नर्मदे हर!🙏🏻😇
जय श्री महाकाल!🙏🏻😇
महेश्वर
मांडव पाहून संध्याकाळी आम्ही महेश्वर पहायला निघालो. महेश्वर च्या अलीकडे जलकोटी नावाच्या गावात एकमुखी दत्त धाम आहे. नारायणस्वामी आश्रमांच्या चार दत्त धामांपैकी हे प्रथम , दुसरे अंजीग्राम, वट्टा कोटा कन्याकुमारीला, तिसरे ब्रह्म दत्तधाम कोलकाता, पश्चिम बंगाल, आणि चौथे अत्री दत्तधाम हिमाचल प्रदेश मध्ये. जलकोटी चे हे दत्तक्षेत्र 30 एकर मधे बांधले आहे. मंदिर परिसर अतिशय सुंदर, विशाल, स्वच्छ, शांत आहे. त्याच आवारात गाय वासरू, त्यालाच वेदमाता मंदिर ही म्हणतात, गणपती , नर्मदा मैय्या यांची ही मंदिरे आहेत. दत्ताची मूर्ती खूप रेखीव, सुंदर आहे . सहा हात असलेली मूर्ती नर्मदेच्या सहस्र धारांकडे मुख करून उभी आहे. पांढऱ्या शुभ्र अशा या संगमरवरी मूर्ती कडे पाहताच आपले मन एकदम शांत होते.
या मंदिरासमोर च 300 मीटर वर नर्मदा सहस्रधारा आहेत. या ठिकाणाला पौराणिक महत्त्व आहे. सहस्रधारा हे नाव, राजा सहस्त्रार्जुन याच्यावरून पडले. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी आपण मंत्र म्हणतो ना, ...
कार्तीवीर्यार्जूनो नाम राजाबाहो सहस्रवान्|
तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते||
तोच हा राजा कार्तीवीर्य सहस्त्रार्जुन...ज्याला सहस्र बाहू होते. याच हैहयवंशी सहस्त्रार्जुन राजाने पुराण काळात महेश्वर नगर वसवले होते आणि त्याच्या राज्याचे नाव होते माहिष्मती. हाच विष्णुच्या सुदर्शन चक्राचा अवतार ही मानतात. त्याची रावणाशी संबधित कथा इथे ऐकायला मिळते.
एकदा हा सहस्त्रार्जुन राजा नर्मदा स्नान करण्यासाठी त्याच्या राण्यांना घेऊन या ठिकाणी जलकोटी ला गेला. नदी पात्रात आपले सहस्र बाहू पसरून त्याने नर्मदेचा तीव्र प्रवाह रोखला. तिथे नर्मदा मैय्या सहस्रधारांमध्ये विभागली गेली आणि नदीपात्रातला काही भाग कोरडा झाला. त्याच वेळी रावण आकाश मार्गाने पुष्पक विमानातून जात असताना त्याला हे नर्मदा नदीतले कोरडे पात्र दिसले. त्यावर वाळूचे शिवलिंग बनवून पूजा करण्याचे ठरवून तो खाली नदीपात्रात उतरून शिवलिंग बनवून पूजा करू लागला. एकीकडे ह्या सहस्त्रार्जुन राजाचे नर्मदा स्नान पूर्ण झाले आणि तो उठून नदीतून बाहेर पडला त्यामुळे त्याच्या सहस्र हातांमुळे अडलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा पूर्ववत चालू झाला आणि रावणाची पूजा अर्धवट राहून गेली आणि शिवलिंग पाण्यात वाहून गेले. त्यामुळे संतप्त रावणाने राजाशी युद्ध सुरू केले. सहस्र बाहूंचे बळ असलेल्या बाहुबली राजापुढे रावणाचा काही टिकाव लागला नाही . रावणाची हार झाली आणि राजाने त्याला बंदी बनवले आणि विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या दहाही मस्तकांवर दिवे लावण्यास सहस्त्रार्जुन राजाने त्याच्या राण्यांना सांगितले. तेव्हा पासून आजपर्यंत अखंड अकरा दीप महेश्वर मध्ये राजराजेश्वर मंदिरात तेवत आहेत. पुढे ऋषी पुलत्स्य (रावणाचे आजोबा) यांच्या विनंती वरून राजा ने रावणाची सुटका केली. पण पुन्हा इकडे राज्यात न फिरकता दक्षिणेकडे पलायन करण्यास सांगितले.
पुढे या राजाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांना त्रास दिल्यामुळे जमदग्नी पुत्र परशुरामांनी सहस्त्रार्जुन सोबत युद्ध आरंभले. दीर्घकाळापर्यंत हे युद्ध चालू राहिले. दोघांचेही सामर्थ्य तोडीसतोड. कोणाचीच हार होईना. अखेर राजाला परशुराम हे विष्णुचेच अवतार आहेत हे उमजल्यावर त्याने प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. दत्त गुरूंच्या सांगण्यावरून महेश्वर मधील महादेव मंदिरात शिवलिंगात स्वतःला विलीन केले.
महेश्वर मधील नर्मदा किनारी हे राजराजेश्वर मंदिर खूप सुंदर आहे. तिथे त्रेता युगा पासून आजपर्यंत अखंड अकरा दीप तेवत आहेत. तिथेच गणपती, श्रीराम मंदिर , सहस्त्रार्जुन मंदिर ,देवी अशी बरीच मंदिरं आहेत. आदी गुरु शंकराचार्य आणि मंडण मिश्र यांच्यातला प्रसिद्ध शास्त्रार्थ ही इथेच झाला होता.
सहस्रधारा पाहून आम्ही संध्याकाळी महेश्वर मध्ये पोहचलो. राज पॅलेस हॉटेल बुक केले होते. हॉटेल ok आहे पण नदीपासून अगदी पाच मिनिटांवर आहे हा सगळ्यात मोठा फायदा. त्यामुळे लगेचच रात्री नर्मदा घाटावर नर्मदा आरतीला गेलो. नर्मदेत दिवे, श्रीफळ अर्पण केले. बराच वेळ मैय्याच्या प्रवाहाकडे पहात शांत बसून राहिलो. रात्रीच्या अंधारात लाटांवर तरंगणारे चमचमणारे दिवे प्रवाहा बरोबर लांब पर्यंत जाऊन नजरेआड होईपर्यंत पाहत राहिलो. दिवसभराच्या धावपळीने आलेला थकवा मैय्याच्या दर्शनाने आणि तिच्या वरून येणाऱ्या आल्हाददायक हवेच्या झुळूके सोबत कुठल्याकुठे नाहीसा झाला. आईनी वात्सल्याने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवावा ना अगदी तसे वाटले.
घाटाच्या रस्त्यावर भुवनेश्वरी देवीच्या मंदिराजवळच्या घरातल्या एका ताईंनी गरमा गरम आलू पराठे आणि कवडी सारखं , एकदम गोड दही वाढले. बेत एकदम झकास झाला. घरगुती व्यवसाय आहे त्यांचा. मनसोक्त जेवून हॉटेल वर परतलो. तेवढ्यात समोरच असलेल्या राम मंदिरात आरती चालू झाली. परिक्रमावसींची तिथे राहण्याची सोय आहे. ते ही रोज रात्री तिथे आरती करतात. पुन्हा उतरून खाली घाटावर जाण्याचे त्राण उरले नव्हते त्यामुळे अंथरुणावर पडून ते नादमधुर आरतीचे स्वर ऐकतच कधी डोळा लागला कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी पहाटे चारला च जाग आली. मंदिरातून अगदी बारीक आवाजात काकड आरती ऐकू येत होती. "ओम् नमः शिवाय" चा देवळात जप चालू होता. अशा प्रसन्न वातावरणात साडेचार पावणे पाचलाच घाटावर गेलो. मला नर्मदा स्नान करण्याची फार इच्छा होती. नदीपात्राचा अंदाज नसतो त्यामुळे जरा साशंकता होती, मला नदीत जाऊ द्यायला अहो जरा घाबरत होते. लहानपणी आमच्या कृष्णा कोयनेत पोहण्याची सवय होती. पण हे पात्र त्याहून कितीतरी पटींनी मोठं , खोल, होतं. पाण्याला धार ही खूप होती. पण काही केलं तरी मला नदीत स्नान करायचेच होते. तेवढ्यात चारपाच परिक्रमावासी ही घाट उतरून नर्मदा स्नानासाठी आले. ओंकारेश्वर हून एक महिन्यापूर्वीपासून चालत ते महेश्वर मध्ये पोहचले होते. ते ही मराठी. गप्पांमधून कळले की ते ही आपल्याच गावचे😀 . पुन्हा एकदा आनंदाला उधाण आलं. त्या चौघीच्या आधाराने मनसोक्त नर्मदा स्नान केले. त्यांनीच प्रेमाने करवले. डोळे आपसूकच पाणावले. नर्मदा जलात आनंदाश्रू मिसळून गेले.
त्यांच्या सोबत मग आम्ही ही नर्मदेच्या पूजेत सामील झालो. त्या सर्वांनी नर्मदा अष्टक म्हंटले. सगळ्यांनी मिळून तिची आरती केली. खूप सुंदर आहे.
आरतीतले बोल ' झननन झननन झननन' , तुडीतान , तुडितान तुडीतान' ऐकताना तिची सगळी विलोभनीय रूपं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.
आम्हाला प्रसाद देऊन , आशीर्वाद देऊन ते पुढील यात्रेसाठी निघाले. पुन्हा मला प्रकर्षाने जाणीव झाली योग्य वेळी योग्य ती माणसं आपल्या आयुष्यात येतात. आपलं जीवन समृद्ध करायला. काही जण काही क्षणांपुरते तर काही दीर्घ काल.
ऋणानुबंध...अनाकलनीय... नर्मदे सारखं च आपलं ही जीवन प्रवाही आहे... नदीतल्या पाण्यासारखंच... वाहतं...कधी खाच खळग्यातून मार्ग काढत पुढे जाणारं तर कधी उधाण येऊन दुथडी भरून वाहणारं....आणि म्हणूनच नितांत सुंदर.
सात वाजत आले होते...आम्ही तसेच तिथून बोटी ने पुन्हा सहस्रधारा आणि बाणेश्वर पाहायला गेलो. बोटीने गेल्यावर सहस्त्र धारा ला नर्मदेचे अवखळ रूप पाहायला मिळते. खडकांमधून जोरदार वाहत ती पळत सुटते असं वाटतं. तिकडे प्रवाहाला खूप धार आहे. खूपच सुंदर आहे . बाणेश्वराचे मंदिर नदीपात्रात मध्यावर आहे. द्वापार युगा पासून हे मंदिर आहे. बाणासुराने इथे महादेवाची तपश्चर्या केली होती असे म्हणतात. पृथ्वीच्या मध्यबिंदू वर बाणासुराने शिवलिंग स्थापन केले आहे, हेच ते मंदिर.
बोटिंग करून आल्यावर देवी अहिल्या बाईंचा राजवाडा ,घाट, त्यातल्या स्मृती छत्री, मंदिरं पाहिली. गाईड कडून त्यांचा प्रेरणादाई इतिहास जाणून घेतला. त्यांचे सासरे मराठा सरदार मल्हारराव होळकरांनी त्यांना मुलाच्या मृत्यू पश्चात सती जाऊ न देता राज्यकारभार त्यांच्या हाती सोपवून धर्माचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना दिली. भारतभर मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची त्यांनी पुन्हा स्थापना करून जीर्णोध्दार केले. तीर्थ क्षेत्री नवीन घाट , मंदिरं यांची बांधकामे करवून घेतली. स्वतः सन्यस्त राहून प्रजेच्या हिताचा राज्यकारभार त्यांनी केला. रोज एक लक्ष आठ शिवलिंग बनवून त्यांची पूजा करण्याचा त्यांचा नेम होता. सूर्यास्ताला नर्मदेत विसर्जन करत. आज ही ती प्रथा तिथे वाड्यात चालू आहे. आता रोज १००८ शिवलिंग बनवतात आणि त्यांची नियमित पूजा होते. आपण त्यावेळेस तिथे गेलो तर आपली इच्छा असेल आपल्यालाही ते बनवायला देतात. मी त्यावेळी तिथे गेले होते त्यामुळे गुरुजींनी मला ही शिवलिंग बनवायला दिली. 😇 वाड्यात पाच पानी, सात पानी बेलाची दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात. फोटो शेअर केला आहे.
किल्ल्यातील नक्षीकाम बघत अजून थोडावेळ आम्ही तिथे घालवला. आतापर्यंत खूप गर्दी तिथे झाली होती. बऱ्याच जणांचे Pre -wedding , post wedding, अशा सगळ्या फोटो शूटिंग चा सुळसुळाट, गंमत बघून , आम्हीही थोडेफार जमतील तसे फोटो काढून तिथून निघालो.
महेश्वर मध्ये रोजगार मिळण्यासाठी देवी अहिल्याबाईंनी हातमाग चालू केले. हैदराबाद ,गुजराथ हून कारागीर बोलवून व्यवसाय चालू करून दिले. किल्ल्या मध्ये ठिकठिकाणी असलेले नक्षीकाम तिथल्या हातमगाच्या साड्यांवर ही विणलेले असते. हे त्याचे मूळ वैशिष्ट्य आहे. सगळं पाहून झाल्यावर मी मनसोक्त साड्या खरेदी केल्या . शास्त्र असतं ते. 😀 संध्याकाळी लब्बुज कॅफे मध्ये मस्त जेवण केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून पुन्हा एकदा घाटावर चक्कर मारायला गेलो. काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन तिथूनच वरून नदीकडे पाहत सूर्योदय अनुभवत होतो. तेवढ्यात नदी पात्रात हालचाल जाणवली...दोनचार हात अधूनमधून वर येत होते....आधी वाटले कोणीतरी बुडतेय की काय?? ह्या विचाराने छातीत धस्स झाले, म्हणून नीट निरखून पाहिले, मग समजले दोघे जण नदी पात्रातून पलीकडच्या तीरावरून पोहत इकडच्या तीरावर येत आहेत. इकडच्या तीरावर पोहचल्यावर दोघेही पुजारी पाच दहा मिनिट दम खाऊन पुन्हा नदीत झेप घेऊन पलीकडचा तीर गाठायला निघाले होते. त्यांचं असं पट्टीचं पोहणं पाहून अचंबित होऊन त्यांना मनातल्या मनात च दंडवत घातला.
थोडावेळ थांबून आम्ही तिथूनच मनापासून नर्मदा मैय्याला , महेश्वरच्या पावन भूमीला नमस्कार करून अविस्मरणीय आठवणी घेऊन रावेरखेड ला जायला निघालो. तिथून पाय निघत नव्हते पण पुढं जाणं भाग होतं.
येताय ना मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत रावेरखेडला, बाजीराव पेशव्यांच्या समाधीला भेट द्यायला?
नर्मदेsss हर! 🙏🏻😇
सौ.श्वेता अनुप साठये ✍🏻
६/१/२५
सोमवार
पौष शु.७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा