन्ह यानुसार महंतांनी पुण्याहून येऊन शोध घेतला असता त्या स्वप्नाप्रमाणेच त्यांना सर्व आढळून आले. त्याकाळी तिथे आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल माजले होते.  मांडव धारच्या तत्कालीन महाराणी शकुबाई पवार होत्या. धार ला जाऊन त्यांच्या कानावर हा सगळा वृत्तांत रघुनाथदासजीनी घातला. महाराणी शकुबाई धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यानी मांडवला येऊन महंतांच्या सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम करवून घेतले . त्याच ठिकाणी या सुंदर मूर्ती तिथल्या तळघरात मिळाल्या. महाराणी शकुबाईंनी रघुनाथदास यांच्या हस्ते त्या मूर्तींची पुन्हा प्रतिष्ठापना करून मोठे मंदिर बांधून घेतले. आजही परिक्रमावसींसाठी तिथे राहण्याची जेवण्याची उत्तम सोय केली जाते. ते तळघर अजून आहे. तिथे, भैरव मूर्ती , दास हनुमान , नर्मदा मैय्या,  गणपती अशी ही मंदिरे आहेत. 

*जामी मशीद....
   श्रीराम मंदिराजवळच आहे. मूळचे हिंदू मंदिर मुघल काळात झालेले बदल. अशर्फी महल, मकबरे ही तिथे आजूबाजूला आहेत. ही पाहत असताना माझ्या माहेरचे, परिक्रमावासी अचानक भेटले. दीड महिन्यांपासून ओंकारेश्वर पासून चालत इथपर्यंत ते आले होते. अजून दीड दोन महिने परिक्रमा पूर्ण व्हायला त्यांना लागणार होता. आधी ओळख नसूनही जुनी ओळख असल्यासारख्या आपलेपणाने गळाभेटी झाल्या. त्यांच्या भेटीने आम्हाला खूप आनंद झाला . त्यांनाही इतक्या दिवसांनी कोणीतरी आपल्या गावचे भेटल्याचा अत्यानंद लपवता आला नाही. थोडा वेळ गप्पा झाल्या. माहेरच्या जुन्या आठवणींमधे काही क्षण घालवून त्यांना नमस्कार करून नर्मदे हर ! चा जयघोष करून आम्ही पुढे निघालो.
     
*नीलकंठ महादेव मंदिर 
     खोल दरीत बांधलेले हे मंदिर प्राचीन आहे. पायऱ्या उतरून खाली जावे लागते. जीवंत झऱ्याचे पाणी पिंडीवर पडत राहते. मंदिरासमोर एक कुंड आहे. शिवाय त्याला लागून चक्राकार पाट आहे. शिवपींडी वर पडलेले जल गोमुखातून येऊन त्या कुंडात जमा होते आणि त्या चक्राकार पाटातून गोल गोल फिरून बाहेर पडते. लोक त्या कुंडात फूल वाहतात त्या चक्रातून ते फूल बाहेर पडले तर मुक्ती मिळते अशी लोकांची धारणा आहे.  एकेकाळी मुघलांनी उद्ध्वस्त केलेले हे मंदिर श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी पुन्हा बांधून प्रतिष्ठापीत केले आहे आणि पूजा अर्चा चालू करवून घेतली. 

*जहाज महल 
सर्वात मोठी ऐतिहासिक वास्तू. गुप्त मार्ग असलेली विहीर चंपा बावडी, तिथेच हिंदोळा महल आहे. कापूर तलाव, मुंज तलाव, घोड्यांच्या पागा, स्नान गृह, महल असं बरंच आहे पाहायला. महलाला जहाजासारखा आकार असल्यामुळे जहाज महल. 
हिंदोळा महल च्या मागच्या भिंतीवर एक आयताकृती रिकामी जागा दिसते. तिथून आत पाहिल्यावर सरस्वतीची मूर्ती दिसते. फोटो मध्ये मी शेअर केले आहे . 
रात्री हिंदोळा महला वर लेझर शो असतो. आशुतोष राणाच्या एकदम भारदस्त आवाजात इथला संपूर्ण इतिहास संक्षिप्त स्वरूपात ऐकायला मिळतो. पाऊण तासाचा शो छान होता. हिंदोळा महल झोपाळ्यासारखा तिरकस बांधला आहे. आत मंडवासारख्या कमानी बांधल्या आहेत. त्यामुळे महल आतून मांडवा सारखा दिसतो. पूर्वी छतांवर पेंटिंग्ज, सोनं,हिरे माणके यांनी सजवलेले हे सर्व महाल होते म्हणे. 
 * राणी रुपमती महल
 राणी रुपमती नर्मदा मैयाची निस्सीम भक्त होती. ती संगीताची उत्तम साधक होती. नर्मदा दर्शनाने तिच्या दिनचर्येला सुरवात होत असे. या ठिकाणाहून दूरवरून नर्मदेचे दर्शन होते. पायथ्याशी रेवा कुंड आहे. साक्षात नर्मदा नदी या कुंडात अवतीर्ण झाली असे सांगतात. त्यामुळे परिक्रमावासी या रेवा कुंडात स्नान करून च पुढे मार्गक्रमण करतात. नाहीतर परिक्रमा अर्धवट झाली असे मानतात.त्यामुळे या कुंडाचे फार महत्व आहे.

 बाजबहादुर आणि राणी रुपमतीची गोष्ट इथे सांगतात. दोघेही संगीतप्रेमी होते. पुढे मुघल अक्रमणा मुळे स्वतःच्या शील रक्षणार्थ राणी रुपमती वीष पिऊन/हिरा गिळून स्वतःची आहुती देते. 

*होशंग शाह मकबरा 
*सोन गेट 
*दिल्ली दरवाजा (दिल्लीच्या दिशेने मुघलांनी बंधलेत. )
*जाली महल
अशा अनेक गोष्टी तिथे पाहण्याजोग्या आहेत. 
* सर्वात शेवटी आम्ही जैन मंदिर पाहिले. आता नवीन बांधकाम चालू आहे. मंदिर छान आहे. 

  हे मंदिर पाहून खूप सुंदर आठवणी गाठीशी  बांधून आम्ही निघालो पुढे देवी अहिल्याबाईंची पुण्य नगरी महेश्वर पाहायला. 
भेटूया मग पुढच्या भागात महेश्वर मधे. 😇🙏🏻

सौ.श्वेता अनुप साठये ✍🏻
४/१/२०२५
शनिवार, पौष शु.५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा